... त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही – जयंत पाटील

18 Mar 2023 15:20:35

Jayant Patil
 
 
मुंबई : मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले, "शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही. येत्या निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीच्या समोर फक्त एकटा भाजप असेल, शिंदे गट तोपर्यंत टिकेल असे मला वाटत नाही." जयंत पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आलं आहे.
 
"भाजपा शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार असल्याचे सांगत आहे. परंतु, निवडणुकीला आणखी एक वर्ष असून, विधानसभेच्या सर्व २८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही. भाजपला असं वाटतंय की आपली मते हे पक्ष खाणार आहेत. त्यामुळे स्थानिक पक्षांना संपवण्याचे काम अव्याहतपणे प्रत्येक राज्यात भाजपने केले आहे. त्यांचा मित्र असो वा शत्रू असो, त्यांना फोडणे त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाया करणे आणि त्यांना नामोहरम करुन त्यांच्या मागे जाणारी मतं आपल्या मागे वळवणे, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो." असेही जयंत पाटील म्हणाले.
 
"शिंदे गट राहणार की नाही हा प्रश्न लोकांच्या मनात आहेच आणि यदाकदाचित राहिला तर भाजप सर्व्हे करेल आणि जाहीर केलेल्या ४८ जागांपैकी एकनाथ शिंदे यांना सांगतील तुमच्या ५-६ जागा निवडून येणार आहे. त्यामुळे उरलेल्या ठिकाणी आम्ही वेगळा पर्याय देतो. अशी परिस्थिती शेवटच्या क्षणी निर्माण होईल." असं पाटील म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0