‘लव्ह जिहाद’सह धर्मांतरणाविरोधात ‘हुंकार’

मराठी नववर्षदिनी हिंदू हुंकार सभेचे आयोजन

    17-Mar-2023
Total Views |
hindu-hunkar-sabha


नाशिक
: देशभरात वाढत असलेले ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार, ‘लॅण्ड जिहाद’, धर्मांतरण याविरोधात नाशिकध्ये मराठी नववर्षदिनाच्या दिवशी हिंदू हुंकार जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेतून हिंदू राष्ट्र निर्माणाची हाक देण्यासाठी साधू-महंत तसेच लाखो हिंदू भाविकांच्या उपस्थितीत सभा होणार असल्याची माहिती स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. बुधवार, दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदनावर सभा होणार आहे.
 
भारतानंद महाराज पुढे म्हणाले की,”गेल्या काही वर्षांमध्ये श्रद्धा वालकरसारखे ‘लव्ह जिहाद’चे प्रकार घडत आहे. हिंदूंच्या जमिनीही बळकावण्याचे प्रमाण वाढत आहे, वनवासी पाड्यांसह शहरातही धर्मांतरणाचे प्रकार वाढत असल्याने हिंदू हुंकार सभेचे आयोजन करण्याची वेळ आली. भविष्यातील आव्हानांचा वेध घेत सभेतून आवाज उठवला जाणार आहे. सकल हिंदू धर्माचे सक्षम भविष्य, सुसंस्कृत पिढी निर्माण, नवी पिढीचे अस्तित्व टिकवण्यासह सभेमध्ये देशाच्या कल्याणासाठी सुधारित कायदे यावेत म्हणून सभेतून हुंकार दिला जाणार आहे.”

सभेसाठी ‘सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष सुरेश चव्हाणके प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. हिंदू हुंकार सभेसाठी आखाडा परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी हरिगिरीजी महाराज, महामंडलेश्वर स्वामी श्री शांतीगिरीजी महाराज, गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे, राष्ट्रसंत अनंत श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, श्री श्री १००८ महामंडलेश्वर रघुनाथ बाबा, जगद्गुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदास लहवितकर, स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज उपस्थित राहणार आहे.पत्रकार परिषदेस सामाजिक कार्यकर्त्या ज्योती चव्हाणके, गणेश घोडके, राष्ट्र निर्माण संघटनेचे विवेकानंद दीक्षित, श्रीकांत रांजणकर, नागेश्वरानंद आदी उपस्थित होते.


hindu-hunkar-sabha


लाखो हिंदू बांधवांची उपस्थिती


हिंदू हुंकार सभेच्या नियोजनासाठी नाशिक जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सभेस लाखांच्यावर हिंदू बांधव उपस्थित राहणार असून, यावेळी विविध ठराव मांडले जाणार आहे. या ठरावांद्वारे सरकारकडून कायदे तयार केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.