‘आय अ‍ॅम ग्रेट'

02 Mar 2023 20:33:01
Rahul Gandhi compared Adani to East India Company


मम्मा, मी अदानींना ते ‘ईस्ट इंडिया’ कंपनीसारखे आहेत असे म्हणालो. आता मीसारखे असेच म्हणत राहणार. मागे नाही का ‘राफेल...राफेल’ म्हणत होतो. नंतर मग सावरकरांविषयी असेच काहीबाही बोलत राहिलो. आता अदानी...अदानी कधीपर्यंत म्हणायचे आहे मम्मा? हो, पण तू तर राजकीय संन्यास घेतलास ना? तुला आता विचारू नको का? मग काय करू प्रियांकाताईला की वाड्रा भावजींना विचारू. नकोच मुळी. ती ताईबाईसारखी लुडबूड करते माझ्या कामात. मी तिकडे तपश्चर्या करत होतो. अग तपश्चर्या म्हणजे माझी ‘भारत जोडो यात्रा’ करत होतो, तर ही पोहोचली हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये. सख्खा भाऊ इकडे तपश्चर्या करतो आणि ही तिकडे भाषण ठोकत होती. मम्मा, तिला माझा पत्ता कट करायचा आहे वाटतं. हं तर मी अदानी आणि ‘ईस्ट इंडिया’बद्दल बोलतोय सध्या. ‘ईस्ट इंडिया’वाले कसे भारतातल्या सगळ्या सोईसुविधांना बळाकवत होतेे, तसे अदानीपण बळकावतात असे मी म्हणालो. ‘ईस्ट इंडिया’ म्हणजे पूर्व भारत ना? पूर्व भारतला ममता आंटींचा बंगाल पण आहे ना? अच्छा, प. बंगालचा आणि अदानीचा काही तरी संबंध आहे वाटते? मम्मा, ते ह्युम खापरपणजोबांचे आणि काँग्रेसचे नाते शोध शोध असे काही लोक मला म्हणतात. कोण आहेत गं ते ह्युम अंकल? मम्मा, लोक आणखीन काय म्हणतात माहिती आहे? पंतप्रधान होण्याची कोणतीच आशा नसल्याने आणि काँग्रेस पक्षालाही मोदी अंकलच्या राज्यात ‘अच्छे दिन’ येणार नसल्याने तू राजकीय संन्यास घेतला. मम्मा, पण माझा तुला पाठिंबा आहे बरं. कारण, एका तलवारीत दोन म्यान का काय? नाही नाही, एका म्यानमध्ये दोन तलवारी कशा राहणार? आपल्या पक्षात आपण दोघे नेते कसे राहणार? कुणीतरी एकच नेता हवा. एक म्हणजे मीच ना? अरे हे आवाज कुणाचे? हे कोण म्हणत की, डोळे मिचकावून आणि दाढी वाढवून मी टाईमपास करतो.. हे कोण म्हणतय? मम्माने राजकीय संन्यास घेतला, म्हणण्यापेक्षा जनतेनेच तिला तो घ्यायला लावला. पुढे मलाही असेच सत्तेशिवाय कंटाळून राजकीय संन्यास घ्यावा लागेल? जाऊ दे मला काय? सध्या अदानी एके अदानी म्हणायचं आहे. मम्मा, मी इतकं बोलतो तरी मोदीच जगात लोकप्रिय कसे ग? हं आता कळले मीच बोलून बोलून त्यांना प्रसिद्ध करतो. ओह मी ‘ऑलवेज ग्रेटच!’ लोकांना राहुल ‘द ग्रेट’ कळतच नाही. पप्पू कुठचे!

 
मनीष तो एक झाकी हैं...



‘मेल कराती मधुशाला, हाय कमबख्त तुने तो पि ही नही,’ अशी वाक्य आता कोणत्या तोंडाने बोलणार? दिल्लीच्या ‘शराब इंडस्ट्रिज’मध्ये शांतता आहे. दारूकामावरून मनीष सिसोदियासारख्या नेत्याला झाली. बरं, मनीष सिसोदिया काय साधासुधा गल्लीत दारूचे फुगे विकणारा होता? की गटार किंवा कचराकुंडी लगत सडलेल्या कचर्‍याची, फळाची दारू बनवणारा माणूस होता? छे छे, मनीष या सगळ्यांचा बाप माणूसच! मनीष म्हणजे भ्रष्टाचार विरोधात आपण कसे स्वच्छ आहोत आणि आपल्याशिवाय सुशिक्षित सज्जनांचा कुणीच कैवारी नाही, अशी थाप मारणार्‍या आम आदमी पार्टी अर्थात ‘आप’चे नेते आहेत. थोडी थोडकी की काय, राज्यातील ३३ खात्यांपैकी १८ खात्यांचे मनीष मंत्री होते. मदिरापान आणि शिक्षण व्यवस्था या दोन्ही खात्यांचा कारभारी म्हणून मनीष काम करत होते. आता ही दोन्ही परस्पर विरोधी खाती एकच माणूस कसा काय सांभाळत असेल? हा फालतू प्रश्न पडूच देऊ नका. या १८ खात्यांना न्याय देऊन खाणे, झोपणं, नैसर्गिक विधी आणि आणखीन मूलभूत गरजा मनीष २४ तासांत कसे भागावायचे? अशी शंकासुद्धा आणू नका.अण्णा हजारेंना आणि त्यांच्या तत्वांना लिलया टाटा बाय बाय करत त्यांचे शिष्य अरविंद केजरीवाल दिल्लीचे सत्ताधीश झाले. मुफ्त बिजली, मुक्ती पानी वगैरे वगैरे म्हणता म्हणता दिल्लीत या पार्टीच्या शासनाने असे काही केले की, विचारता सोय नाही. ‘मुफ्त मुफ्त’च्या आरोळ्यात दिल्लीच्या जीवनात ‘मुफ्त’मध्ये गदारोळ, दंगली आणि भ्रष्टाचार छान माजला. शाहीनबाग आंदोलन म्हणून नका, कृषी कायद्याविरोधात आंदोलन म्हणू नका. सगळा देश शांत, पण दिल्ली धुमसतच राहिली. बरं मुप्त बिजली, पानी वगैरे दिल्लीच्या जनतेला मिळाल्या का? यावर सर्वेक्षणहोणे गरजेचे आहे. असो. विषयांतर झाले, तर मनीष सिसोदियाला दारू भ्रष्टाचार प्रकरणात अटक झाली आणि ‘आप’चे वाभाडे निघाले. पण, अरविंद केजरीवाल यावरही साधनसुचितेच्या खोट्या गप्पा हाणणार. या माणसाने स्वतःजवळ एकही खाते ठेवले नाही. मात्र, नियंत्रण सगळ्याच खात्यांवर ठेवले. मंत्रिमंडळातील मंत्री खात्यात कोणताही भ्रष्टाचार करत असेल, तर तो मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल, यावर कोण विश्वास ठेवणार? ‘आप’चे पाप किती काळ झाकणार? ‘मनीष तो एक झाकी हैं केजरीवाल बाकी हैं’ असे काही लोक म्हणत आहेत बरं का!


Powered By Sangraha 9.0