शिर्डीत ४६ एकर जागेत भरणार ‘महापशुधन एक्स्पो’!

१० लाख पशुप्रेमी भेट देणार !

    19-Mar-2023
Total Views |
Mahapasudhan Expo

शिर्डी- देशातील सर्वात मोठे 'महापशुधन एक्सपो २०२३ ' शिर्डीच्या शेती महामंडळाच्या ४६ एकर विस्तीर्ण जागेत भरणार असून देशभरातील पाच हजारांपेक्षा जास्त पशु-जनावरे या प्रदर्शनास असणार आहेत. तर १० लाखांपेक्षा जास्त पशुप्रेमी या प्रदर्शनास भेट देण्याची शक्यता आहे. ५०० हून अधिक स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी हे महा एक्स्पो पर्वणी ठरणार आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनिल तुंबारे यांनी आज येथे दिली.
 
या प्रदर्शनाचे २४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या ‘एक्स्पो’साठी येणाऱ्या पशुपालक व पशुप्रेमींच्या वाहन पार्किंग व्यवस्थेसाठी १०० एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. देशातील १३ पेक्षा जास्त राज्यातील पशुपक्षी व पशुपालक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. १८ विविध प्रकारच्या चारा पिके व बियांण्याचे वैशिष्टये या प्रदर्शनात पशुपालकांपुढे सादर केली जाणार आहेत. मुरघास, ॲझोला, हॉयड्रोपोनिक्स चाऱ्याचे नवीन तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन करून जनावरांना हिरवा चारा कसा उपलब्ध करून देण्यात येईल. याचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनात असणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचे सादरीकरण केले जाणार आहे.
 
महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांच्या स्टॉलच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याचे पशुसंवर्धनविषयक वैशिष्ट्यांची माहिती सर्वसामान्य जनतेसाठी खुली असणार आहे. त्या त्या राज्यातील व जिल्ह्यातील प्रसिध्द तसेच वैशिष्टयपूर्ण पशुधन या प्रदर्शनात प्रत्यक्ष सहभागी असणार आहे. गायी, म्हैस, शेळी - मेंढी, कोंबडी, श्वान, वराह, अश्व असा विविध पशुप्राण्याचे ‍विविध प्रकारांतील सर्वोत्कृष्ट प्रजाती आपणास या ‘एक्स्पो’त पाहण्यास मिळतील.


शेतकरी, पशुपालकांसाठी उपयुक्त ठरणारे वैरण विकास, दूग्ध व्यवसायातील आवाहने, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन याविषयांवरील तांत्रिक चर्चासत्र याठिकाणी होणार आहेत. या चर्चासत्रांमधील चर्चांमध्ये शेतकरी सहभागी होऊ शकतात. पशुसंवर्धनविषयक नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. मुक्त संचार गोठा कसा असावा याचे प्रात्यक्षिक व माहिती या एक्स्पोत दिली जाणार आहे. पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून शासकीय योजनांचे सादरीकरणाचे कार्यक्रम ही होणार आहेत.
 
'डॉग' व 'कॅट' शो चे ही या एक्स्पोमध्ये आयोजन करण्यात आले आहे. विविध जातीचे घोडे ही यात सहभागी होणार आहेत. नागपूर येथील महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचा या प्रदर्शनात सक्रीय सहभाग राहाणार आहे.'महापशुधन एक्स्पो 'हा पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पध्दतीने पशु-पक्षी पालन करण्यासाठी शेतकरी, पशुपालक व युवकांसाठी पर्वणी ठरणार आहे. असे तुंबारे यांनी यावेळी सांगितले.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.