कलाविश्वात रममाण होणारी कृषिता

19 Mar 2023 20:11:54
Krishita Salian


उठा जागे व्हा, जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका,’ या विचाराने प्रेरित होऊन डोंबिवली पूर्वेतील कृषिता सालियन चित्रकलेच्या विश्वात रंग, रेषा, आकार यांच्या सोबतीने कलाविश्वात आपले स्थान निर्माण करण्यासाठी जिद्द व ध्येयाने न डगमगता साहसी वृत्तीने धावत आहे. तिच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया...


कृषिताचे शालेय शिक्षण डोंबिवलीतील ‘होली एंजल्स स्कूल’मध्ये झाले. शाळेतल्या इतर मुलांप्रमाणे कृषितालाही बर्‍याच विषयांत सहभागी होण्याची आवड होती. कालांतराने आपल्या विषयाची निवड करण्यास तिने सुरूवात केली. शाळेत असताना ती हॉलिबॉल आणि अ‍ॅथेलेटिक्सकडे जास्त लक्ष देत होती. पण ती समाधानी नव्हती. नक्की काय हवंय, हेही समजत नव्हते. त्यानंतर तिने चित्रकला आणि नृत्य या विषयाकडे मोर्चा वळविला. चित्रकलेचा अभ्यास सुरू केला तेव्हा पेन्सिल हे तिचे आवडते माध्यम होते. आजही पेन्सिल हे माध्यम क्रिशिताला फार आवडते. चित्रकलेत कृषिता रमू लागली होती. त्यानंतर तिच्या लक्षात आले की, नृत्य करण्यात आपला वेळ वाया जात आहे. त्यामुळे तिने नृत्य प्रशिक्षण बंद केले. कृषिताला चित्रांमध्ये रंग भरता भरता करिअरचा आणि पर्यायाने आयुष्याचा सूर गवसला. चित्रकला हेच कृषिताचे लक्ष्य झाले होते. बघता बघता तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. बारावीपर्यंत तिने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षण कलेत घ्यावे, असे तिने ठरविले.


‘करंदीकर कला अकादमी’मध्ये मूलभूत अभ्यासक्रमात प्रवेश कलेच्या अभ्यासाला प्रशिक्षणाची जोड दिली. त्यानंतर ‘ठाणे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये जी. डी. आर्ट (ड्रॉईंग आणि पेन्टिंग) शिकत असताना एवढे सगळे पुरेसे नाही, असे मनाला सतत वाटत होते. क्रिशिता एकदा तिच्या मैत्रिणीसोबत ठाण्याला एका स्टुडिओमध्ये गेली आणि तिला चित्रकलेचा अधिक अभ्यास करण्यासाठी योग्य ते ठिकाण सापडले. ती महाविद्यालयामधून निघाल्यावर लगेचच स्टुडिओमध्ये जात असे. स्टुडिओमध्ये तिने जलरंगात व्यक्तिचित्रणाचा सराव सुरू केला. त्याठिकाणी काम करताना कोणतेच बंधन नव्हते. त्यामुळे कृषिताची चित्रकला अधिक फुलत गेली. स्टुडिओत अनेक कलाकार तिला भेटत गेले. त्यांचा कामाचा अनुभव व कामाची पद्धत कृषिताला शिकता आली. जलरंग वापरात असताना तिने तेलरंगाचे कामही सुरू केले.

प्रत्येक कलाकाराचे एक स्वप्न असते की, त्याची कलाकृती प्रदर्शनात मांडता यावी. स्पर्धेत ठेवली जावी आणि त्याला पारितोषिक मिळावे. त्याप्रमाणे कृषिता विद्यार्थीदशेत असतानाच आपल्या कलाकृती प्रदर्शनात मांडत होती. ‘लोकमान्य टिळक’ आणि ‘स्व. बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक ऑल इंडिया आर्ट एक्झिबिशन पुणे २०२०’ येथे तिचे चित्र कलाकार विभागात निवडले गेले. एवढेच नाही, तर त्या चित्राला पारितोषिकदेखील मिळाले. त्यानंतर लगेचच नाशिक येथे ‘नाशिक कलानिकेतन’, ‘ऑल इंडिया आर्ट एक्झिबिशन २०२०’ मध्ये तिच्या चित्राला द्वितीय पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट व्यक्तिचित्रण रौप्यपदक मिळाले. ‘बदलापूर आर्ट गॅलरी’ येथे ‘नॅशनल पेन्टिंग कॉम्पिटिशन’मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. ‘कॅमल आर्ट फाऊंडेशन’तर्फे झोनल पारितोषिक मिळाले. २०२१ मध्ये बदलापूर येथे चित्रांचे ‘सोलो प्रदर्शन’ भरविले होते. राज्यस्तरीय कला स्पर्धा (कलाकार विभाग), ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ येथे चित्रांची निवड झाली.


२०२२ मध्ये ‘लोकमान्य टिळक’ आणि ‘स्व. बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक ऑल इंडिया आर्ट एक्सिबिशन पुणे’ येथे कृषिताच्या चित्राला प्रथम पारितोषिक मिळाले. पदाविका अभ्यासक्रम नंतर डिप्लोमा ए-ई -ईडीचे शिक्षण डिस्टिंगशनमध्ये पूर्ण केले. सध्या ती पोर्ट्रेट या विषयात ‘मास्टर डिग्री’ प्रथम वर्षात शिकत आहे. मालेगाव येथे प्रशांत दादा हिरे चित्रकला महाविद्यालय येथे व्यक्तीचित्रणाचे प्रात्याक्षिक सादर केले. उंबरा चित्रकला महाविद्यालय, मुंबई येथे कला शिक्षक पदाविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीचित्रणाचे प्रात्याक्षिक केले. ‘विसलिंग वूड इंटरनॅशनल इन्सिट्यूट ऑफ फिल्म कम्युनिकेशन अ‍ॅण्ड क्रिएटीव्ह आर्ट्स, मुंबई’ येथे निसर्ग चित्रण कार्यशाळेमध्ये ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून तिला निमंत्रित करण्यात आले होते.कृषिताच्या कलेच्या प्रवासाची सुरूवात झाली आहे आणि हा प्रवास पुढेही निरंतर चालू राहणार आहे. सध्या ती वास्तववादी चित्रांचा सराव करीत आहे.


भारतीय तसेच पाश्चिमात्य कलाकारांचा अभ्यासातून लक्षात आले की, वास्तववादी चित्रांचा अभ्यास इतर सर्व कलाप्रकाराचा पाया आहे. भारतीय चित्रकलेच्या अभ्यासक्रमात योग्य बदल घडवून आणणे आणि एक छान चित्रकार म्हणून आपले एक अस्तित्व निर्माण करणे, हेच सध्या कृषिताचे कला क्षेत्रातील ध्येय असल्याचे कृषिता सांगते.कृषिताला वास्तववादी चित्रणात जणू माता सरस्वतीचे वरदानच लाभले आहे. कारण सर्व चित्रे अगदी जादूई पध्दतीने काढते. मानवी मनाला सुखद आनंद ही चित्रे देतात. चित्रातील कौशल्यपूर्ण रंगलेपन सोबत सहजता व आत्मविश्वासपूर्ण जोरकश फटकारे पार्श्वभूमीसाठी वापरलेले रंग त्यातील वेगळेपणा यातून कृषिताची निष्ठा व साधना दिसून येते. कलेच्या अभ्यासात अनेक कलाशिक्षक आणि सहकारी लाभले. त्यांच्या सान्निध्यात कलेचा प्रवास सोपा आणि योग्य दिशेने होत गेल्याचे ही ती आवुर्जून सांगते. अशा या हरहुन्नरी कलाकाराला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!

 
Powered By Sangraha 9.0