अवघ्या हिंदुस्तानाचे आदर्श धर्मवीर छत्रपती संभाजी आहेत म्हणून त्यांचं नाव शहरास योग्य : आमदार राजासिंह ठाकुर

महाराष्ट्राच्या भूमीत मुघलांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडू : आमदार छ्त्रपती शिवेंद्रराजे भोसले

    19-Mar-2023
Total Views |
Rajasingh Thakur

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर नामकरण समर्थनात दि.१९ मार्च रोजी काढलेल्या सकल हिंदू समाजाच्या मोर्च्यात लाखोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले. दरम्यान छत्रपती संभाजीनगर हेच नाव कायम राहील ते आता कोणीही बदलू शकणार नाही. छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी हे अखिल हिंदुस्तानचे प्रेरणास्थान आहेत. या नामकरणास विरोध व्हायला नको होता. परंतु काही स्वार्थी आणि जातीयवादी राजकारण करणाऱ्यांनी आपले खरे रूप दाखवले आहे. छ्त्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते असे सांगितले जाते, तसे खरंच असते तर छत्रपती संभाजी या नावाला विरोध केला नसता असे प्रतिपादन तेलंगणाचे भाजपा आमदार राजासिंह ठाकूर यांनी केली. समारोप भाषणात ते बोलत होते.

 
छत्रपती संभाजीनगर नामकरणास केंद्र सरकार व राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर सर्व नागरिकात आनंदाचे वातावरण आहे. त्याला काही समाजकंटक व हिंदू धर्मविरोधी लोकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे तो सहन होणार नाही. औरंगजेब हा कोणाचा आदर्श असू शकत नाही. त्याने स्वतःच्या मुलाचा आणि पित्याचा खून केला. लोकांवर अत्याचार केले. हिंदूंना छळले. धर्मांतर घडवून आणले. औरंगजेब हा परकीय आक्रमक व भारताचा शत्रू होता. त्यामुळे त्याचे नाव पुसून छत्रपती संभाजीनगर केले, ते सरकारने योग्य पाऊल उचलले आहे असे राजासिंह ठाकुर म्हणाले.
 

Shivendraraje Bhosale

याचवेळी आमदार छ्त्रपती शिवेंद्र राजे भोसले यांनी आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यात औरंगजेब आणि पश्चिम महाराष्ट्रात अफझलखानाचे उदात्तीकरण सुरू आहे असे सांगितले. ज्या परकीय आक्रमक मुघलांनी इथल्या लोकांवर अन्याय केला, संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मंदिरे तोडली त्यांचे उदात्तीकरण होऊ शकत नाही. आपण संघटित राहिलो तर अश्या गोष्टी घडणार नाहीत असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके यांनी औरंगजेब भारताचा शत्रू होता आणि त्याच्या कबरीवर जाणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे मागणी केली. टिपू सुलतान हा सुद्धा फ्रेंच आणि पोर्तुगिजांचा दलाल होता. मराठ्यांचा शत्रू होता. त्यामुळे त्याची जयंती होऊ देणार नाही असेही ते म्हणाले.


Shivendraraje Bhosale


यावेळी ग्लोबल महानुभव पंथाचे सुदर्शन महाराज कपाटे, हभप जनार्दन महाराज मेटे, नामदार मंत्री महोदय व जिल्हा पालक मंत्री संदीपान भूमरे,भाजपा जिल्हा शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, शिवसेना शहर जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, हिंदू जनजागृती समितीच्या श्रीमती प्रियांका लोणे, मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर, आर आर पाटील फाउंडेशन चे अध्यक्ष विनोद पाटील, कृपया विरूपाक्ष स्वामी महाराज, हभप नितीन आंधळे महाराज, हिंदू जागरण मंचचे भाग्यतुषार जोशी व अंबादास अंभोरे आदी मान्यवर उपस्थित होते. मोर्चाच्या सुरुवातीस क्रांती चौक येथे भारतमाता, छ्त्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाहीर सुरेश जाधव यांनी पोवाडा सादर केला.


क्रांती चौक येथून सकाळी 11 वाजता निघालेल्या या मोर्च्यात मोठ्या संख्येने महिला, पुरुष, तरुणवर्ग व हिंदू समाजातील सर्व संस्था, संघटना, पक्ष , नेते, सामाजिक कार्यकर्ते व सज्जनशक्ती मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर नामकरण समर्थन सोबतच राज्यात लव जिहाद, गोहत्या व धर्मांतर विरोधी कायदा लवकरात लवकर लागू करावी अशी मागणी करण्यात आली. महात्मा फुले चौकात मोर्चाचा समारोप करण्यात आला.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.