सायबर युद्धाचा सामना करण्यास भारत सज्ज : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे

17 Mar 2023 18:00:55
indian-army-chief-general-manoj-pande-told-about-preperation-to-combat-china-cyber-warfare
 
नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धातून अनेक नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. लष्कर आणि सैनिकांचे आधुनिकीकरण करण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर तंत्रज्ञान यांचा विकास भारत करत आहे. त्यामुळे चीनसह कोणत्याही देशाच्या सायबर हल्ल्यांचा सामना करण्यास भारत सज्ज आहे, असे प्रतिपादन देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले आहे.

रशिया – युक्रेन युद्धातून अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत, मात्र त्याकडे भारतीय परिप्रेक्ष्यातून पाहणे गरजेचे आहे. भारतास पारंपरिक शस्त्रात्रे, सीमांची सुरक्षा, कमीत कमी कालावधीचे युद्ध या आता विशेष प्राधान्य द्यावे लागणार आहे. पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रीत करून शस्त्रे, रसद आणि तांत्रिक मदतीचा पुरवठा अविरत ठेवण्याकडे लक्ष पुरवावे लागणार आहे. त्याचप्रमाणे सायबर, एआयसारख्या युद्धावरही लक्ष ठेवावे लागेल, असे लष्करप्रमुखांनी म्हटले.

भारतात डिफेन्स स्टार्टअपची इकोसिस्टीम तयार होत असल्याचे लष्करप्रमुखांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, एक अभियंता या नात्याने मी लष्करात होत असलेले बदल अतिशय आधुनिकपणे पाहतो. भविष्यातील युद्धाची व्याख्या बदलत असून भारताचे लष्करही बदलत आहे. प्रशासकीय स्तरावही अनेक सकारात्मक बदल होत आहेत. त्याचप्रमाणे चिनी भाषेचे तज्ज्ञ असलेल्या तरुणांनाही लष्करामध्ये मोठ्या संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.



Powered By Sangraha 9.0