केंद्रातील मोदी सरकारच्या वर्धापन दिनाला विकासकामांचे तोरण बांधणार

17 Mar 2023 14:47:05
modi-govts-9th-anniversary-celebrations-pms-popularity-welfare-schemes
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा नववा वर्धापन दिन दि. ३० मे रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या वर्धापन दिनाची जय्यत तयारी केंद्र सरकारकडून केली जात असून, मोदी सरकारच्या काळात करण्यात येत असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा या निमित्त मांडण्यात येणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भात मंत्रिमंडळातील सदस्यांची नुकतीच एक बैठक घेऊन वर्धापन दिन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. मोदींची लोकप्रियता आणि केंद्र सरकारच्या विकास योजनांची जाहिरात करण्यावर केंद्र सरकारचा भर देण्यात येणार आहे. वर्धापन दिनाच्या तयारीसाठी मंत्रिमंडळातील सदस्यांचा एक गट तयार करण्यात आला आहे. यामध्ये कॅबिनेटमंत्री आणि काही राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

मंत्रिमंडळाच्या या गटात गजेंद्र शेखावत, प्रल्हाद जोशी, अर्जुन मेघवाल, व्ही. मुरलीधरन, राजीव चंद्रशेखर, भारती पवार, दर्शना जरदोश, एल मुरुगन आणि सुभाष सरकार यांचा समावेश आहे. मोदी सरकारच्या मागच्या नऊ वर्षांतील कामगिरीची जाहिरात करण्यासाठी हा मंत्री गट इतर मंत्री आणि राज्यांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून विविध कार्यक्रमांची आखणी करेल.

 
Powered By Sangraha 9.0