ध्वनिवर्धकांवर बांग देण्याचा आडमुठेपणा

    18-Mar-2023
Total Views |
 
Azan
 
अनेक देशांमधून मशिदींमधून बांग किंवा अझान देताना ध्वनिवर्धकांवरून अगदी सकाळपासून दिवसातून पाच वेळा बांग देण्याची प्रथा सुमारे 90 वर्षांपूर्वी प्रस्थापित झाली. 1930च्या दशकात ध्वनिवर्धक उपकरणाचा शोध लागल्यावर लगेच काही वर्षात ती सुरू होऊन जगात सर्वदूर पसरली. आज मशीद म्हटली की, मनोरा आणि त्यावर चारही बाजूंनी लावलेले ध्वनिवर्धक हे दृष्य ठरलेले आहे. ध्वनिवर्धक जेवढ्या चढ्या आवाजात लावता येतील तेवढ्या आवाजात लावले जातात. त्यामुळे आसपास राहणार्‍या नागरिकांना त्रास होतो. मुसलमानांचे श्रद्धास्थळ असलेल्या सौदी अरेबियाने नुकतेच मशिदींवरील भोंग्यांचे आवाज एक तृतीयांश तीव्रतेवर आणण्याचे आदेश दिले. त्यानिमित्ताने...
 
बांग देण्याची सुरुवात
 
पै. महंमदांनी मक्केत जवळपास 10-12 वर्षे सातत्याने नव्या एकेश्वरी धर्माचा प्रसार केला. मक्का वास्तव्यात पैगंबरांच्या जीवनात मेराज-सात स्वर्ग ओलांडून अल्लासमक्ष जाण्याची घटना घडल्यावर दिवसातून पाच वेळा नमाज पढायचा, हे निश्चित झाले. मक्का वास्तव्यादरम्यान त्यांना जेमतेम शे-सव्वाशे अनुयायी मिळाले. तेही बरीच वर्षे कोणाला संशय येऊ न देता प्रार्थनेसाठी एकत्र जमत. त्यानंतर पै. महंमदांनी मदिनेला पलायन केले. तेथे धार्मिक प्रथांसंबंधात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. जरी पै. महंमदांची इच्छा मदिनेतील ज्यू समाजाने त्यांना त्यांच्या परंपरेतील प्रेषित म्हणून स्वीकारावे, अशी असली तरी ती मान्य झाली नाही. त्यामुळे जेरूसलेमच्या दिशेने नमाज पढण्याची दिशा बदलून मक्केच्या दिशेने तोंड करून नमाज पढण्याची प्रथा कायम केली गेली.
 
मदिनेतील वास्तव्यात पै. महंमदांच्या अनुयायांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. त्यातून दिवसातून पाच वेळा एकत्र येऊन नमाज पढण्याची आठवण देण्यासाठी मशिदीत उंच चौथरा करून त्यावर उभे राहून लोकांना नमाजाच्या वेळेची आठवण करून देण्याची प्रथा पाडली गेली. ती प्रार्थनापर होती. ‘अल्ला हु अकबर’ - अल्ला सर्वश्रेष्ठ आहे, या नार्‍याने बांग सुरू होते. बांग दूर अंतरापर्यंत ऐकली गेली पाहिजे, यासाठी मशिदीला जोडून मनोरे बांधण्याची प्रथा पडली. तारस्वरात ती म्हणण्याचा प्रघात पडला. त्यासाठी एक वेगळा कर्मचारी ठेवण्यात येतो. त्याला ‘मुअझ्झीन’ म्हणतात. दिवसातून ठरलेल्या पाचवेळी बांग देण, हे त्याचे मुख्य काम असते. इतर वेळात त्याने मशिदीतील साफसफाई करून निगा राखणे अपेक्षित असते.
 
बांग तारस्वरातच दिली पाहिजे, असा नियम मुळीच नाही. या उलट ती चार लोकांना ऐकू जाईल इतक्याच आणि सौम्य आवाजात असावी. तसेच, नमाज पढताना तोसुद्धा मूकपणे जसा पढू नये, तसाच तारस्वरात सुद्धा नाही. तो मध्यम आवाजात असावा, असे कुराण शरीफ आयत 17.110 मध्ये सांगितले आहे. या संदर्भात सहिह अल-बुखारीच्या हदीसमध्ये अबु मुसाचे एक कथन आहे. त्याचा सारांश पैगंबरांसह मक्का यात्रेदरम्यान ते जेव्हा उंच ठिकाणावर जात, तेव्हा ते तारस्वरात ‘अल्ला हु अकबर’, ‘ला इलाह’ इ. घोषणा देत. त्यावेळी पैगंबरांनी त्यांना हळू आवाजात घोषणा देण्याची आज्ञा केली. ते म्हणाले की, “ज्याला तुम्ही हाक देत आहात तो बहिरा नाही, तो तुमच्या आसपासच आहे आणि सर्व ऐकणारा आहे (सहिह बुखारी 4.235).”
 
अरबस्थानातील वाळवंटी एकाट प्रदेशात, कोणाला त्रास होण्याची शक्यता नसलेल्या ठिकाणी जर तारस्वरात ओरडण्याची आवश्यकता नसेल, तर भर वस्तीत, जिथे आजूबाजूला हजारोंनी अनेक धर्मांचे लोक राहतात तेथे चारही बाजूंनी ध्वनिवर्धकांवरून बांग देण्याचा आडमुठेपणा कशासाठी? अगदी अशाच अर्थाचा कबिराचा त्यावर टीका करणारा दोहा आहे-
 
कंकर पत्थर जोरी के मस्जिद लई बनाय।
ता चढी मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय॥
 

Azan 
 
असे असले तरी अनेक देशांमधून तार स्वरात बांग देणे सुरूच राहिले. ध्वनिवर्धक प्रचारात आल्यावर त्यांचा उपसर्ग अधिक वाढला.
 
बांगेमागील उन्मत्तपणा ध्वनिवर्धकांवरून बांग देण्याच्या विरोधात आजवर बरीच चर्चा आणि न्ययालयीन खटले झाले आहेत. त्यातील एका न्यायनिवाड्यात दिल्याप्रमाणे रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान ध्वनिवर्धकांवरून बांग देण्यास अथवा भजने इ. वर बंदी घातली गेली आहे, पण ती पाळल्या जात नाही. बरं बांग तरी एका गावात एकाच वेळी करून नंतर शांतता पाळण्याचे भान ठेवले जाते का? मला त्याचा विचित्र अनुभव आला. मी काही वर्षांपूर्वी देऊळगाव राजाला गेलो होतो. बसस्थानकावरून निवासस्थानी जात असताना डोळ्यात भरत होते ते मशिदींचे मिनार आणि त्यावर चारही बाजूंनी लावलेले ध्वनिवर्धक. मी थांबलो होतो, त्या घरासमोरच मशीद होती. दुसर्‍या दिवशी सकाळी 5 नंतर बांग ऐकू येणे सुरू झाले. एका मशिदीतली बांग संपत नाही तोच दुसर्‍या मशिदीतली बांग सुरू होई. हा प्रकार सुमारे पाऊणतास सुरू होता. त्या परिसरातील सर्व नागरिकांच्या झोपेचे खोबरे झाले होते.
 
जे रुग्ण अथवा लहान मुले होती, त्यांचे काय होत असेल? सकाळी थोडा वेळ चांगली झोप लागत नाही तोच हे ध्वनिप्रदूषण! तसे पाहिले, तर एका गावात बांग देण्याची वेळ एकच असू शकते. सर्व मशिदींनी एकाच वेळी बांग दिली तरी पाच मिनिटांनी शांतता होऊ शकते. आपल्याला कोणी काही करू शकत नाही, या मानसिकतेतून आलेला उन्मत्तपणा त्यात होता. तेथे एका पाठोपाठ दुसरी असा प्रकार नियमितपणे चालतो, असे स्थानिकांनी सांगितले. मी स्थानिकांना विचारले, तर त्यांनी माहिती दिली की, प्रशासनाकडे तक्रारी देऊन उपयोग होत नव्हता. उलट तक्रार करूनही स्थानिक प्रशासन कार्यवाही न करण्याच्या मनस्थितीत असल्याचे पाहून मशिदींचे व्यवस्थापन अधिक उद्दामपणे वागत होते. काही वर्षांनंतर आता देऊळगाव, राज्यातील परिस्थिती काय आहे, याची कल्पना नाही, पण हाच प्रकार जवळपास सर्वत्र अनुभवायला मिळतो.
 
सौदीला शहाणपण सुचले!
 
सौदी अरेबियातही गेली नऊ दशके मशिदींवर ध्वनिवर्धक लावून बांग देण्याची प्रथा होती. नव्या राजपुत्राच्या कारकिर्दीत त्याला नवे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवार, दि. 22 मार्चपासून रमझान महिना सुरू होतो आहे. त्या पूर्वीच एक आदेश काढून मशिदींवरील भोंग्यांचे आवाज एक तृतीयांश तीव्रतेवर आणण्याचा आदेश काढण्यात आला आहे. त्यामागचे कारण देण्यात आले की, मशिदींच्या आसपास राहणार्‍या नागरिकांनी तक्रारी केल्या की, मशिदींच्या आवजामुळे लहान मुलांच्या झोपा अवेळी उघडून नंतर पुरेशी झोप न झाल्याने त्यांच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो आहे. या वर्षी बुधवार, दि. 22 मार्चपासून सुरू होणार्‍या रमझान महिन्यात सौदी अरेबियातील मशिदींवरून दिलेल्या बांगेच्या आवाजाची तीव्रता कमी होऊन आसपासच्या नागरिकांना कमी त्रास व्हावा. हे बांग प्रकरण गेली कित्येक दशके सुरू होते.
 
तेव्हा सौदी अरेबियातील नागरिकांना त्रास होत नव्हता? आताच काय झाले? त्याचे कारण असे की, आजवर तेथे आडमुठी आणि मध्ययुगीन मानसिकता असलेली उद्दाम राजवट होती. महंमद बिन सलमान, जो भावी राजा आहे, तो त्या मानसिकतेतून बाहेर आला आहे. तो म्हणेल ती पूर्व दिशा, असा खाक्या आहे. आजवर तेथे बांगेविरोधात ‘ब्र’ काढण्याची उजागरी नव्हती. नवा राज्यकर्ता लोकांच्या धार्मिक प्रथांबाबतच्या तक्रारी ऐकून घेण्याच्या मानसिकतेत आहे. म्हणून तक्रारी झाल्या. या निर्णयावर आखाती देशांमध्ये आणि आपल्याही देशात बरीच उलटसुलट चर्चा होत असली तरी सौदीतील निर्णयात बदल होण्याची शक्यता नाही. तसे पाहिले, तर आज भ्रमणध्वनीयुगात बांग देऊन ध्वनिप्रदूषण करण्याची आवश्यकताच नाही. घरटी भ्रमणध्वनी असतो. त्यावर नमाजाच्या पाच वेळी अलार्म देणे आणि रमजानच्या महिन्यातील सर्व महत्त्वाच्या वेळी तो वाजण्याची व्यवस्था करता येईल. यापुढे बांग नकोच, असा आग्रह नागरिकांनी का धरू नये?
 
भारतात परिस्थिती बदलेल?
 
सौदीतील भोग्यांसंदर्भात झालेल्या निर्णयाचे पडसाद भारतात लगेच उमटले. ई-माध्यमांमधून सौदीच्या निर्णयावर सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे येथील मशिदींमधून बाहेर पडणारे आवाज लगेच कमी होतील, असे समजण्याचे कारण नाही. विरोधात कुणी तक्रार केली, तर तक्रार करणार्‍याचे नाव माहिती करून घेऊन त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात, हेही सर्वांना माहिती आहे. थोडा फार बदल घडण्याची शक्यता जर तक्रारी स्थानिक मुस्लीम नागरिकांनी केल्या तर घडू शकेल. दहा हिंदूंनी एकत्र येऊन तक्रारी केल्या तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही. यावर उपाय कोणता? उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांनी काय करता येते, हे दाखवले आहे. योगी सरकारकडून ते भोंगे वाजवणार्‍यांच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता दिसल्याने भीतीपोटी मुदतीच्या आधीच ते काढले गेले. जेथे ठेवले आहेत तेथे आवाजावर नियंत्रण राखले जाते. जर प्रशासन निर्धार करेल, तर काय होऊ शकते याचा वस्तुपाठ इतर राज्यांमधील सरकारांनी गिरवला, तर चांगलेच होईल.
 
गांधीमार्गाचा पर्याय
 
ध्वनिवर्धकांवर नियंत्रण इतर राज्यांत, विशेष करून गैर-भाजप राज्यात अंमलात येणे सध्या तरी शक्य वाटत नाही. कारण, मतपेढीचे राजकारण आडवे येते. अशावेळी, शक्य असेल त्या ठिकाणी हिंदू-मुस्लीम अशा दोन्ही समाजातील सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन तक्रारी स्थानिक पातळीवर नोंदवाव्या. त्यामुळे मुस्लीम नेते आणि धर्मगुरू दरवेळी धार्मिक अन्याय होतो, असा कांगावा (तळलींळा लरीव) करतात तो होऊ शकणार नाही. कारण, या भोंग्यांची झळ केवळ हिंदूंनाच पोहोचते असे नाही. ते झाले, तर स्थानिक प्रशासनाचे हात बळकट होतील. ते या भोंग्यांविरोधात पाऊल उचलू शकतील. या प्रथेविरोधात नागरिकांच्या हितासाठी केलेले कायदे ठामपणे अंमलात आणू शकतील. गांधीमार्गाने चालायचे, तर अशा मशिदींसमोर आवाज कमी करा, रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत ध्वनिवर्धक लावू नका, अशा आशयाचे पोस्टर-बॅनर नागरिकांना, स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र येऊन लावता येतील. कुठल्याही नासुकल्या कारणांसाठी स्थानिक कार्यकर्ते बॅनरबाजी करतातच. त्या बॅनर्सवर वाटल्यास न्यायालयांनी या संदर्भात दिलेल्या निवाड्यांचे संदर्भ आणि सौदी अरेबियातील आदेश टाकता येतील.
 
हे केले, तर मुस्लीम नेते मंडळी आणि मौलानांना कांगावा करता येणार नाही. बॅनरवर आपले नाव झळकावे यासाठी छोटे-मोठे कार्यकर्ते उत्सुक असतात, त्यासाठी सर्व मिळून पदरमोड करतात. खरे पाहिले, तर बॅनरवर झळकलेले नाव त्याच्या आणि अगदी जवळच्या ओळखीतील चार लोकांच्या पलीकडे जात नसते. अशा भोंग्यांविरोधात बॅनरवर झळकलेले नाव एखाद्या वाढदिवसाच्या बॅनरवरील नावापेक्षा अधिक समाजोपयोगी असेल. यात स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे. स्थानिक छोट्यामोठ्या कार्यकर्त्यांची 10-15 नावे एकेका पोस्टर-बॅनरवर झळकली, तर मुस्लीम समाजातील उपद्रवी आणि धमक्या देऊन भिवविण्यात पटाईत असलेल्यांना चाप बसेल. एकटं-दुकटं व्यक्तीला ते धमकावू शकतात, भीती घालू शकतात. पण, सर्व समाज एकवटून सांगू लागला, तर त्यांचं काय चालेल? हे सर्व करूनही भोंग्यांचे आवाज कमी झाले नाही, तर नगरसेवकांना सांगून पाहा आणि त्याच बरोबर हेही स्पष्ट करा की, पुढच्या वेळी मत देताना विचार करावा लागेल. सामाजिक निर्धाराचे असेही प्रकटीकरण आवश्यक आहे.
 
- डॉ. प्रमोद पाठक
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.