क्रूर प्रवृत्तींकडून औरंजेबाचे उदात्तीकरण : विश्वास पाटील

21 Mar 2023 16:51:42

sambhaji 
 
मुंबई : औरंगाबादचे नामांतरण छत्रपती संभाजी नगर असे झाल्यानंतर तृष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांमार्फत याला विरोध करण्यात आला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अनेक मुस्लीम नेत्यांनी याला विरोध केला. यासह समाजमाध्यमांवर औरंगजेबाचे उद्दातीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. या प्रकरणावर ख्यातनाम लेखक व अनेक पुरस्कारप्राप्त कादंबरीकार विश्वास पाटील यांनी परखड मत व्यक्त केले आहे.
 
समाजातील क्रूर प्रवृत्तींकडून औरंजेबाचे उदात्तीकरण केले जात आहे, असे विश्वास पाटील म्हणाले. संभाजी महाराजांचा ( Sambhaji Maharaj ) औरंगजेबाने (Aurangzeb) केलेला छळ 'संभाजी' या आपल्या कादंबरीत मांडला आहे. कादंबरीतील शेवटच्या काही पानांतून वाचताना प्रत्येकाचे मन विषण्ण होते पण तरीही आज औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा सपाटा सुरू आहे. याबद्दल विश्वास पाटील यांनी परखड मत मांडले आहे.
 
ते म्हणाले, "काही क्रूर प्रवृत्तीच्या लोकांनी असा सपाटा चालवलेलाच आहे. मुळात औरंगजेब हा दुष्टांचाच शहेनशाह होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्यांनी आपला पिता शहाजहान याचे पाणी तोडले, आपला मोठा भाऊ दाराचे मुंडके छाटून आपल्या हातात घेऊन बराचवेळ पारखत बसला होता. आपल्या तीन भावांची त्याने निर्घृण हत्या केली. दाराच्या दोन बेगमांशीसुद्धा त्याने जुलुमाने लग्न केले होते. त्याचा हा सर्व इतिहास पाहता त्याला नायक करायचे काहीही कारण नाही आहे."
 
"तो दृष्ट होता, क्रूरकर्मा होता हे त्याने त्याच्या कर्मानेच जाहीर केले आहे. आणखी एक, जर लोकांना हिंदू आणि मुसलमान बंधुत्वाची किंवा ऐक्याची प्रतीकं हवी असतील, तर ती अनेक आहेत. त्यांच्याकडे आपण पाहत नाही आणि या दुष्टांनाच सुष्ट ठरवत जातो. असे अनेक सरदार होते, अफजलखानाचेही आणि औरंगजेबाचेही काही सरदार शिवाजीमहाराजांना, शंभूराजांना सामील होते. काही उघडही सामील होते. त्यांनी बरीच मदत केली आहे. ते जरी मुसलमान असले तरीही ते हिंदवी स्वराज्याचे मित्र होते. त्यांच्या मैत्रीचा सन्मान जरूर केला जावा. परंतु, मुद्दामहून अफजलखान किंवा औरंगजेबाचा गौरव करण्यामागे अर्थ नाही.", असेही ते म्हणाले.
 
"जसे की, रुस्तम ए जमा आहे, हा विजापूरचा सरदार होता. त्याचे वडील रणदुल्ला खान म्हणजे सातार्याषजवळील रेहमतपूर येथील होत. रेहमतपूर त्यांच्या नावाने बांधलेले आहे. या रणदुल्ला खानाने शिवाजी राजांचे पिता शहाजीराजांना खूप मदत केली. बंगळुरू जवळचा किल्ला त्यांना राहायला दिला. हा किल्ला इतका मोठा होता की, त्याला दिल्ली दरवाजासारखे नऊ दरवाजे होते. तिथल्याच एका केम्पेगौडा नावाच्या राजाकडून ६० हजार फौजेनिशी वर्षभर लढाई करून जिंकलेला तो किल्ला होता. तो जसाच्या तसा शहाजी राजांकडे त्यांनी सुपूर्द केला. पुढच्या काळात शिवाजी महाराजांची मैत्री त्यामुळे जुळलेली आहेच. डिसेंबर १६५९ साली झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी रुस्तम-ए-जमाला जाऊ दिले. याची वर्णने‘श्रीशिवभारत’ या ग्रंथातदेखील आहेत.", अशी माहिती विश्वास पाटील यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0