मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर आता दिल्लीतील शिवसेना संसदीय पक्षाचे कार्यालयही त्यांना गमवावे लागणार का? असा प्रश्न उद्धभवत आहे. संसदेच्या शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो चोरी झाल्याची तक्रार खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
विनायक राऊत यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 'तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आमचे संसदीय पक्ष कार्यालय शिवसेना, संस्थापक व प्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो होता. पण, फेब्रुवारी २०२३ मध्ये तो चोरीला गेला आहे. तर, विनंती आहे की, आपण तो लवकरात लवकर शोधुन तो पुन्हा जागेवर लावावा.
शिवसेना कार्यालयात बदल...
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर संसदेतील कार्यालयाचा ताबा शिवसेनेकडे देण्यात आला आहे. त्यानंतर आता कार्यालयामध्ये बदलांना प्रारंभ झाला आहे. शिवसेनेच्या संसदेतील कार्यालयामध्ये यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. त्यानंतर आता ती छायाचित्रे काढण्यात आली असून त्याजागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.
दिल्लीतील शिवसेनेचे कार्यालय शिवसेनेला दिल्याचे पत्र खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाने लोकसभा सचिवालयाने पाठवले होते. त्यानंतर आता संसदेच्या शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचा फोटो काढला असून या जागी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहे.