माय ग्रीन सोसायटी वाटणार १ लाख अपसायकल्ड कापडी पिशव्या

02 Mar 2023 18:08:00

my green society


मुंबई (समृद्धी ढमाले):
माय ग्रीन सोसायटी या स्वयंसेवी संस्थेने वापरलेल्या जुन्या कपड्यांपासून कापडी पिशव्या बनवून त्याचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वापरलेल्या कपडे लोकांकडून दान स्वरूपात घेऊन पालघरमधील वनवासी महिलांना त्याचे शिवणकाम करण्याचं काम दिल आहे. या प्रकल्पामुळे प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरल्यामुळे प्रदूषण टाळण्यास मदत होईलच पण त्याबरोबरच २५० हुन अधिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

पालघर जिल्ह्यातील केशव सृष्टी ग्रामविकास योजनेअंतर्गत या पिशव्यांचे शिवणकाम दिले गेले आहे. एका कापडी पिशवीमुळे सुमारे २.५ किलो कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे असे प्रकल्प व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या पिशवीच्या वापरासाठी ग्राहकाला एक ही रुपया मोजावा लागणार नाही. म्हणजेच, दुकानदाराकडून समान विकत घेतल्यानंतर पिशवी घेताना १० रुपये डिपॉझिट म्हणून ठेवायचे आणि पुढच्या वेळी पिशवी परत घेऊन आल्यानंतर ती दुकानदाराकडे परत करून आपले दहा रुपये घेऊ शकतो. याचा तिहेरी फायदा म्हणजे कापडी पिशव्या बाजारात फिरत राहतील, ग्राहकाला पिशव्या घेण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत आणि प्लॅस्टिकचा वापराला ही आळा बसेल.

“बऱ्याचवेळा एखाद्या नवीन प्रयोगाबद्दल तो यशस्वी होईल की नाही याबाबत नागरिक साशंक असतात. पण, यशस्वीतेवर विश्वास ठेवला की अनेक प्रकल्प सफल होतात. माय ग्रीन सोसायटीच्या या प्रकल्पासाठी तरुण पिढीकडून जास्तीत जास्त प्रतिसादाची आम्हाला अपेक्षा आहे. कारण, ते पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक होतील तेव्हाच सगळं शक्य होईल", असे मत माय ग्रीन सोसायटीचे डायरेक्टर विशाल टीबरेवाल यांनी व्यक्त केले आहे. 




my green society



अपसायकल्ड म्हणजे काय ?
आपण साधारणपणे रिसायकल्ड हा शब्द ऐकलेला असतो. वापरलेल्या वस्तूंवर प्रक्रिया नवीन तयार केलेल्या वस्तूच्या प्रक्रियेला रिसायकल म्हंटले जाते. मात्र, वापरलेल्या कपड्यांपासून बनवलेल्या पिशव्यांवर प्रक्रिया केली जात नाही. त्यांचे फक्त शिवणकाम केले जाते, अशावेळी त्याला अपसायकल म्हंटले जाते.



Powered By Sangraha 9.0