विधानसभा निवडणुकीत २०० जागा जिंकणार!

18 Mar 2023 23:46:58
 
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

मुंबई : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात ४८ लोकसभा, २८८ विधानसभा युतीमध्ये लढणार आहे, त्यात एनडीएचे घटक पक्ष असणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह व सहकारमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्त्वात २०० जागा जिंकण्याची आम्ही तयारी केली आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, आतापर्यंत महाराष्ट्रात जे बहुमत मिळाले नाही;ते बहुमत मिळण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. जागावाटपाबाबत केंद्रीय आणि राज्य नेतृत्व फार्मूला ठरवेल. आजपर्यंत कुठलाही फार्मूला ठरला नाही  व चर्चाही झाली नाही. आम्ही जेवढी तयारी करू ती शिवसेनेच्या कामात येईल, शिवसेना जेवढी तयारी करेल ती भाजपच्या कामात येईल.

शिंदे-फडणवीस सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यासाठी बरेच काही केले आहे. कुठल्याही सरकारने एव्हढे केले नाही. विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी काही करायचे नाही आणि केवळ आरोप करायचे, मात्र त्यांनी आपला पूर्व इतिहास बघितला पाहिजे, विरोधकांनी टीका करण्यापेक्षा आपला चेहरा आरशात बघितला पाहिजे,असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या समितीबाबत ते म्हणाले की, समितीत कुणाला घेतले, कुणाला नाही हा सरकारचा अधिकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे हे महत्त्वाचे आहे.

आरोपांपेक्षा विधायक कामावर चर्चा व्हावी*
अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर देवेंद्रजींनी विधिमंडळ सभागृहात चौकशीनंतर सर्व स्पष्ट होईल असे म्हटले. देवेंद्रजी आणि अमृता वहिनी या कधीही अशा गोष्टीचे समर्थन करू शकत नाहीत . चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप होत आहे, विरोधकांनी राजकारणासाठी खालच्या पातळीवर आरोप करू नये. देवेंद्रजींचे आयुष्य हे खऱ्या अर्थाने समर्पित आहे. ते महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकामध्ये आणण्यासाठी ते प्रयत्न करीत आाहेत. त्यामुळे त्यांच्या  त कुटुंबीयांना डॅमेज करण्याचं काम सुरू आहे. आता हे प्रकरण बंद करावे व विधायक कामावर चर्चा व्हावी, असे आवाहन केले.

नाना पटोले यांनी धार्मिक बाबीवर बोलू नये*
इतर धर्मिक कार्यक्रमात  जहरी टीका होते, समाजात तेढ निर्माण करण्याचा काम केलं जाते, त्या ठिकाणी नाना का बोलत नाहीत, हिंदू विचारावर बोलणारे यांनाच ते विरोध का करतात, असा टोला नाना पटोले यांना लगावला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळे निवडणुका लांबणीवर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता, त्यावर  बावनकुळे म्हणाले की, अजित पवार यांना समजायला हवे की, स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. तीन याचिकांपैकी एक राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे. मग हे प्रकरणाचा लवकर निकाल निघत नाही यासाठी जबाबदार अजित पवार नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर होत नाही यासाठी राष्ट्रवादी जबाबदारी नाही का?, असाही प्रतिप्रश्न त्यांनी केला.


Powered By Sangraha 9.0