वस्त्र निर्मितीचे जागतिक केंद्र बनण्यास भारत सज्ज

    17-Mar-2023
Total Views |
modi-government-approves-pm-mitra-mega-textile-park-project-in-seven-states-of-india

- ‘पंतप्रधान मित्र मेगा टेक्सटाईल पार्क’द्वारे २० लाख रोजगार

- महाराष्ट्रात होणार १० हजार कोटींची गुंतवणूक, ३ लाख रोजगारही निर्माण होणार

- 'मेक इन इंडिया - मेक फॉर द वर्ल्ड'चे उत्कृष्ट उदाहरण – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 
 
नवी दिल्ली :देशातील वस्त्रोद्योगास चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘पंतप्रधान मित्र मेगा टेक्सटाईल पार्क’ची घोषणा केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून राज्यात त्याद्वारे दहा हजार कोटींच्या गुंतवणुकीसह ३ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे.

देशातील वस्त्रोद्योग उद्यागाचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान मित्र मेगा टेक्सटाईल पार्क’ योजनेची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील सात राज्यांमध्ये पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्कला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे देशात १४ लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होणार आहेत. शासनाच्या या मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कमधून कपड्यांच्या निर्मितीपासून त्यांचे मार्केटिंग, डिझायनिंग आणि निर्यातीपर्यंत सर्व काही एकाच ठिकाणाहून करणे शक्य होणार आहे. यामुळे भारत वस्त्रनिर्मितीचे जागतिक केंद्र आणि सर्वात मोठा आयातक बनणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे त्याविषय़ी माहिती दिली. ते म्हणाले, देशातील तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे उभारण्यात येणार असलेली ‘पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्क’ पाच ‘एफ’ च्या माध्यमातून (फॉर्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) भारताच्या कापड व्यवसाय क्षेत्राला चालना देतील. ‘पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स’ कापड उद्योग क्षेत्राला आधुनिक पायाभूत सुविधा पुरवतील, करोडोंची गुंतवणूक आकर्षित करतील आणि लाखो रोजगारांची निर्मिती करतील. हे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ याचे उत्कृष्ट उदाहरण ठरेल, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

लाखो रोजगार निर्माण होणार


योजनेसाठी पुढील पाच वर्षांसाठी ४ हजार ४४५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा पार्क्सचा विकास पीपीपी मॉडेलनुसार करण्यात येणार असून त्याद्वारे ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे तब्बल २० लाख रोजगार याद्वारे निर्माण होतील.

१३ राज्यांचे प्रस्ताव, सात राज्यांची निवड


टेक्सटाईल पार्कसाठी १३ राज्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाले होते, त्यातील ७ राज्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय या प्रकल्पावर देखरेख ठेवणार असून त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मालकीची एसपीव्ही स्थापन केली जाणार आहे. वस्त्रोद्योग मंत्रालय प्रत्येक एसपीव्हीस ५०० कोटी आणि त्यातील प्रत्येक युनीटला ३०० कोटींपर्यंतचे स्पर्धात्मक प्रोत्साहन सहाय्य दिले जाणार आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार कटिबद्ध – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री


‘पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्क’ योजनेत महाराष्ट्राचा समावेश झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारचे आभार मानले. ते म्हणाले, महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात पीएम मित्रा अंतर्गत पीएम मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार या प्रत्येक मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून १० हजार कोटींची गुंतवणूक तसेच १ लाख प्रत्यक्ष तर २ लाख अप्रत्यक्ष असे ३ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. विशेषतः पश्चिम विदर्भाच्या विकासाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.