साहित्यमेरू शंभूराजे...!

    20-Mar-2023   
Total Views |
Chhatrapati Sambhaji Maharaj

आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी. संभाजी महाराजांचा पराक्रम तर अलौकिकच होता. पण, छ. संभाजी महाराज भाषेचे उत्तम जाणकार होतेच, तसेच ते विद्वत् साहित्यिकही होते. आज त्यांच्या साहित्यिक पैलूंविषयी आपण जाणून घेऊया...

 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वानंतर इतिहासात आपल्या असामान्य कर्तृत्वाने नाव कोरणारे संभाजी महाराज. छ. संभाजी महाराजांनी आपला राजकीय वारसा जपलाच, परंतु आपली वेगळी ओळखसुद्धा निर्माण केली.छत्रपती संभाजी महाराजांची प्रगल्भता तशी सर्वज्ञात. वयाच्या आठव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांसह आग्रा येथे गेले असतानाही तेथील नजरकैदेत त्यांनी संयम आणि बुद्धिचातुर्य दाखवले. लहानपणापासूनच त्यांनी अनेक बिकट संकटांचा सामनाही केला. परंतु, या पराक्रमासह त्यांच्यात साहित्यिक गुणही होते. त्यांना एकूण १४ भाषा अवगत होत्या. त्यातील संस्कृत आणि ब्रज भाषेत ‘बुधभूषण’, ‘नायिकाभेद’, ‘नखशिख’ आणि ‘सातसतक’ या ग्रंथांच्या रचना त्यांनी केल्या.

बुधभूषण
 
 
छत्रपती संभाजी महाराजांचा ‘बुधभूषण’ हा सर्वज्ञात ग्रंथ. संस्कृतमध्ये लिहिलेल्या या ग्रंथाची सध्या तीनच प्रकरणे उपलब्ध होतात. अनेक अभ्यासकांच्या मते, या ग्रंथाची अजून प्रकरणे असण्याची शक्यता आहे. बुधभूषण ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात १६४ श्लोक आहेत. सुरुवातीला श्रीगणेश, भगवान शंकर, पार्वती आणि गुरू यांना वंदन करून आपल्या वंशाची माहिती त्यांनी दिली. ’बुधभूषण’च्या दुसर्‍या अध्यायात राजनीतिशास्त्राची माहिती देण्यात आलेली आहे. या अध्यायात एकूण ६३२ श्लोक आहेत. तिसर्‍या अध्यायाचे नाव ‘मिश्रप्रकरण’ असून त्यात ५७ छंद संभाजी महाराजांनी वापरलेले आहेत.

काहींच्या मते, ‘बुधभूषण’ हा स्वतंत्र ग्रंथ नसून, यामध्ये असलेले अनेक श्लोक संग्रहित केलेले आहेत. अर्थातच, हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी संभाजी महाराजांनी ‘महाभारत’, ‘कामन्दकीय नीतिसार’, ‘विष्णुधर्मोत्तर पुराण’, ‘मत्स्यपुराण’ आदी प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता, हे त्या ग्रंथातून दिसून येते. वेगवेगळ्या पौराणिक ग्रंथांतून संभाजी महाराजांनी राज्य प्रशासन/राजनीती या विषयांना धरून निवडलेले श्लोक आणि त्यांचे योग्य वर्गीकरण करून त्या-त्या विषयांनुसार शीर्षके देऊन या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.

‘बुधभूषण’ ग्रंथामध्ये शेषनाग, गरुड, भ्रमर, कुंभ, मीन (मासा), उंट, दुंदुभी, निंबवृक्ष, सोने इत्यादी विषयांवर श्लोक आहेत. तसेच, सूर्यासंबंधीचे सात, चंद्रासंबंधीचे सात, वायूसंबंधीचे तीन, भ्रमरसंबंधीचे सात, हंसाविषयीचे पाच, हत्तीसंबंधीचे पाच, तसेच विविध वृक्षासंबंधीचे १९ असे श्लोक आहेत. सुमारे ८९ विषयांवर निरनिराळ्या पक्ष्यांची, वृक्षांची उदाहरणे देऊन व्यंग रूपाचा खुबीदार वापर ‘बुधभूषण’मधील श्लोकांत केलेला आहे.

या ग्रंथाची निर्मिती शंभूराजांनी वयाच्या केवळ १४व्या वर्षी केली. ‘बुधभूषण’ या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे आणि आजोबा शहाजी राजे यांची स्तुती त्यांनी केलेली आहे. ते शिवाजी महाराजांविषयी म्हणतात-


कलिकालभुजंगमावलिढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः।
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेयः॥


म्हणजेच, कलिकालरूपी भुजंग विळखा घालत आहे, धर्माचा र्‍हास करत आहे. अशा वेळी वसुधेला तारण्यासाठी शिवप्रभूंचा अवतार झाला आहे. त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी कायम गर्जू देत.शहाजीराजांची स्तुती करताना ते लिहितात,

भृशबदान्वयसिन्धु सुधाकर: प्रथितकीर्तिरूदारपराक्रम:। अभवतर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासव:॥


म्हणजेच, सर्वशक्तिमान, सामर्थ्यवान असलेला पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ असा राजा किंवा प्रत्यक्ष शिवाचा अवतार असलेला उदार पराक्रमी आणि अर्थकारण व राजकारणातील धुरंधर अशा विविध गुणांचा संगम झालेला हा नृपथोर राजा गुणसागरातील चंद्राप्रमाणे शोभत आहे. असे सिंधुसुधाकरासारखे प्रचंड पराक्रमी,कार्तिवान, उदार शहाजी राजे होऊन गेले.या महत्वंशात जन्म झालेले शंभूराजे स्वत:विषयी अनुग्रहित होऊन लिहितात,


तस्यात्मज:शंभुरिति प्रसिद्ध:समस्तसामन्त शिरोवतंस:। यःकाव्यसाहित्य पुराणगीतकोदण्डविद्यार्णव पारगामी॥


याचा अर्थ म्हणजे, अशा त्या थोर शिवप्रभूंच्या समस्त मांडलिकांमध्ये शिरोभूषण म्हणून शोभणारा आत्मज शंभू(राजा)म्हणून प्रसिद्धीस आला. तो काव्य, साहित्य, संगीत, धनुर्विद्या इ.चा कलासागर यात पारंगतच झालेला होता.


Chhatrapati Sambhaji Maharaj book


नायिकाभेद

धर्मवीर संभाजी महाराजांची दुसरी साहित्यकृती म्हणजे ‘नायिकाभेद.’ हा ग्रंथ ब्रजभाषेत लिहिलेला आहे. हा ग्रंथ पूर्ण स्वरुपात मिळत नाही. हा ग्रंथ संभाजी महाराजांनी स्वत:च्या राज्याभिषेकानंतर लिहिलेला असावा, अशी शक्यता अभ्यासक व्यक्त करतात. कारण, यात ते स्वत:चा उल्लेख ‘नृपशंभू’ करतात.सौंदर्य आणि लोकनृत्याशी सांस्कृतिक ओळख सांगणारा हा ग्रंथ आहे. शिवकुळातील स्त्रिया शिवाला प्रसन्न करण्यासाठी विविध नृत्य सादर करत असत. या नृत्य करणार्‍या नायिकांचे भेद या ग्रंथात शंभूमहाराजांनी सांगितले आहे. काही अभ्यासकांच्या मते, शिवकुळातील स्त्रिया नृत्य शिवमंदिरात करत. भरतनाट्यम् या नृत्याचा उगम ‘नायिकाभेद’ या ग्रंथातून झाला, असे त्यांचे म्हणणे आहे.


नखशिख/ नखशिखा

 
छत्रपती संभाजी महाराजांची तिसरी साहित्यरचना म्हणजे ‘नखशिखा.’ हा ग्रंथ काशीच्या नागरी प्रचारणी सभेत उपलब्ध आहे. ‘नखशिख’मध्ये एकूण १३६ पदे आहेत. तसेच ब्रज भाषेतील ‘कवित्त’, ‘सवैया’, ‘दोहा’ आणि ‘छप्पेय’ अशा विविध छंदांचा वापर करून संभाजी महाराजांनी लिहिला आहे. या ग्रंथाच्या शीर्षकावरूनच लक्षात येते की, नखापासून ते शिखापर्यंत सौंदर्याचे वर्णन या ग्रंथात केलेले आहे. तसेच स्त्रीच्या मातृत्वाच्या गुणांचा गौरव या ग्रंथात केलेला आहे.

 
सातसतक
 
छत्रपती संभाजी महाराजांनी ‘सातसतक’ ही चौथी रचना केली. हा ग्रंथ अध्यात्मावर आधारित आहे. संभाजी महाराजांनी तरुण वयातच अध्यात्मावर केलेली ही ग्रंथरचना अद्भुत आहे. या ग्रंथात १०० पदे आहेत. या ग्रंथाचे प्रयोजन सांगताना ते एका श्लोकात म्हणतात, ‘सीता पग नष चंद की भजी कै सभ समाज। सातसतक ग्रंथ ही रच्यो संतन के हिन काज।’ संतांचे तत्त्वज्ञान सांगून अध्यात्मावर विवेचन केलेले आहे.संभाजीराजांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर गागाभट्ट यांच्याकडून इ. स. १६८०च्या दरम्यान २८६ श्लोकांचा ‘समनयन’ हा ग्रंथ पोथी स्वरूपात लिहून घेतला. तो धर्मशास्त्रावर आधारित ‘तिथिनिर्णय’ हा या ग्रंथाचा विषय आहे. छत्रपती शंभूराजांच्या राजवैभवाचा, क्षमाशीलतेचा, आश्रयदातृत्वाचा आणि पराक्रमाचा कीर्तीचा, कुलश्रेष्ठत्वाचा व अद्वितीय विद्वत्तेचा महान गौरव प्रत्यक्ष त्यांच्या हयातीत गागाभट्टांनी केलेला होता.

थोडक्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्याचा आढावा घेताना असे दिसते की, अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे हे प्रतिभासंपन्न छत्रपती संभाजी महाराज उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी ’बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ, तर ’नायिकाभेद’, ’नखशिख’ आणि ’सातसतक’ हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. लहानपणीच कवी कलश, महाकवी भूषण, गागाभट्ट यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्याने तसेच आपले वडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी हा राज्यानीतिशास्त्रावर ग्रंथ रचला. त्यांचा राजनीती, राज्यव्यवस्था, कर्तव्ये, मंत्रिमंडळ यांच्याविषयी सखोल अभ्यास होता. जसे राजनीतीमधील ‘कौटिल्य अर्थशास्त्र’ हा प्रमाण ग्रंथ मानला जातो, तसेच ‘बुधभूषण’ ग्रंथाविषयी म्हटले जाते. छत्रपती संभाजीराजांनी ‘शंभूराज’, ‘नृपशंभू’, ‘शंभूवर्मन’ या नावांनी साहित्यनिर्मिती केली.

छत्रपती संभाजी महाराजांना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या. त्यांची संस्कृत दानपत्रे प्रसिद्ध आहेतच. ब्रज भाषेतील ‘सातसतक’, ‘नखशिख’, ‘नायिकाभेद’ हे ग्रंथही उपलब्ध आहेत. श्रुंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी महाराणी छ. येसूबाई यांच्या प्रेरणेने ’नखशिखा’ हा ग्रंथ लिहिला. काही अभ्यासकांच्या मते, मुंबई विकत घेण्याच्या संबंधीचा पूर्ण व्यवहार हा इंग्रजीतून संभाजीराजांनी केलेला होता. स्वराज्याचे हे दुसरे अनभिषिक्त छत्रपती मराठीसह संस्कृत, फारसी, उर्दू, अरबी, ब्रज, इंग्रजी यांसारख्या अनेक भाषांचे जाणकार होते. इंग्रजीतून त्यांनी अनेकदा फिरंग्यांशी बोलणी व पत्रव्यवहार केलेला आज उपलब्ध आहे. अतिशय हुशार, कर्तबगार, दूरदृष्टी, अनेक विद्या व कलांचे जाणकार व सर्वगुणसंपन्न असेच छत्रपतींचे व्यक्तिमत्त्व होते.


अवघ्या ३२ वर्षांचे अवघे आयुष्य लाभलेले युवराज संभाजीराजे. या काळात त्यांनी केलेले हे कार्य आणि साहित्यलेखन म्हणजे केवळ अलौकिकाचाच पुरावा होय... ‘स्वधर्मे निधनो श्रेय: परधर्मो भयावह:’चे आजन्म पालन करून मृत्यूस सामोरे जाणार्‍या धर्मवीर साहित्यमेरू शंभूराजांना पुण्यतिथीनिमित्त शब्दकुसुमांजली...



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.