हिंदू प्रबोधनाचे ‘तुषार’ सिंचन!

    17-Mar-2023   
Total Views |
Tushar Dnyaneshwar Ashtekar

 
प्रबोधनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची पिढी तयार करण्यासाठी तो झटतोय. जाणून घेऊया तुषार ज्ञानेश्वर अष्टेकर या धर्मवेड्याविषयी...

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये जन्मलेल्या तुषार ज्ञानेश्वर अष्टेकर याने लहानपणापासूनच गरिबीचे चटके सहन केले. गरिबीमुळे मुलाचे शिक्षण थांबू नये, म्हणून आई-वडिलांनी वयाच्या चौथ्या वर्षी त्याला मामाकडे पाठवले आणि दोघेही पुण्यात कामानिमित्त स्थायिक झाले. तुषारचे प्राथमिक शिक्षण मामाकडेच बेलसर जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण येणेरे येथील शिवछत्रपती विद्यालयात पूर्ण झाले. मामा राजेंद्र दहिवाळ यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी तुषार सुट्टीच्या दिवशी गवंड्याच्या हाताखाली किंवा मोलमजुरी करत असे. गावात हरिनाम सप्ताह, वरसुआईच्या रामायण कथेदरम्यान रामायण नाटीकांमध्येही तो सहभाग घेत असे.

नववीत असताना त्याचे आई-वडील पुण्याहून सातार्‍यातील वेळे गावी स्थायिक झाले. दहावीनंतर तुषारने दोन वर्ष कौशल्य विकास प्रशिक्षण घेतले. पुढे, छत्रपती महाविद्यालयात ‘बीए’करिता प्रवेश घेतला. नंतर पुण्यात बहिणीकडे राहूनच त्याने खासगी कंपनीत जवळपास पाच वर्षं नोकरी केली. शिरवळ ‘एमआयडीसी’त काम मिळेल म्हणून तुषार २०१२ साली वेळे येथे आई-वडिलांसोबत राहू लागला. नोकरी मिळेपर्यंत त्याने हॉटेलमध्ये काम केले. वडीलही हॉटेलमध्ये तर आई भाजीपाल्याचा व्यवसाय करत असे. २०१५ साली गावात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीला तुषारनेही हजेरी लावली. यावेळी त्याला महानगड ते रायगड गडकोट मोहिमेची माहिती मिळाली. बैठकीत ५० जणांनी मोहिमेला येण्यासाठी होकार दिला. परंतु, प्रत्यक्षात प्रसाद पवार आणि स्वतः तुषार असे दोघेच मोहिमेला गेले. मोहिमेला गेल्यानंतर तुषार भारावून गेला. शिवरायांवर किती लोकं प्रेम करतात, हे त्याने प्रत्यक्ष पाहिले.
 
यानंतर त्याने ‘शिवप्रतिष्ठान’च्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. प्रतिष्ठानच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी तो परिश्रम घेऊ लागला. सागर मालुसरेंसोबत त्याने गोरक्षणाचे कार्य हाती घेतले. हे सर्व करत असताना घरची परिस्थिती मात्र हलाखीची होती. त्यामुळे तुषारने अनुभवाकरिता काही काळ घरातूनच कपड्यांचा व्यवसाय सुरू करत नंतर वाईला गाळा घेऊन कपड्यांचे दुकान सुरू केले. कामाचा धडाका पाहता परिसरातील १४ ते १५ गावांची जबाबदारी तुषारसह अन्य सहकार्‍यांना देण्यात आली. तुषारने सर्व गावांमध्ये बैठकांचा धडाका लावला. कोरेगाव तालुक्यात प्रतिष्ठानचे काम पोहोचवण्यासाठी १० ते १२ गावांची जबाबदारीही त्याला देण्यात आली. फलटण येथे कत्तलखाना असल्याने याठिकाणी कार्य सुरू करणे आवश्यक होते. तेव्हा, त्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी ओळख तयार करून त्यांना आपल्यासोबत जोडले. खंडाळा तालुक्यात काम सुरू केल्यानंतर तिथे कायम येणे जाणे असायचे. तेव्हा, वाईतील दुकान बंद करून एसटीने खंडाळ्याला जाण्यात वेळ खर्च व्हायचा. तेव्हा, तुषारने खंडाळ्यातच दुकान सुरू केले. यानंतर हिंदू जनजागरण समिती, रा. स्व. संघ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अशा सर्वांनी सोबत येत याठिकाणी हिंदू जनजागृतीसह गोरक्षणाचे काम सुरू केले.


वेळ्यात भाड्याच्या घरात राहणार्‍या तुषारने नंतर गावातच हक्काचेे घर खरेदी केले. गेल्या सहा वर्षांमध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक बैठकांच्या माध्यमातून त्याने हिंदुत्वाचा आणि छत्रपती शिवरायांचा विचार तरुणांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि आजही करतोय. आताच्या बहुतांशी तरुणांना हिंदू धर्म, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान याविषयी फारशी माहिती नसते. संभाजी महाराजांना मारणार्‍यांचे वैचारिक वारसदार आजही जीवंत आहेत. हे वारसदार सध्या कसे त्रास देतात, हे तुषार बैठकीतून तरुणांना समजावून सांगतो. ‘बलिदान मास’, ‘दुर्गा दौड’, ‘गडकोट मोहीम’ यांसह ‘लॅण्ड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, गोरक्षणाविषयी तुषार मार्गदर्शनासह प्रबोधन करतो. बैठकींना तरुणांसोबत मुलींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तुषारला क्रांतीकुमार सुकुंडे, ज्ञानेश्वर जगताप, संदीप जायगुडे, संदीप साळुंखे, संतोष काळे, विशाल मोरे, दिनेश खैरे, किशोर भोसले, काळूआबा, काशिनाथ शेलार, अक्षय शिंदे, गौरव पवार, अभिजित पवार, केतन पवार, शुभम यादव, रोहन यादव, अक्षय पवार यांचे सहकार्य लाभते.

गावात आधी तुषार व त्याचा सहकारी प्रसाद असे दोघेच प्रतिष्ठानचे काम करत होते. परंतु, आता ही संख्या ७०हून अधिक झाली आहे. अनेक हिंदू सध्या निद्रिस्त असून त्यांना जागृत करण्यासाठी मरेपर्यंत कार्यरत राहण्याचा तुषारचा मानस आहे. तसेच, हिंदू म्हणून आपण धर्मासाठी काय करतो. किती वेळा मंदिरात जातो, असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तगटाची पिढी तयार करण्यासाठी अखेरपर्यंत झटणार असल्याचे तुषार सांगतो. व्यवसायात यश मिळवत सोबत हिंदू धर्मासाठी आणि हिंदू जनजागृतीसाठी स्वतःला वाहून घेणार्‍या तुषार अष्टेकर या धर्मवेड्याला आगामी वाटचालासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
 

अधिक माहितीसाठी संपर्क ः ७०५८५८९७६७


पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.