गोंडवाना, अठराशे सत्तावन..!

    19-Mar-2023
Total Views |
Rani_Durgavati


१८५७. ऐन उन्हाळ्यात अवघा उत्तर भारत घगधगत असताना, देशाच्या अगदी मध्यावर, घनदाट जंगलात असलेला गोंडवाना सुध्दा शांत नव्हता. गढ-मंडला म्हणजे गोंडवान्याचे स्फूर्ति केंद्र. राणी दुर्गावती चे हे राज्य. या राज्यातही हालचाली वाढल्या होत्या. कमळाची फुलं आणि चपात्यांची देवघेव होत होती. बैराग्यांची उठबस ह्या लहानश्या राज्यात अचानक वाढली होती. हस्ते – परहस्ते दिल्ली आणि मेरठ च्या बातम्या येत होत्या. २६ फेब्रुवारी पासून बंगाल च्या बराकपुर मधून सुरू झालेलं हे आंदोलन आता देशभर पसरत चाललं होतं. नवीन आलेल्या बातम्यांनुसार दिल्ली, कानपुर, लखनौ सारख्या महत्वाच्या ठिकाणांवर, आंदोलन करणार्‍या सैनिकांचा कब्जा झालेला होता. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झांशी ची राणी लक्ष्मीबाई या सर्वांनी एक जबरदस्त स्फुल्लिंग चेतवलं होतं. बहादूर शाह जफर हे दिल्लीचे बादशहा घोषित झाले होते. जणू काही इंग्रजांना फेकून देऊन, देश स्वातंत्र्याकडे वाटचाल करत होता.... कमीत कमी येणार्‍या बातम्यांचा सूर तरी असाच होता.


गढ-मंडला च्या गढा पुरवा ह्या भागात, गोंडवान्याच्या तत्कालीन राजांची, अर्थात राणी दुर्गावती च्या वंशजांची, एक भली मोठी, भरभक्कम हवेली उभी होती. सध्या ही हवेली सार्‍या घटनांचा केंद्रबिंदु झाली होती. आसपासचे जमीनदार आणि मालगुजार ह्या हवेलीत चर्चेसाठी येत जात होते. गोंड राजा शंकरशाह स्वतः प्रत्येकाशी बोलत होते. काहीतरी जबरदस्त घडण्याची एक मोठी योजना साकार होत होती...

मात्र गोंडवान्याचं हे लहानसं राज्य स्वतंत्र नव्हतं. सन १८१८ मध्येच इंग्रजांनी ते नागपूरकर भोसल्यांकडून जिंकून घेतलं होतं. या गढ-मंडल्याला एक तळपता आणि लखलखीत इतिहास होता. कोणे एके काळी, म्हणजे अगदी तेराव्या शतकापर्यंत, गढ-मंडल्यातील ‘तेवर’ (त्रिपुरी) येथील चौसष्ट योगिनी चे मंदिर, अर्थात ‘गोलकी मठ’, म्हणजे आन्ध्र प्रदेशातल्या काकतीय वंशाचे देवस्थान होते. गोलकी मठाचे प्रमुख, ‘आचार्य विश्वेश्वर शंभू’ हे काकतीय वंशाचे राजगुरु होते. स्वतः राणी रुद्रांबा (रुद्रम देवी) त्यांना मानायची. काकतीय साम्राज्याचे राजे आणि अधिकारी, अनेकदा त्रिपुरी आणि गोलकी मठाचे दर्शन घ्यायला यायचे.गढ-मंडल्याचं राज्य समृध्द होतं. मुस्लिम आक्रांतांना तोंड देत, ताठ मानेने उभं होतं. राज्यात शेती योग्य जमीन कमी असली, तरी पाण्याचे नियोजन उत्कृष्ट होते. त्यामुळे पीक पाणी नेहमीच चांगले होते. दुष्काळ तर या राज्याला माहीतच नव्हता. राजा संग्रामशाह, राणी दुर्गावती यांच्या सारखे दूर दृष्टीचे, न्यायी शासक होते. त्यामुळे दिल्लीकर मोगल आक्रमण करत होते, पण स्थायी रूपाने इथे राज्य करणं त्यांना शक्य झाले नाही.

वर्षामागून वर्ष गेली. पण हा गोंडवाना ताठ मानेने स्वतंत्र उभा होता. पुढे उत्तर पेशवाईत, सन १७७८ मध्ये नागपूरकर भोसल्यांनी गढ- मंडला आपल्या ताब्यात घेतलं. जबलपुर हे शहर वसवलं. पण ह्या सर्वांत गोंड शासकांचा सन्मान कायम होता. स्थानिक जनतेतही गोंड राजांचे स्थान अबाधित होते. अत्यंत आदराने त्यांचे नाव घेतले जायचे.मराठेशाही मध्ये ह्या गोंडवाना बद्दल किती विश्वास ? १८१७ च्या दिवाळीत दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांच्या विरुध्द युध्द पुकारले. प्रारंभी सरशी होत गेलेल्या मराठी फौजा, नंतर इंग्रजांच्या तोपखान्यासमोर टिकू शकल्या नाहीत. आणि मग पेशव्यांची पिछेहाट सुरू झाली. नागपूरकर भोसले, या युध्दात पेशव्यांच्या बाजूने उभे होते. त्यांनी पेशव्यांना नागपूर ला बोलाविले. पण तत्पूर्वीच कामठी च्या इंग्रजी रेजिमेंट ने अचानक हालचाल करून भोसल्यांना गिरफ्तार केले. त्यामुळे नागपूर ला जाणे शक्य नव्हते. मग भोसल्यांनी अटकेतूनच पेशव्यांना निरोप पाठवला की त्यांनी गोंड राज्यात, म्हणजे चांदा (चंद्रपुर) किंवा गढ-मंडल्याला जावे. पेशव्यांना चांदा ला जाणे शक्य झाले नाही, कारण त्या दिशेने इंग्रजांनी मजबूत फळी उभारली होती. म्हणून पेशवे गढ-मंडल्याकडे (अर्थात आजच्या जबलपुर कडे) निघाले. मात्र वाटेतच कुर्रई ला इंग्रजांनी पेशव्यांना गाठलं. जबरदस्त हाणामारीची लढाई झाली. पेशवे कसेबसे बचावले आणि ते बरहाणपुर च्या दिशेने गेले.

अर्थात पेशव्यांना आणि नागपूरकर भोसल्यांना हा विश्वास वाटत होता की गोंडांच्या राज्यात, गढ-मंडला (जबलपुर) ला ते पोहोचले की सुरक्षित राहतील.इंग्रजांचा अंमल सुरू झाल्यानंतरही गोंड शासक स्वाभिमानी बाण्याने जगत होते. त्यांनी साधारण चाळीस वर्षे मराठ्यांचा अंमल सहन केला. पण त्याचे त्यांना काही वाटत नव्हते. कारण मराठ्यांच्या राज्यात त्यांचा मान-मरातब कायम होता. शिवाय मराठे म्हणजे एकाच धर्माचे. मंदिर बांधणारे. उत्सव साजरा करणारे.पण इंग्रजांचं तसं नव्हतं. त्यांचा अंमल सुरू झाल्याबरोबर त्यांच्या धर्माची पूजा स्थानं, अर्थात चर्चेस उभी राहिली. स्थानिक लोकांना ख्रिश्चन धर्मात यायचं आमिष देऊ लागली. इंग्रजी भाषा शिकायचा आग्रह धरू लागली.हा गोरा इंग्रज वेगळा होता. फार वेगळा. याचा रंग, याची भाषा, याचे रिती-रिवाज, याचा धर्म... सारेच काही वेगळे होते. आणि त्या चालीरीती, ते रिती रिवाज, तो धर्म स्थानिक लोकांनीही पाळला पाहिजे, असा दबाव होता. स्वाभिमानी गोंड राजांना हे सहन होणं शक्यच नव्हतं.आणि म्हणूनच जेंव्हा मेरठ आणि दिल्ली हून, इंग्रजांशी बिघाड करण्याच्या योजना घेऊन साधू आणि बैरागी, गढा पुरवाच्या राजे शंकरशाह यांच्या गढीत येऊ लागले., कमळाची फुलं आणि चपात्या आणू लागले, तेंव्हा या सत्तर वर्षांच्या चिरतरुण शंकरशाह यांना उत्साहाचे भरते आले. त्यांचा ४० वर्षांचा मुलगा कुंवर रघुनाथ शाह बरोबर ते या सर्व चर्चांत समरसून भाग घेऊ लागले.


पूर्वीचे गढ मंडला, आता ‘जबलपुर’ या नावाने ओळखले जात होते. येथे इंग्रजांनी आपली भली मोठी छावणी उभारली होती. ‘५२ नेटीव्ह बंगाल रेजिमेंट’ येथे तैनात होते. नावाप्रमाणे ह्या ‘नेटीव्ह बंगाल रेजिमेंट’ मध्ये स्थानिक लोकांची संख्या बरीच होती आणि या सर्वांची सहानुभूती राजे शंकरशाह यांच्याबरोबर होती. तश्यातच ह्या रेजिमेंट चा कमांडंट ले. ज. क्लार्क हा प्रचंड अत्याचारी आणि खुनशी स्वभावाचा होता. स्थानिक जवानांना कुत्र्यासारखं आणि गाढवासारखं राबवून, त्यांच्याकडून काम करून घेणं यात हा वाकबगार होता. पूर्ण जबलपुर इलाख्यातली जनता ह्या क्लार्क च्या व्यभिचार आणि अनाचारामुळे त्रस्त झालेली होती. आणि म्हणूनच तेथील जमीनदार आणि मालगुजारांचे समर्थन, शंकरशाह करत असलेल्या गुप्त आंदोलनाला होते.इकडे ह्या क्लार्क च्या कानावर सुध्दा राजाच्या ह्या होऊ घातलेल्या आंदोलनाच्या बातम्या येतच होत्या. त्याने एक कुटिल डाव रचला. फितूर झालेले दोन – चार हिंदू जवान, त्याने बैरागी आणि गोसावींच्या वेशात राजाकडे पाठवले. राजा धर्मप्रेमी होता. शिवाय त्याच वेळेस क्रांति योजनेच्या संदर्भात, उत्तर भारतातून बैरागी आणि गोसावी येतच होते. त्यामुळे राजाची फसगत झाली. त्याने आपल्या क्रांति युध्दाची पूर्ण योजना त्या बैरागी – गोसावी लोकांना सांगितली. त्या योजने प्रमाणे २८ सप्टेंबर १८५७ ला दसर्‍याच्या दिवशी बार उडणार होता. त्या दिवशी ५२ रेजिमेंट चे सर्व जवान तसेच सागर मध्ये तैनात असलेल्या ४२ रेजिमेंट चे जवान हे राजा शंकरशाह यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुध्द युध्द पुकारणार होते. सर्व तैयारी होत आलेली होती.

आणि इतिहासात अनेकदा घडलेल्या गोष्टीचीच पुनरावृत्ती झाली. स्थानिक लोकांनी केलेल्या फितुरीमुळे, कमांडेंट क्लार्क ला राजाची पूर्ण योजना समजली. आणि सोमवार, १४ सप्टेंबर १८५७ ला दुपारी, अर्थात नियोजित क्रांति युद्धाच्या बरोबर दोन आठवडे आधी, इंग्रजांनी जबलपुर च्या गढा पुरवा मध्ये असलेल्या राजाच्या गढीला वेढा घातला. राजा शंकरशाह आणि त्याचा मुलगा रघुनाथ शाह यांना अटक करण्यात आली.ही बातमी वणव्यासारखी पसरली. ५२ रेजिमेंट च्या जवानांनी आंदोलन पुकारले. आजूबाजूच्या गावातले जमीनदार / मालगुजार गोळा झाले. मात्र त्या आधीच इंग्रजांनी नागपुर हून जास्तीची कुमक मागवली होती. त्यामुळे १४ सप्टेंबर ला फार मोठं आंदोलन उभं राहू शकलं नाही.दुसर्‍या दिवसापासून, अर्थात १५ सप्टेंबर ला, या दोघांवर इंग्रजांनी विशेष न्यायालयात खटला चालू केला. ‘आपण न्यायप्रिय आहोत’, हे दाखविण्याची इंग्रजांना विलक्षण हौस होती. मात्र अनेक प्रयत्न करूनही इंग्रजांना राजा शंकरशाह आणि कुंवर रघुनाथ शाह यांच्या विरोधात एक ही पुरावा मिळाला नाही.मग इंग्रजांनी या दोघांवर आरोप म्हणून त्यांनी केलेल्या दोन कविता, विशेष न्यायालयात सादर केल्या. राजे शंकरशाह यांनी केलेल्या कवितेची सुरुवात होती –


‘मूंद मुख डंडिन को चुगलों को चबाई खाई,
खूंद डार दुष्टन को शत्रू संघारिका,
मार अंगरेज रेज पर देई मात चंडी,
बचे नही बेरी बाल बच्चे संहारिका..!’
त्यांचा मुलगा, कुंवर रघुनाथ शाह याने केलेल्या कवितेचा एक अंश होता –
झुंड – झुंड बैरिन के
रुण्ड – मुण्ड झारी – झारी,
सोनित की धरण ते
खप्पर तू भर ले,
कहे रघुनाथ शाह मां
फिरंगीन को काटी – काटी
किलकि – किलकि मां
कलेऊ खुब कर ले I
 
 
त्या विशेष न्यायालयात ह्या गोंड राजे पिता – पुत्रांसमोर प्रस्ताव ठेवला गेला की जर त्या दोघांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आणि इतर क्रांतिकारकांचा ठावठिकाणा सांगितला तर माफी तर मिळेलच, शिवार राजे – रजवाड्यांना मिळणारा वार्षिक तनखाही सुरू होईल.पण ह्या स्वाभिमानी पिता – पुत्रांनी तत्क्षणीच हा प्रस्ताव उडवून लावला. त्या न्यायालयीन आयोगाने या दोघांना राजद्रोहाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली. पण राजे शंकरशाह, न्यायालयाला म्हणाले, “आम्ही चोर, डाकू, लुटेरे नाहीत. आम्ही गोंडवाना चे राजे आहोत. त्यामुळे मृत्युदंड हा आमच्या इतमामाला साजेसाच हवा. आम्हाला तोफेच्या तोंडी बांधून उडवा.”न्यायालयीन आयोगाने ही मागणी मान्य केली. कमांडेंट क्लार्क ने या दोघांना उघड्यावर, ऐन शहरात तोफेच्या तोंडी देण्याचे ठरविले. ‘ते दृश्य बघून लोकांच्या मनात दहशत बसेल’, अशी त्या क्लार्क ची कल्पना होती. ह्या मृत्युदंडाचा दिनांक ठरला, शुक्रवार, १८ सप्टेंबर १८५७. सर्वपित्री अमावास्येचा दिवस..!


ही बातमी विद्युत वेगाने अवघ्या गोंडवानात पसरली. त्या दिवशी ह्या संपूर्ण क्षेत्रात कोणाच्याही घरी चूल पेटली नाही. लोकं पितरांचे तर्पण करायचे ही विसरले. त्या दिवशी नर्मदेच्या घाटांवरही फारशी गर्दी नव्हती. सारा जनसमुदाय, आज एलगीन हॉस्पिटल च्या समोरच्या रस्त्यावर गोळा झालेला होता.या दोघा वीर प्रतापी पिता – पुत्रांना दोन वेगवेगळ्या तोफांच्या तोंडाला बांधलं होतं. दोघांच्याही चेहर्‍यावर भीतीचा लवलेश ही नव्हता. दोघंही चंडी मातेचा जप करीत होते. बरोबर ११ वाजता, दोन्ही तोफांना एकसाथ बत्ती दिल्या गेली. क्षणार्धात या गोंडवानाच्या चंडप्रतापी राजांचे छिन्न – विछिन्न मृतदेह समोर विखरून पडले. अन त्याच क्षणी लोकांच्या भावनेचा बांध फुटला. या मृत्युदंडाची दहशत तर लोकांना वाटलीच नाही, उलट लोकांसोबत ५२ नेटीव्ह रेजिमेंटच्या जवानांनी सुद्धा आंदोलन सुरू केले.देशात पहिल्यांदा इंग्रजांद्वारे एखाद्या राजाला तोफेच्या तोंडी दिल्या गेले होते. ते ही वनवासी राजाला ! आणि ह्या घटनेने संपूर्ण मध्य क्षेत्रात क्रांतीची ठिणगी पडली, जिने पुढील काही वर्षांत, भारताच्या मध्यभागी असलेल्या ह्या लहानश्या प्रांतासाठी इंग्रजांना अस्वस्थ करून सोडले..!- प्रशांत पोळ


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.