प्रकाशसारखे नेते नकोत!

17 Mar 2023 06:30:01
vba-prakash-ambedkar-on-godhra-riots


समाजोन्नतीमध्ये शून्य योगदान असताना आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे भोळा समाज आपल्याला मानतो, याचे तर भान प्रकाश आंबेडकर यांनी ठेवावे? नुकतेच प्रकाश गोध्रा हत्याकांडाबद्दल बोलताना म्हणाले की, “रेल्वेचा डबा जाळायचा मीही प्रयत्न केला. नाही असं नाही. पण, तो बाहेरून जळत नाही. तुम्हीही प्रयत्न करा. पेट्रोल टाका, डिझेल टाका, काहीही टाका. तो बाहेरून पेटत नाही. त्याला आतूनच पेटवावा लागतो.” आता हा भडकावू दावा करणार्‍या प्रकाश यांनी जनतेची संपत्ती असलेलारेल्वे डबा कुठे, कधी, कसा पेटवण्याचा प्रयत्न केला, याबाबत ते काही खुलासा करतील का? भारताच्या संविधानामध्ये आणि लोकशाहीमध्ये हे असले कृत्य करणार्‍यांना काय म्हंटले जाते? बरं, रेल्वेचा डबा काय प्रकाश यांची किंवा त्यांचा वंचित बहुजन आघाडीची किंवा त्यांचे बहुचर्चित नातेवाईक तेलतुंबडे यांची वैयक्तिक संपत्ती नव्हती. ती राष्ट्रीय संपत्ती होती. लोकसंपत्ती होती. गोध्रा हत्याकांडाबद्दल कारसेवेतून परतताना गोध्रा जळीतकांडाचे साक्षीदारांचे म्हणणे होते की, रेल्वेच्या डब्याचे दरवाजे बाहेरून बंद होते. तसेच बाहेर दुतर्फा सशस्त्र जमाव उभा होता. त्यामुळे बाहेर पडले तरी समोर मृत्यूच होता. त्यावेळी मृत्यू पावलेल्या निष्पापांच्या त्या किंकाळ्या, ती मन:स्थिती याबाबत विचार केला तरी असह्य होते. या दुःखावर मीठ चोळण्यासाठीच की काय, आता प्रकाश यांनी म्हणे भाजपवाल्यांना आवाहन केले की, ‘माझ्याासोबत बसा खुले आम.’ का तर म्हणे, प्रकाश यांचे म्हणणे रेल्वे डब्याच्या आतूनच कुणी तरी डबा पेटवला. प्रकाश असे म्हणतात ते काही उगीच नाही, तर असे बोलून ते या अमानवी गुन्ह्यात दोषी होते, त्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. किती तो गुन्हेगारांचा पुळका! हा असाच पुळका प्रकाश यांना कधी समाजातील गरीब-वंचितांचा आला का? पक्षाचे नाव ‘वंचित’, पण एकही कृत्य असे नाही की, समाजातील वंचितांचे काही भले केले असेल. मागच्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला हिरवे झेंडे नाचवत गोल टोपी घातलेले लोक मिरवणुकीत घुसले आणि मिरवणुकीतील आयाबायांना त्रास दिला. त्या आयाबायांबद्दल प्रकाश यांना काही वाटले का? संविधानप्रेमी आणि देशप्रेमी बनवण्याऐवजी समाजातल्या युवकांना कोरेगाव-भीमाच्या दंगलीत लोटण्याचा क्रूरपणा कोणी केला? देवा, प्रकाश आंबेडकरसारखे नेते कोणत्याही समाजाला न मिळोत!


समज देणे गरजेचे!


जो पर्यंत ट्रेन स्टेशनवर थांबली आहे, तोपर्यंत ट्रेनच्या दरवाजामध्ये साळसुदपणे उभे राहायचे. एकदा का ट्रेनने वेग पकडला की, स्टेशनवरच्या लोकांना टपली मार, शिवीगाळ कर, महिलांना अर्वाच्च बोली, स्पर्श करणारे टोळके मुंबईमधील लोकलने प्रवास करणार्‍या प्रत्येकाने पाहिलेलेच. हे टोळके ज्या लोकल डब्यात प्रवास करते, तो लोकलचा डबा माणसांनी गच्च भरलेला असतो. पण, या टोळक्याच्या वागण्यावर कुणी हु की चू करेल तर शपथ! बरं स्टेशनवर रेल्वे पोलीसही असतात, पण एकदा स्टेशनमधून लोकल सुटली की आपल्याला काय करायचे आहे, असेच या पोलिसांनाही वाटत असावे.रेल्वे प्रवासादरम्यान लेाकांना त्रास देणार्‍यांपैकी एकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ’ए पोलीस मॅडम, बहुत क्युट हे तुम’ असे वांद्रे स्थानकातील महिला पोलिसांना संबोधत धावत्या लोकल ट्रेनमध्ये त्यांनी ‘रिल्स’ बनवले. त्या मुलांचे राहणीमान, केशभूषा, वेशभूषा आणि एकंदर भाषा या सगळ्यांवरून त्याची संस्कृती कळत होती. स्वतःला ‘मस्तान’ कंपनीचा म्होरक्या मानणार्‍या या युवकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच ‘व्हायरल’ झाला आहे. लोक संताप व्यक्त करत आहेत. कारण, याच व्यक्तीच्या इन्स्टाग्राम आयडीवरून हातात शस्त्र घेतलेले आणि धमकी देणारे व्हिडिओही ‘व्हायरल’ झाले. मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलीस या विरोधात काय कारवाई करणार, असा प्रश्न लोक विचारत आहेत. महिला पोलिसांनाही त्रास देण्याची यांची हिंमत होते, तर सामान्य मुलीबाळींची काय गत? बरं, महिला पोलिसांची छेड काढून वर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची इतकी हिंमत यांच्यात येते कुठून? की खरेच कायदा-सुव्यवस्था, सुंस्कार आणि सज्जन समाज यापासून हे लोक इतके दूर असतील का? नीती-अनीती, सामाजिक संकल्पनेच्या चौकटी यांच्यासाठी काहीच नसते असे का? हं, पण सोशल मीडियाचा वापर करतात, त्यामुळे जगरहाटी माहिती आहे. अज्ञानी आहेत असे तरी कसे बोलावे? आपण विशिष्ट समाजाचे आहोत आणि आपण काहीही केले तरी आपला समाज आणि राजकारणातले काही स्वार्थी लोक आपल्यपाठी उभे राहतीलच, असे यांना वाटते. त्यामुळेच यांना हा माज आलेला आहे का? काहीही असो, वांद्रे स्थानकात महिला पेालिसांची टिंगल-छेड काढणार्‍यांना यथेच्छ कायदेशीर समज ही मिळायला हवी!

 

 
Powered By Sangraha 9.0