मानवमुक्तीचा लढा - चवदार तळे सत्याग्रह

    19-Mar-2023
Total Views |
chavdar-tal satyagraha

 
महाराष्ट्रात वंचित, शोषित समाजाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. सवर्ण समाजाने या समाजाला पाणवठा आणि मंदिर प्रवेशास बंदी होती. वर्षानुवर्षे अशी हीन दर्जाची वागणूक मिळत होती. त्याकरिता अनेक महापुरुषांनी, समाजसुधारकांनी जागृती करण्यासाठी प्रयत्न केले, पण त्याला म्हणावे तितके यश येत नव्हते, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुमोल योगदान व समर्पक नेतृत्वाखाली बहुजन समाज जागृत झाला. ‘शिका, लढा आणि संघटित व्हा’ असा मंत्र त्यांनी या बहिष्कृत, शोषित, पीडित समाजाला दिला. यातूनच महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह दि. १९ व २० मार्च, १९२७ रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. यामुळे सार्वजनिक पाणवठा बहुजन समाजासाठी खुला झाला. या लढ्यास आज दि. २० मार्च रोजी ९६ वर्षे पूर्ण होत आहेत. या लढ्याच्या अनुषंगाने लिहिलेला हा लेख...

महाराष्ट्राच्या भूमीवर निसर्ग भरभरून प्रसन्न झाला आहे. ‘कणखर देशा, राकट देशा’ असे वर्णन प्रसिद्ध आहे. येथेच भक्ती व शक्तीचा अनोखा संगम झाला आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, संत गोराकुंभार, संत चोखामेळा यांसारख्या संतांनी याच भूमीत निद्रिस्त झालेल्या समाजात जागृती केली, तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, बाजीराव पेशवे यांसारख्या पराक्रमी वीरांनी परकीय आक्रमकांचे आक्रमणास चोख प्रत्युत्तर दिले. जसा हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे, तसेच बहुमोल योगदान विठ्ठल रामजी शिंदे, महर्षि कर्वे, संत गाडगे महाराज, वस्ताद लहुजी, अण्णा भाऊ साठे, गोपाळ गणेश आगरकर यांसारखे विचारवंत व समाज सुधारकांनी दिले आहे. आपण सर्वांनी या महापुरुषांना जातीच्या कुंपणात जखडून ठेवले आहे, पण या सगळ्या महापुरुषांनी सर्व समाजासाठी कार्य केले, हे आपण विसरत चाललो आहोत. महाड येथील चवदार तळे सत्याग्रह हा वंचित-शोषित समाजाच्या चळवळीचा प्रारंभ होता. या चळवळीला बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे गती मिळाली.


आंबेडकरपूर्व काळात बहुजन समाजाने आपल्यावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केले नव्हते, असे नाही, पण एकूण या समाजाकडून आंबेडकरांना जसा भरघोस प्रतिसाद लाभला, तसा आधीच्या चळवळीतील कार्यकर्त्यांना लाभला नव्हता. या लढ्याने बाबासाहेबांचा उदय झाला आणि सगळेच चित्र पालटून गेले़ आज या संग्रामाला ९६ वर्षे पूर्ण होत आहेत. २० मार्च, १९२७ रोजी ही क्रांतिकारक घटना महाड येथे घडली. अजून चार वर्षांनी या संग्रामास १०० वर्षे पूर्ण होतील, पण दोन हजार वर्षे तथाकथित उच्चवर्णीय म्हणवलेल्या प्रचलित समाजाकडून या बहुजन समाजाला जनावरांपेक्षा हीन दर्जाची वागणूक मिळत होती. या बहुजन समाजाला सार्वजनिक पाणवठा व देवालय येथे प्रवेश करण्यासाठी बंदी होती. सवर्ण समाज व आमचे हक्क समान आहेत, अशी या वंचित समाजाची धारणा होती. सवर्ण समाजास मंदिर व पाणवठा या दोन्ही ठिकाणी मुसलमान लोक व जनावरे यांनी प्रवेश केला तरी चालत असे, पण आपलेच धर्मबांधव असणार्‍या बहुजन समाजातील लोकांना प्रवेश नाकारत, हे सर्व अन्याय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोसले होते. म्हणूनच आपल्या समाजाच्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटत राहिले, पण गेल्या १०० वर्षांच्या कालावधीत बहिष्कृत, शोषित, पीडित, वंचित, बहुजन समाजास आज मोठ्या अस्मितेने स्वबळावर कुणाचाही टेकू न घेता जगता येत आहे, आज या समाजाला स्वतःचा आवाज गवसला आहे, स्वत:चे हरवलेले सत्व सापडले आहे.

फ्रेंच रशियन किवा अमेरिकन राज्यक्रांतीस त्या-त्या देशात महत्त्व आहे, हेच महत्त्व वंचित-पीडित समाजाच्या या महाडच्या संग्रामास लाभले आहे. क्रांती ही जशी रक्तरंजित असते, तशी ती रक्तविहीनसुद्धा असू शकते. आजवर ज्या क्रांती झाल्या त्या सत्तांतराच्या प्रक्रियेतून झाल्या, त्यात हिंसाचार- रक्तपात अपरिहार्य ठरला, पण सामाजिक क्रांती ही मानसिक परिवर्तनाला चालना देणारी असते. तिच्यात रक्तपाताला वाव नसतो. अशाच प्रकारची रक्तविहीन क्रांती तथागत गौतम बुद्धाने केली. महाड येथील लढा हा समाजक्रांतीचा होता. त्याचा उदय रक्तपातातून झाला. महाड येथील चवदार तळ्याच्या पाण्याचे निमित्त होऊन रूढीप्रिय समाजाने बहुजन समाजाचे रक्त सांडविले. त्या रक्तातून समाजक्रांतीची मशाल पेटवली गेली. निद्रिस्त असलेल्या समाजाच्या जाणिवा उफाळून आल्या आणि शतकानुशतके अंध:काराचे जीवन जगणार्‍या व गुलामगिरीत चाचपडून राहिलेल्या समाजाला माणुसकी माहीत नव्हती. या माणुसकीची जाणीव या समाज लढ्याने करुन दिली, समान हक्काचा पहिला हुंकार या क्रांतीतून उमटला, कित्येक शतके मुक राहिलेला वंचित समाज आता हक्काची भाषा बोलू लागला आहे.


chavdar-tal satyagraha


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विलायतेत शिकून आल्यावर आपल्या समाज बांधवांच्या हक्कासाठी कल्याणासाठी स्वत:चे जीवन समर्पित करण्याचा विडा उचलला. २० जुलै, १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना करून ’शिका संघटित व्हा आणि लढा’ या त्रिसूत्रीनुसार आपली वाटचाल सुरु केली. या त्रिसूत्रीच्या आधाराने या बहिष्कृत पद्धतीत समाजाचे पुनरुत्थान होणार होते. त्यासाठी या समाजात जागृती करणे आवश्यक होते. आचार- विचार-उच्चार या सुसंस्कारातून बहुजन समाजाची जडणघडण व्हावी, याकरिता मोठी परिषद बोलवावी, असा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात येऊ लागला. त्यांनी केलेला विचार सर्व अनुयायांना पसंत पडला. बाबासाहेबांचे बरेचसे सहकारी कोकणातील होते, पण तेथील समाज जागृत झाला नव्हता म्हणून विचारमंथन होऊन महाड येथे दि. १९ व २० मार्च रोजी परिषद घेण्याचे ठरले. बहिष्कृत हितकारिणी सभेची ही पहिलीच मोठी परिषद होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारावे म्हणून सहकार्यांनी आग्रह केला, बरेचसे कार्यकर्ते महाड परिसरातील होते, तर समाजसुधारणेचा पुरस्कार करणार्‍या सवर्ण समाजाने या परिषदेला मदत केली.


chavdar-tal satyagraha


दि. १९ व २० मार्च, १९२७ रोजी गावोगावीचे लोक महाड येथील परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवार, दि. १९ मार्च रोजी सिं. प्रा. ना. मंडळीचे नाट्यगृह किंवा वीरेश्वर थिएटर लोकांनी खच्चून भरले होते. परिषदेचे उद्घाटन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचारप्रवर्तक व समर्पक विचार मांडले. या शोषित-पीडित समाजाची स्थिती वर्णन करून आचार-विचार-उच्चार याची माहिती झाली पाहिजे. भीक मागून, लाचार जीवन व्यतित करण्यापेक्षा स्वाभिमानी जीवन जगले पाहिजे. शिक्षणाचे महत्त्व जाणले पाहिजे. या बाबासाहेबांच्या विचारांनी सर्व उपस्थित भारावून गेले, तसेच पहिल्या दिवसाचे कामकाज आटोपल्यानंतर महाड नगरपालिकेने सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक पाणवठ्याचा ठराव ०५ जानेवारी, १९२४ रोजी केला होता, त्याची अंमलबजावणी महाडच्या चवदार तळ्याच्या संदर्भात कशी करता येईल, यावर विचारविनिमय झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समारोपाचे भाषण केल्यावर अनंत विनायक चित्रे यांनी चवदार तळ्यासंबंधी विचार बोलून दाखविला आज ही परिषद भरली आहे. ती महत्त्वाचे कार्य केल्याशिवाय संपू नये, असे मला वाटते. या महाड शहरात वंचित-पीडित समाजाची पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे, ही गैरसोय दूर व्हावी म्हणून महाड नगरपालिकेने येथील सर्व तळी, सर्व जातिधर्माच्या लोकांना खुली आहेत, असा ठराव करून बरेच दिवस झाले, पण त्या तळ्यावर पाणी भरायचा प्रघात बहुजन समाजाकडून झाला नाही तर तो प्रघात या परिषदेने पाडून दिला, तर या परिषदेने एक महत्त्वाची कामगिरी केली आहे, असे म्हणता येईल तेव्हा आपण सर्वांनी अध्यक्षासह महाड येथील चवदार तळ्यात प्रवेश करून पाणी घेऊ.


त्यानंतर सर्व लोक बाबासाहेबांच्या मागोमाग सभामंडपातून बाहेर पडले, त्या सर्व लोकांची मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक महाड शहरातील सर्व पेठातून अत्यंत शांतपणे चवदार तळ्यावर गेली. चवदार तळ्यावर पोहोचल्यावर प्रथम बाबासाहेब शहाबहिरी घाटाच्या पायर्‍या उतरून पाण्यात उतरले. खाली वाकून ओंजळ भरली व ते पाणी प्यायले. सर्व बहुजन समाजातील जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार केला. त्यानंतर सर्वजण चवदार तळ्याचे पाणी प्यायले. क्रांतीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सर्व लोकांच्या चेहर्‍यावर तेज उमटले. आजवर निस्तेज असणारे चेहरे आनंदाने फुलून गेले. लोकांना नवी जाणीव होऊ लागली. शतकानुशतके जखडून गेलेल्या परंपरेच्या शृंखला तोडल्याचा भाव प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होता. आनंदाला उधाण आले होते. भारताच्या जीवनात अभूतपूर्व घटना घडली होती तेथे उपस्थित असलेल्या वंचित-शोषित-पीडित समाजाच्या नागरिकांना आपण या समाजक्रांतीचे अग्रदूत ठरू, अशी पुसटशीही कल्पना नव्हती. हा समाजक्रांतीचा वसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे सुरु केला आणि आयुष्यभर चालू ठेवला, तसेच मंदिरातही वंचित शोषित समाजाच्या लोकांना प्रवेश नव्हता. दि. २ मार्च १९३६ नाशिकमधील काळाराम मंदिर प्रवेशासाठी यशस्वी आंदोलन केले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजन समाजाचे तारणहार प्रेरणास्रोत बनले. जो मतदानाचा हक्क ब्रिटन व अमेरिकन महिलांना मिळत नव्हता तो अधिकार मिळवण्यासाठी वेळोवेळी प्रखर लढा द्यावा लागला, पण भारतीय महिलांना भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीपासून मतदानाचा अधिकार हक्क मिळाला. कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुमोल योगदानामुळे भारतात लोकशाही गेली ७५ वर्षे यशस्वीपणे अविरत वाटचाल करत आहे आणि बहुजन समाजालाही समानतेची वागणूक मिळत आहे.
-सचिन साठ्ये

 
(लेखक समरसता साहित्य परिषद, पुणे महानगर कार्यवाह आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.