परदेशी कुरियरमधून अमली पदार्थांची तस्करी?

02 Mar 2023 16:11:20
Drug smuggling by foreign courier
 
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अमली पदार्थांचे सेवन व विक्री रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या रासायनिक कंपन्यांची दरमहा विशेष गटामार्फत तपासणीसह वारंवार एकाच पत्त्यावरून येणार्‍या तसेच, परदेशातून येणार्‍या कुरियरवर लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिले आहेत.

जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक नुकतीच पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे झाली. यावेळी समितीचे सदस्य तथा अतिरिक्त आयुक्त राहुल कुमार, राज्य उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक चारुदत्त हांडे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त राजेश चौधरी, ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’चे अधीक्षक अमोल मोरे, टपाल विभागाच्या अधीक्षिका अस्मिता सिंग आदी उपस्थित होते.
 
भिवंडीतील गोदामे व ‘एमआयडीसी’तील बंद कंपन्यांवर पोलिसांची करडी नजर
 
ठाणे जिल्ह्यात अमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक देशमाने यांनी यावेळी दिल्या. तसेच, जिल्ह्यात अमली पदार्थाविषयी जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ग्रामीण भागातील भिवंडी येथील गोदामांची पोलिसांच्या मदतीने तपासणीकरण्याच्या तसेच, बंद असलेल्या ‘एमआयडीसी’मधील कंपन्यांची माहिती गोळा करण्याच्या सूचना देशमाने यांनी यावेळी दिल्या.

Powered By Sangraha 9.0