पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शीख समुदायाचा विशेष स्नेह : जसवंत सिंग ठेकेदार

17 Mar 2023 17:48:34
pm-modi-khalistan-movement-pakistan-isi-amritpal-punjab-aap-amritpal-jaswant-singh-thekedar
 
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शीख समुदायाविषयी विशेष स्नेह आहे. त्यांनी शीख समुदायासाठी आणि शीख धर्मासाठी खूप काही केले आहे. त्यामुळे आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या अमृतपालसारख्यांचा भारतीय शीखांशी कोणताही संबंध नाही, असे प्रतिपादन दल खालसाचे संस्थापक आणि माजी खलिस्तान समर्थक जसवंत सिंग ठेकेदार यांनी केले आहे.

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख समुदाय आणि शीख धर्मासाठी खूप काही केले आहे. त्यांच्या मनात शीख समुदायाविषयी स्नेह आहे. त्यांनी शीख धर्मासाठी खूप काही केले आहे. करतारपूर कॉरिडॉर सुरू करणे, छोटे साहिबजादे (गुरु गोविंद सिंग यांचा मुलगा) यांच्या स्मृती जागविण्यासाठी वीर बाल दिवस घोषित करणे हे अतिशय महत्वाचे निर्णय आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शीख समुदायाच्या सदस्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचे काम केले आहे, असे जसवंत सिंग ठेकेदार म्हणाले.
 
सुधारित नागरिकत्व कायद्याचेही (सीएए) जसवंत सिंग ठेकेदार यांनी समर्थन केले आहे. ते पुढे म्हणाले, सीएएद्वारेच अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदूंना सुरक्षितपणे भारतात आणणे शक्य झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शीख शिष्टमंडळास आपल्या घरी बोलावून त्यांचा सन्मान केला होता आणि भारत हे त्यांचे गरच असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे शीख समुदाय आणि पंतप्रधान मोदी हे अतुट नाते असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
अमृतपाल आयएसआयचे प्यादा


खलिस्तानी असल्याचा दावा करणारा अमृतपाल सिंग हा पारंपरिक शीख नाही. तो दुबईत असताना शीख धर्माचे पालन करत नसल्याचे अनेकदा दिसून आले होते. अमृतपालसारखे लोक हे आयएसआयच्या हातचे प्यादे असून त्यांचा वापर आयएसआय दीर्घकाळसाठी कधीही करत नाही. त्यामुळे अमृतपाल आणि त्याच्या कथित चळवळीची भारतीय शीखांशी कोणताही संबंध नाही, असे जसवंत सिंग ठेकेदार यांनी म्हटले आहे.


 
Powered By Sangraha 9.0