चैत्र पाडवा हिंदू नववर्ष स्वागत स्फूर्तियात्रा

21 Mar 2023 22:06:59
hindu new year
 
 
चैत्र पाडवा म्हणजे विक्रम संवत्सरानुसार हिंदू नववर्ष. प्रभू श्रीराम वनवासात असताना दक्षिणेतील राक्षसांचा नायनाट करून महाराष्ट्राला मुक्त केले. हाच तो विजयदिन म्हणून घरोघरी विजयध्वज उभारले गेले. आज नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात. या शोभायात्रांतून आपल्या संस्कृतीचे, परंपरांचे दर्शन होते. अशा अनेक शोभायात्रा विविध शहरात पाहायला मिळतात. कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या या शोभायात्रांचा प्रवासही तेवढाच उत्कंठावर्धक असा आहे. यानिमित्ताने मुंबईतील तीन संस्थांच्या शोभायात्रांची माहिती या लेखात दिली आहे. गिरगाव किंवा गिरणगाव येथील शोभायात्रा, पार्ल्यातील टिळक मंदिर येथील स्फूर्तियात्रा व कुर्ल्यातील प्रभातफेरी.
विलेपार्ले नववर्ष स्वागत यात्रा


विलेपार्ले पूर्व येथे लोकमान्य सेवा संघ, पार्ले गेली १०० वर्षे समाजसेवेचे व्रत घेऊन क्षैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सेवा देत आहे. हे त्यांचे शताब्दी वर्ष. यानिमित्त नववर्षाच्या दिवशी जंगी स्फूर्तियात्रेचे आयोजन त्यांनी केले आहे. कोरोना महामारीचा काळ वगळता गेल्या १८ वर्षांपासून दरवर्षी या शोभायात्रेचे आयोजन केले जाते. या प्रभातफेरीला ते शोभायात्रा म्हणत नाहीत तर हिंदू नववर्ष स्वागत स्फूर्तियात्रा असे म्हणतात. सांस्कृतिक पार्ल्याची मुहूर्तमेढ रोवणारी लोकमान्य सेवा संघ संस्था म्हणजे टिळक मंदिर. आजच्या सांस्कृतिक वारसा जपणार्‍या पार्ल्याची ही पितृतुल्य संस्था. या संस्थेच्या शताब्दीवर्षपूर्ती निमित्ताने ’शताब्दी... लोकमान्य सेवा संघाची..! शताब्दी... सांस्कृतिक पार्लेची...!’ या संकल्पनेवर आधारित शोभायात्रेचे आयोजन केले आहे. दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून साधारण ८ वाजेपर्यंत ही स्फूर्तियात्रा असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या यात्रेचे वैशिष्ट्य असे की, ही यात्रा पंचदिशांनी येऊन मध्यवर्ती ठिकाणी एकत्र येते व त्यानंतर टिळक मंदिर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पटांगणात समाप्त होते. अनेक संस्था एकत्र येऊन विविध दिशांतून ही यात्रा घेऊन येतात.

पूर्व दिशेहून ‘यंग मराठा’, ‘कुणबी समाजोन्नती संघ’, ‘साबरी प्रतिष्ठान’, ‘संस्कृती संवर्धन’, ‘राष्ट्रीय सेविका समिती’, ‘लोकमान्य सेवा संघ’ ग्रंथालय शाखा आणि इतर अन्य संघटना एकत्र येतील. या यात्रेचा विषय हा साहित्य आहे. पश्चिम दिशेहून ‘लोकमान्य सेवा संघ वैद्यकीय शाखा’, ‘दिशा कर्णबधीर कलबाग केंद्र’, ‘जिजामाता रुग्णसेवा केंद्र’, ‘महर्षी कश्यप आरोग्य सेवा समिती’, ‘राम रथ’, ‘जैन महिला मंडळ’, ‘मारवाडी समाज’, ‘वानरसेना’, ’बिष्णोई समाज’, ’रोटरी क्लब ऑफ पार्लेश्वर’ आणि इतर संघटना आरोग्य हा विषय घेऊन चित्ररथ, ढोल-ताशे, पथनाट्य, माहितीपट इत्यादी सादरीकरणे करत आहेत. उत्तर दिशेहून क्रीडा हा विषय घेऊन ‘लोकमान्य सेवा संघ’ ‘कृष्णाबाई यमाई व्यायामशाळा’, ‘प्रबोधनकार ठाकरे क्रीडासंकुल’, ‘पार्लेश्वर व्यायामशाळा’, ‘डॉ. हेडगेवार मैदान व्यायामशाळा’, ’जनसेवा समिती’, वारकरी, ‘जीवन विद्या मिशन’, ‘कोकण कट्टा’, ‘अटल सेवा केंद्र’ आणि अन्य संस्था जिम्नॅस्टिक, लेझीम स्केटिंग, फुटबॉल, व्हॉलिबॉल, मल्लखांब, देशी खेळ या सर्वांचे विविध चित्ररथ सादर करतील. ढोल-ताशे, पथनाट्य आणि माहितीपट सोबतीला आहेच. दक्षिण दिशेहून सामाजिकसेवेचे व्रत घेतलेल्या सेवा उपक्रम हा विषय घेऊन काही संस्था येतील. या मार्गाने येणार्‍या सामील संस्थांमध्ये ‘लोकमान्य सेवा संघ नागरिक दक्षता शाखा’, ‘दिलासा’, ‘कचरा निर्मूलन’, ‘आनंदधाम वृद्धाश्रम’, ’पार्ले कल्चरल सेंटर’, ’कुंकूवाडी महिला मंडळ’, ‘कौंतेय प्रतिष्ठान’, ‘आदर्श पेट्रोलपंप’, तसेच ‘गणराज मंडळ’ एकत्र येऊन विविध उपक्रम सादर करत आहेत. मध्य दिशेहून ललित कला व संस्कृती हा विषय घेऊन, ‘लोकमान्य सेवा संघ स्त्री शाखा’, ’कला शाखा’ आणि अन्य संघटना, या सर्वांचे विविध चित्ररथ व इतर माध्यमांतून प्रदर्शन होईल.


hindu new year 


गिरगाव नववर्ष स्वागत यात्रा
 
 
गिरगावची शोभायात्रा म्हणजे मुंबईतील सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू. या यात्रेला यावर्षी २१ वर्षे पूर्ण होत आहेत. जोरदार तयारी करून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सकाळी ८ वाजता या यात्रेची सुरुवात होणार आहे. गिरगावातील श्री गणेश मंदिरापासून या यात्रेला प्रारंभ होईल. अनेक ढोलताशा पथके हे यात्रेचे मुख्य आकर्षण असेल. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रजासत्ताकदिनी दिल्लीत संचलन झालेल्या यात्रेत साडेतीन शक्तिपीठांचे महत्त्व सांगणारे चित्ररथ होते. यावर्षीच्या शोभायात्रेतूनही हा देखावा मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. गिरगाव ध्वजपथक, गिरगावचा आवाज म्हणून ओळखले जाणारे गजर ढोलपथक, आणि मोरया ढोलपथक अशी मुख्य पथके यावेळी उपस्थित असतील. ‘स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान’ने आयोजित केले आहे. या यात्रेत काही ऐतिहासिक देखावे दाखवण्यात येणार आहेत. पारंपरिक वेशभूषा परिधान करून स्थानिक नागरिक या शोभायात्रेत सहभागी होतील. शिवाजी महाराजांच्या इतिहासावर क्षणचित्रे यातून पाहायला मिळतील. शोभायात्रेच्या पूर्वी पार्ले येथील ‘स्वामी समर्थ मठ’ येथे सर्वांचे एकत्रित संचालन होईल व त्यानंतरच यात्रेला सुरुवात होईल.दुपारी साधारणपणे १२ वाजेपर्यंत ही यात्रा चालेल. चिंचपोकळी येथील दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गिरणगावचा राजा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग येथील मुक्ता सिनेमाजवळ समाप्त होईल. २२ फुटी उंच आचार्य चाणक्याच्या हातात गुढी घेऊन यात्रेची सुरुवात होईल. शिवाजी महाराजांना भवानी तलवार प्रदान करतानाचे चित्र असेल, तसेच तोफा सुद्धा या यात्रेतून मार्गक्रमण करतील.



hindu new year


कुर्ला नववर्ष स्वागत यात्रा

 
कुर्ल्यातील मागील काही नववर्ष यात्रांवर ओझरता दृष्टिक्षेप टाकल्यास त्यात छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची संकल्पना ठेवण्यात आली. तसेच वीर जवानांना समर्पित १५ हजार चौरस फुटांची रांगोळी, संत ज्ञानेश्वर महाराजांचा हिंदुत्व हेच विश्वबंधुत्व असा पसायदानातून दिलेला संदेश, कारगिल विजय दिवसाच्या सन्मानार्थ उभारलेली शौर्याची गुढी तसच कुर्ल्यातील आजी-माजी सैनिकांनाचा सन्मान, कोरोना काळात डिजिटल पद्धतीने ऊकेले नववर्षाचे स्वागत आणि गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या शिलेदारांना दिलेली मानवंदना हे सर्व क्षण नेहमीच कुर्लावासीयांच्या स्मरणात राहतील. यावेळी शोभायात्रेचे हे १५वे वर्ष आहे.


hindu new year

 
लालबाग नववर्ष स्वागत यात्रा


सर्व जातिधर्मातील लोकांना एकत्रित आणण्यासाठी गुढीपाडवा हे एक प्रभावी माध्यम आहे, याच उद्देशाने या शोभायात्रेची सुरुवात झाली. संस्कृती, परंपरा आणि उत्सव आदींचे प्रारूप दर्शवणारे चित्ररथ लालबाग विभागाच्या माध्यमातून शोभायात्रेमध्ये उतरवण्यात आले. अनेक अडचणींवर मात करून गेली पाच वर्षे लालबाग, परळ, काळाचौकी, करी रोड, चिंचपोकळी या संपूर्ण गिरणगाव विभागाच्या माध्यमातून ‘गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान’ या नावाने हिंदू नववर्ष शोभायात्रा, लालबाग, परळ आजतागायत अव्यहातपणे सुरू आहे. यानिमित्ताने अनेक वेगळ्या विषयांना वाचा फोडण्याचे ठरवून त्याचे प्रदर्शन शोभायात्रेत होईल. ५५० हून अधिक संस्थानांचे विलीनीकरण झाले, तो इतिहास, लोकशाहीचा स्वीकार आणि संविधान निर्मिती हे डॉ. बाबासाहेबांचे महत्त्वाचे कार्य, १९६९ साली झालेल्या हरितक्रांतीमुळे अन्नधान्यासंबंधी जी आत्मनिर्भरता आपल्यात आली. तसेच दि. १६ डिसेंबर, १९७१ साली भारतीय सैन्याने पाकिस्तानवर मिळवलेला विजय हे संरक्षण क्षेत्रातले मोठे पाऊल होते, १९६९ साली ‘इस्रो’ची स्थापना झाली. ही वैज्ञानिक क्रांती, त्याचसोबत डिजिटल क्रांती, आरोग्य क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातील क्रांती असे अनेक विषय गेल्या ७५ वर्षांत भारतात घडत होते. या सर्व विषयांचा आढावा घेणारी ही शोभा यात्रा बुधवारी सकाळी ९ वाजता सर्वेश्वर मंदिरातून सुरुवात होईल व गोल बिल्डिंगपर्यंत येईल. पुढे गौरीशंकर मंदिरापासूनही हलाव पुलापर्यंत येईल. शिक्षक नगरपासून मॅनफॅक्टरी लेनपर्यंत येईल. या चारही ठिकाणांवरून यात्रा भारत सिनेमाकडे पुढे जागृत विनायक मंदिर येथे पोहोचून महाआरतीने या यात्रेची सांगता होणार आहे.




 
Powered By Sangraha 9.0