आगळ्या समाजकार्याचा श्री‘गणेशा’

02 Mar 2023 19:57:16
Ganesh Geedh


 समाजकार्यासाठी पैसाच खर्च करायला हवा, ही समजूत चुकीची आहे, हे सिद्ध करून अनेकांना मदतीचे हात देणारा गणेश गीध आज समृद्ध आणि समाधानी जीवन जगतो आहे. त्याच्याविषयी...

 
चौकटीतलं चौकोनी आयुष्य जगायचं नाही, हे मनाशी ठरवूनच त्याने आठवीनंतर शाळा सोडली. खिडकीबाहेरचं जग त्याला खुणावू लागलं होतं. लहानसहान मेकॅनिकची कामं करता करता प्राण्यांसाठी बचावकार्य करायला त्याने सुरुवात केली. घोणस पकडताना त्याने आपल्या उजव्या हाताचे एक बोट पूर्णपणे गमावले. आयुष्याच्या पूर्वार्धातही आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव गमावून त्याने धीर सोडला नाही. गिर्यारोहण करता करता साहसी खेळ आणि प्रस्तरारोहण करायला शिकला.प्रस्तरारोहण म्हणजे उंच किंवा उभ्या कड्यांवर एखाद्या उपकरण वगैरेच्या मदतीने चढण्याची क्रिया.

‘डेला रिसॉर्ट’मध्ये ‘रिक्रेशन असिस्टंट’ म्हणून नोकरी करायला सुरुवात केली आणि आता त्याच कंपनीचा ‘एजीएम’ म्हणून तो काम पाहतो. ‘डेला अ‍ॅडव्हेंचर पार्क’ चालू झाले, ज्यांचा पहिला कर्मचारी आहे गणेश गीध. नोकरी, पैसा आणि सन्मान मिळवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं नाही, तर अनुभव महत्त्वाचा आहे, असं गणेश मानतो. लहान असताना पैसे नसल्याने ‘व्हॅली क्रॉसिंग’ करता आलं नाही म्हणून तो प्रबळगडावरून रडत रडत घरी आला आणि आज तो कित्येक साहसी खेळ खेळू पाहणार्‍या गरीब मुलांना मोफत प्रशिक्षण देतो. त्यानंतर माहुली किल्ल्यावर ‘शिवगर्जना’चा ‘बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्स’ केला आणि त्यानंतर लोणावळ्यात गेल्यावर ‘शिवदुर्ग’ टीमसोबत काम सुरु केलं.
 
‘शिवदुर्ग’मधून गणेशला लहान समजून त्याची बोळवण केली. इतका लहान मुलगा ‘तैल बैला’ आणि ‘ड्युक्स’ कसे करू शकेल, असे वाटून त्याची खिल्ली उडवली. परंतु, रोहित वर्तक गणेशला जेव्हा भेटला, तेव्हा गणेश त्याला सरसगड आणि ड्युक्सला प्रस्तरारोहणासाठी घेऊन गेला. तीन तासांत जेव्हा ‘ड्युक्स’ सर झाला, तेव्हा ‘शिवदुर्ग’च्या टीमचा गणेशवर विश्वास बसला. ‘शिवदुर्ग’ संस्थेशी संलग्न झाल्यावर गणेशने अनेक कामे केली. ‘शिवदुर्ग’ची पहिली प्रस्तरारोहण भिंत सुरु केली. लोणावळ्यात अपघात फार होत. त्यामुळे ‘रेस्क्यू’ करणे सुरु केले.
 
 
हा गणेशचा शिकण्याचा आणि अनुभव घेण्याचा काळ होता. ‘शिवदुर्ग’ संस्थेतून बाहेर पडल्यानंतर गणेशने खर्‍या अर्थाने समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली. अर्थार्जनही व्यवस्थित होत असल्याने त्याने अनेकांना स्वखर्चाने ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. ‘डेला अ‍ॅडव्हेंचर्स’ सुरु होतेच. प्रस्तरारोहणाची भिंत सुरु केली. या भिंतीवर दररोज संध्याकाळी ५ ते ७ दरम्यान मोफत मुलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या परिसरातील अनेक कातकरी मुले या भिंतीवर सरावासाठी येतात. सराव झाल्यानंतर गणेश त्यांना जवळपासच्या डोंगरांवर प्रस्तरारोहणासाठी स्वखर्चाने घेऊन जातो.
 
या क्षेत्रात अनेक नोकरीच्या संधी आहेत. पेंटिंग, रिपेअरिंग, क्लीनिंग करण्यासाठी कित्येकदा लटकून काम करावं लागतं. अशावेळी किमान अनुभव आणि प्रशिक्षण असं आवश्यक असतं. या गरीब डोंगरातल्या मुलांना तेवढ्याच नोकर्‍या मिळतात. अंगभूत चापल्य आणि धैर्य असतंच, जोडीला प्रशिक्षणाचे बळ पंखात गणेश भरतो. अनेक घरे आज त्याच्यामुळे चालतात, याचे त्याला समाधान वाटते. आज लोणावळा परिसरात काही अपघात घडले, तर आपल्या टीमसोबत तो घटनास्थळी पोहोचतो. पोलिसांना मदत करतो. कितीतरी फूट खोल कड्यावरून ‘रॅपलिंग’ करत उतरतो आणि मृतदेह बांधून वर खेचून काढले जातात. कोणत्याही वेळी, कुठेही मदत कार्यासाठी जावं लागतं. अशावेळी कोणतीही कुरकूर न करता कशाचीही अपेक्षा न धरता, गणेश घटनास्थळी उपस्थित असतो.
 
 
अभेद्य वाटणारा आणि तरीही सर्व दुर्गप्रेमींना भुरळ घालणारा कोकणकडा ‘शिवदुर्ग’शी संलग्न असताना गणेशने सर केला. मोजक्या लोकांनी सर केलेल्या या कड्यावर चढून पाहण्याचा प्रयत्न मुलींनी केलासुद्धा नव्हता. मुलींना तिथे जायचे आहे म्हणून दोन मुलींना त्याने कोकणकडा चढण्याची संधी दिली. प्रशिक्षण आणि भक्कम आधार दिला. संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलींसाठी ‘बेसाल्ट क्वीन’ मोहीम सुरु केली. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून मुली आल्या होत्या. काही मुलींना प्रस्तरारोहण करता येत होते, तर काहींना पूर्णपणे सुरुवातीपासून शिकवावे लागले. महाराष्ट्रातील सर्व भागांतून आलेल्या मुलींची निवासव्यवस्था व भोजन व्यवस्था करायची होती. ज्या मुलींच्या पालकांना हे शक्य नव्हते, अशा मुलींसाठी आर्थिक मदत मिळवून दिली. तसेच काही मुलींचा खर्च स्वतःहून स्वीकारला. ही मोहीम होती ‘बेसाल्ट क्वीन्स.’ सर्व प्रकारचे सहकार्य करत आणि विश्वासाचे पंख देत त्याने मुलींना उडायला शिकवलं. मुली सरासर कडे चढून जातात हे पाहिलं की त्याला कृतार्थ वाटतं. प्राण्यांचे व माणसांचे बचाव कार्य व वंचितांच्या पंखांना बळ देण्याचे कार्य तो यापुढेही अविरत करत राहील. पुढील वाटचालीसाठी गणेशला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0