‘कलाकारांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणार्या ठाण्यात आजपासून तीन दिवस ‘युनिटी’ या संगीत संमेलनाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. हा संगीतमयी सोहळा सहयोग मंदिर येथे पार पडणार असून ‘युनिटी’ संगीत संमेलनाच्या दशकपूर्ती महोत्सवानिमित्त या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा घेतलेला हा मागोवा...
ठाणे शहर हे कलावंतांचं माहेरघर. अनेक नामवंत विविध क्षेत्रांतील कलाकार, आज आपले कायमचे वसतिस्थान म्हणून ठाणे शहराला अग्रक्रम देताना दिसतात. मात्र, एक काळ असा होता की, ठाणे हे मनोरुग्णालय हॉस्पिटल, पहिली आगगाडी सुरू, श्रीस्थानक आणि डासांचे वसतिस्थान म्हणूनही ओळखले जायचे. झपाट्याने सुधारणा होत गेल्या आणि नगरपालिकेची अत्यंत विस्तारलेली महानगरपालिका झाली. परंतु, १९६०-७०च्या दशकात संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्यासारख्या चित्रपट, संगीत नाटक आणि घरंदाज शास्त्रीय संगीतात अत्यंत मातब्बर, प्रचंड व्यग्र अशा लोकप्रिय कलाकाराने ठाण्याला आपलं ‘नादब्रह्म’द्वारे निवासस्थान म्हणून पसंती दिली आणि तद्नंतर अनेक कलाकारांनी त्यांचा कित्ता गिरवत ठाण्यामध्ये कायमचा मुक्काम रोवला. ठाण्यामध्ये, आज सुमारे १५०-२०० प्रसिद्ध गायक-वादक गुरू आणि कलाकार, त्यांच्या पिढ्या आणि शेकडो कवी, साहित्यिक, लेखक, प्रकाशक, विचारवंत, कला अभ्यासक, संवादक, व्याख्याते, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ आणि नाट्य-चित्रपट कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक कायमचे वास्तव्याला आहेत.
दहा वर्षांपूर्वी २०१३ मध्ये हार्मोनियम वादक अनंत जोशी, ‘वेव्ह्ज म्युझिकल’चे शशांक दाबके आणि प्रसिद्ध, लोकप्रिय विद्याविभूषित, सरस्वतीमंडित संवादिका व्याख्याता निरूपणकार पंडिता धनश्री लेले यांच्या संकल्पनेतून, आपण दरवर्षीप्रमाणे जागतिक महिला दिनाच्या आसपास एक त्रिदिवसीय असा शास्त्रीय संगीतातील गायक-वादक कलाकारांना एकत्रित आणून ’युनिटी संमेलन’ करायचे ठरवले गेले, ज्या मागे मूळ उद्देश असा की, सर्व गायक-गायिका कलाकारांनी एकत्रित येऊन आनंद घेऊन संघटित व्हावे, परिचय अधिक वृद्धिंगत व्हावा. अगदी आपापसात कटुता, दुरावा, अबोला असलाच, तर तो नष्ट व्हावा आणि अत्यंत खेळीमेळीमध्ये हे संमेलन संगीतमय करावे आणि त्याचा रसिकांनाही भरपूर आनंद द्यावा. पण, तीन दिवस सलग नाट्यगृह मिळणे आणि त्याचा खर्च, हे खूप कठीण! त्यातून भारतीय शास्त्रीय संगीताची जशी गायकाला, साधकाला भारतीय बैठक घालून, आसन-मांडी ठोकून बसावे लागते आणि तसे खरे रसिक हेदेखील भारतीय बैठकीतच बसून गाणं ऐकण्याचा आनंद घेऊ इच्छित असतात.
अर्थात, काही सुजाण रसिकांचा गुडघेदुखीमुळे नाईलाज होतो, हे अलाहिदा. परंतु, युवा पिढीने, तरुणाईने हा आनंद भारतीय बैठकीतच घेतला पाहिजे, असं तमाम बुजुर्ग संगीत साधक व रसिक साधक नेहमी सांगतात, ते अगदी सत्य आहे. ठाण्यामध्ये जसे उत्तम गायक, संगीत साधक आहेत, तसेच उत्तम संगीत जाणकार रसिक साधकही ठाण्यामध्ये आहेत, हे विशेष आणि म्हणून त्यासाठी फक्त एकच जागा आमच्या डोळ्यासमोर होती ती म्हणजे योग आणि कलेसाठीच वाहून घेतलेलं आणि आपलं अखंड पावित्र्य राखलेलं रसिकप्रिय, असे घंटाळी नौपाडा भागामधील उद्वाहनाची अर्थात लिफ्टची ही सोय असलेले ‘सहयोग मंदिर’चे वातानुकूलित सभागृह. ’उत्कर्ष मंडळा’च्या पदाधिकार्यांनी यात आपला अबाधित असा (शुल्क न आकारता) महत्त्वपूर्ण सहयोग देऊन हा महोत्सव सुरू झाला. वासंती वर्तक, धनश्री लेले, मुकुंद मराठे, विघ्नेश जोशी अशा निष्णात संवादक कलाकार साथीने प्रथम वर्षी सुमारे ४० संगीतसाधक कलाकार यात सहभागी होते. विविध त्रिधारा अशी संकल्पना दरवर्षी घेऊन या संगीत संमेलनामध्ये, कुणीही मानधन न घेता, कार्यक्रमात ही सतत नावीन्य राखलं गेलं आहे, हे विशेष.
ज्यात ओडव-षाडव संपूर्ण जातीचे राग, ६७८ मात्रा आणि त्यांच्या पटीतील ताल, नवव्या वर्षी एक ते नऊ आद्याक्षर संख्या असलेले राग म्हणजे ‘श्री-१’, ‘देस-२’, ‘बिहाग-३’, ‘बिलावल-४’, ‘भीमपलास-५’ अशाप्रकारे, रचनाकार बंदिशकार, स्त्रीआभूषणे वर्णन बंदिश, अनवट व जोडराग, ठुमरी, गझल, टप्पा, कजरी, होरी, दादरा, भक्तिसंगीत, घराणी, पंडित राम मराठे गायकी परंपरा अर्थात मराठेशाही, सवेश नाट्यसंगीत, जुगलबंदी, महिलादिन निमित्त, वाद्यमेळ कचेरी, तालवाद्य कचेरी, भगवान शंकर, देवी, कृष्णस्तुतीपर बंदिशी, गुरु-शिष्य परंपरा, तीन गटांमध्ये बंदिश अंताक्षरी तसेच विविध संगीतविषयक वैज्ञानिक संज्ञा व त्यांचे अर्थ यावरील प्रश्नमंजुषा, बुजुर्ग गायकांचे ध्वनिमुद्रण ऐकून आवाज ओळखणे इ. विविध संकल्पना घेऊन रसिकांच्या तुडूंब गर्दीत हे कार्यक्रम होऊ लागले. रसिकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे आपापसातील ‘युनिटी’च्या प्रेमाच्या घट्ट विणेमुळे या सर्व कलाकारांना कायमचे बांधून ठेवले आहे. शशांक दाबके, मुकुंद मराठे, सुरेश बापट, अनंत जोशी आणि धनश्री लेले या पंचक मूलभूत चमू, हार्डकोर टीमद्वारे याचं सुंदर नियोजन केलं जातं. कलावंत हा ‘मूडी’, स्वकेंद्रित, स्वाभिमानी असतो, असे म्हटले जाते.
मात्र, शशांक दाबके याच्या नेतृत्वगुणांनी आणि सर्वसमावेशक वृत्ती, हसतमुख, शांत स्वभावाने या सर्व नाजूक अडचणीवरही सहज मात केली गेली आहे. गेली दहा वर्षं अनेक मान्यवर ज्येष्ठ संगीत गायक, अभ्यासक, संशोधक अशांना निमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मानही केला जातो. अलंकार देसाई कृत अत्यंत अल्पदरात उत्कृष्ट ध्वनिव्यवस्था, तर ‘स्वाद केटरिंग’चे कर्वे परिवार उत्तम चहा-नाष्टा-भोजन आदी व्यवस्था पुरवली जाते. यंदा या सोहळ्याचे दहावे वर्ष अत्यंत थाटामाटात असे. संगीतातील ‘दहा थाट’ ही संकल्पना घेऊन साजरे होत आहे. यंदा जानेवारी २०२३पासून ज्येष्ठ साहित्यिक, संपादक आणि साठोत्तरी संगीत नाटकाचे प्रणेते विद्याधर गोखले यांची जन्मशताब्दी चालू झाली असून त्यांच्या नाटकातील काही लोकप्रिय गीते, विविध राग अन् त्याचे थाट अशा संकल्पनेत बसणारी सुंदर नाट्यपदे ही, अण्णा गोखले यांना ‘युनिटी’च्या वतीने आदरांजली म्हणून सादर केली जाणार आहेत. शुक्रवार आणि शनिवार संध्याकाळी ४ पासून व रविवार सकाळी ८.३० असा तीन दिवसीय सोहळा संपन्न होत असून, गेल्या दहा वर्षांत ‘युनिटी’मधील कलाकारांचे योगदान वाढत वाढत, यंदा सुमारे ७० कलाकार सहभागी होत आहेत. यामध्ये युवा आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले असे ज्येष्ठ गायक-वादक गुरु, संगीत तसेच वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर असलेले अनेक कलाकार, संगीत तज्ज्ञ, संगीत संशोधक, अभ्यासक, उत्तम संवादक असे समाविष्ट आहेत.

युवा आणि नव्याने ठाणेकर असे अजून ३० ते ४० कलाकार यात सहभागी होऊ घातले असून, कदाचित लवकरच नजीकच्या वर्षात हा सोहळा पाच दिवसीयदेखील करावा लागेल अथवा वर्षांतून दोनदाही करायची गरज पडेल, असे एकूण चित्र दिसत आहे. रसिकहो, कलाकारांना कार्यक्रम मिळवायचे असतात. मात्र, दुसर्याचे कार्यक्रम ऐकायला वेळ मिळत नाही? असे चित्र दिसते. मात्र, या संमेलनात सर्व कलाकार तिन्ही दिवस पूर्ण वेळ आनंदाने स्वयंप्रेरणेने, स्वयंशिस्तीने उपस्थित राहून इतरांच्या सादरीकरणाचाही तितकाच मनमुराद आनंद घेतात, हे विशेष. अनेक युवा गायक-वादक कलाकारांबरोबरच अमृता दीक्षित, शर्वरी कुलकर्णी-बोरकर, वृंदा दाभोळकर असे अनेक उत्तम-उत्तम संवादक ही यात तयार झाले आहेत. जोडले जात आहेत. ‘युनिटी’ अर्थात ‘एकीचे संगीत’ या माध्यमातून एकरूप व्हा. आपली कला अधिक वृद्धिंगत करा, असाच जणू संदेश ‘युनिटी’ने दिला आहे.
ठाण्याचा हा कलाकारांचा ‘युनिटी’ आदर्श घेऊन रत्नागिरी, डोंबिवली, विलेपार्ले, दापोली, नागपूर, नाशिक इत्यादी ठिकाणी अशी संमेलने साजरी होऊ लागली आहेत. मात्र, आदर्शवत अशा प्रारंभ मान मिळवणार्या या ठाण्याच्या ‘युनिटी महोत्सवा’ने अत्यंत रेखीव उत्कृष्ट आरेखन, नियोजन, आयोजन, संयोजन, मनमोहक विविध अनोख्या कल्पक संकल्पना, घराणेदार गायकी, सतत उत्तमाचा ध्यास, सामंजस्य, दिलदार वृत्ती, गुरुजनांच्या ठायी आदरभाव, निर्मितक्षम कलेचा परीसस्पर्श, कलेद्वारे एकजुटीचे महत्त्व, सांगीतिक गमतीजमती, किस्से, आठवणी यांची रेलचेल, आनंददायी चैतन्यमय ऊर्जात्मक वातावरण, कलाकार आणि रसिक (उत्तम सुयोग्य दाद) यांचे अतूट नाते अशांनी आठवणींची साठवण जपत... सातत्याची दहा वर्षे अर्थात दशकपूर्ती सोहोळा यंदा करत आपले वेगळेपण जपले आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ असे आपण म्हणतो खरे. मात्र, ठाण्याच्या बाबतीत तर ‘ठाणे तेथे अखंड गाणे, विविध कलांचे भरभरून लेणे आणि रसिकांचे देणे’ असेच या ‘युनिटी’ दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने म्हणावेसे वाटते !!!
-मुकुंद मराठे
(लेखक हे गायक संगीत अभ्यासक आहेत.)