शिवमंदिराच्या प्रांगणात घुमले ‘शंभो शंकरा’चे सूर!

- भक्तीगीतांच्या सुरेल पहाट मैफलीला रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद

    18-Mar-2023
Total Views |
 
Shiva temple
 
अंबरनाथ - अंबरनाथ येथील डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’मध्ये शनिवारी पहाटे शिवमंदिर परिसरातील दुसऱ्या रंगमंचावर ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, मनजीत सिंग आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांच्या सुरेल मैफलीला अंबरनाथकर रसिकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला. अंबरनाथ येथीलशिव मंदिर परिसरात आयोजित करण्यात येणाऱ्या शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री अमित त्रिवेदी यांच्या गाण्यांच्या मैफिलीचा आनंद घेण्यासाठी जमलेल्या रसिकांनी गर्दीचा नवा उच्चांकच प्रस्थापित केला. अमित त्रिवेदी यांच्या सुरेल गाण्याची पर्वणी ऐकून रात्री उशिरा घरी पोहचलेल्या रसिकांनी तितक्याच उत्साहात आणि प्रचंड संख्येने अनुराधा पौडवाल यांच्या शनिवार पहाटेच्या भक्तीगीत कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी भक्तीगीते ऐकून अनेक ज्येष्ठ नागरिकही तल्लीन झालेले पाहायला मिळाले. ‘तुने मुझे बुलाया शेरावाली ये’ या सदाबहार गाण्याच्या सादरीकरणावर अनेकांनी ठेका धरला.
 
अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिराच्या परिसरात डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हल २०२३ यावर्षी गर्दीचे नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्याने कार्यक्रम होऊ शकला नव्हता. मात्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना प्रचंड संख्येने उपस्थित राहत रसिक प्रेक्षकांनी गर्दीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शिवमंदिरात भगवान शंकराची पूजा करून महाआरती केली. तसेच सुप्रसिद्ध गायक अमित त्रिवेदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या एकाहून एक उत्तम अशा गाण्यांवर तरुणांनी चांगलाच ठेका धरला. अमित त्रिवेदी यांच्या सुरेल गाण्याची पर्वणी ऐकून रात्री उशिरा घरी पोहचलेल्या रसिकांनी तितक्याच उत्साहात आणि प्रचंड संख्येने अनुराधा पौडवाल यांच्या शनिवार पहाटेच्या भक्तीगीत कार्यक्रमाला हजेरी लावली.
 
अनुराधा पौडवाल यांनी ‘मन मेरा मंदिर, शिव मेरी पूजा’ या गीताने पहाटे सव्वा सहा वाजता संगीत मैफलीला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी सादर केलेले ‘तुने मुझे बुलाया शेरावाली ये’ या सदाबहार गीतांवर अनेकांनी ठेका धरला. तर अनेक ज्येष्ठ नागरीक ही भक्तिगीते ऐकताना तल्लीन झाली होती. अनुराधा पौडवाल यांनी गायलेली अनेक भक्तिगीते हे अजरामर आहेत. ‘ओम नम:शिवाय’ हा त्यांनी गायलेला आणि घराघरात, मंदिरांमध्ये नियमित ऐकला जाणारा मंत्र त्यांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकण्याची संधी शेकडो रसिक प्रेक्षकांना शनिवारच्या संगीत मैफलीत मिळाली. या मंत्राच्या सादरीकरणानंतर अनुराधा पौडवाल यांनी ‘ये शंभो बाबा’ हे श्री शंकराचे भजन गायले.
 

Shiva temple 
 
त्यानंतर लगेचच ‘कौन कहता है भगवान आते नही ?’ ‘लगान’ चित्रपटातील जावेद अख्तर लिखित, संगीतकार ए.आर.रहेमान यांनी संगीतबद्ध केलेले आणि लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ओ पालनहारे’ हे प्रार्थनागीत अनुराधा पौडवाल यांनी सादर केले. त्यांनी सादर केलेल्या या दोन्ही गाण्यांनंतर उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रतिसाद देत दाद दिली. या मैफलीत अनुराधा पौडवाल यांच्यासोबत असणारे गायक मनजीत सिंग यांनी ‘बम बम बम भोले,’ ‘ मेरा भोला ना माने,’ ‘श्याम तेरी बन्सी पागल कर देती है’ ही लोकप्रिय गाणी सादर केली. ज्येष्ठ नागरिकांनी रंगमंचाजवळ येऊन नाचण्याचा आनंद घेतला. मैफलीच्या उत्तरार्धात अनुराधा पौडवाल यांनी ‘आया बाबा का त्यौहार आया, शिवरात्री का त्यौहार आया ’, ‘शंभो शंकरा, करुणाकरा’ ही गाणी तसेच ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरिओम विठ्ठला ! हे लोकप्रिय भजन सादर केले.
 
अंबरनाथ शिवमंदिराच्या प्रांगणात भल्या पहाटे भक्तीगीतांची मैफल सादर करण्याची संधी दिल्याबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे अनुराधा पौडवाल यांनी आभार मानले. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, सुवर्णा साळुंके, ज्येष्ठ पत्रकार गिरीश त्रिवेदी, पुरूषोत्तम उगले यांच्या उपस्थितीत अनुराधा पौडवाल, मनजीत सिंग आणि सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
 
आठवणींना उजाळा 
‘शंभो शंकरा, करुणाकरा’ या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी अनुराधा पौडवाल या नेमक्या आजारी पडल्या होत्या. त्यामुळे ‘हे गाणे कुणा दुसऱ्याकडून गाऊन घ्या’ असेही त्यांनी सुचवले होते. परंतु संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबुजी यांनी ठरल्याप्रमाणे ध्वनिमुद्रण करण्याचा निर्णय घेतला. तापाने फणफणलेल्या अवस्थेत अनुराधा पौडवाल यांनी हे गाणे गायले. शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या संगीत मैफलीत हे गाणे सादर करण्यापूर्वी त्यांनी ही आठवण सांगून ‘परमेश्वर अनेकदा आपल्याकडून चांगल्या गोष्टी करवून घेतो,’ याचे हे एक ठळक उदाहरण असल्याचे नम्रपणे नमूद केले.
 

Shiva temple 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.