मंदिरे, तीर्थक्षेत्रांचा पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला बळ

    17-Mar-2023
Total Views |
Tourism development of temples, pilgrimage sites and strengthening of the economy


देशविदेशातील मंदिरे ही केवळ धर्मजागरणाचे पवित्र स्थानच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणाही मानली जातात. त्याच अनुषंगाने केंद्रातील मोदी सरकारने धार्मिक पर्यटनाला विविध माध्यमातून चालनाही दिली. त्यानिमित्ताने या मंदिरांचे महत्त्व, तीर्थक्षेत्रांचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास आणि अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण याचा आढावा घेणारा हा लेख...


भारतातील मंदिरे देशातील समृद्ध, धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा प्रतिबिंबित करतात. भारतामध्ये दोन दशलक्षांहून अधिक मंदिरे आहेत. ज्यापैकी अनेक मंदिरे महान श्रद्धा आणि चमत्कारांची ठिकाणे मानली जातात आणि ती देशातीलच नव्हे, तर जगभरातील भाविकांना आकर्षित करतात. याचे कारण म्हणजे, आजच्या या आधुनिकतेच्या युगातही आपली संस्कृती, चालीरीती आणि धर्म कसे जपायचे आणि अंगीकारायचे, हे आपणा भारतीयांना माहीत आहे.मंदिरे ही प्राचीन काळापासून व्यापार, कला, संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक जीवनाची केंद्रे राहिली आहेत. स्थानिक मंदिरं हे तर समाजाचे केंद्र होते. येथेच लोक आरोग्य, संपत्ती, संतती, विशिष्ट अडथळा दूर करण्यासाठी किंवा मौल्यवान काहीतरी मिळवण्यासाठी देवदेवतांना भक्तिभावाने प्रार्थना करायचे आणि आजही करतात. येथेच लोक भेटायचे, बातम्या आणि कल्पनांची देवाणघेवाण व्हायची. त्यांच्या कथा, त्यांच्या अडचणींवर चर्चा होत असे. एकमेकांना ही मंडळी सल्ला विचारायचे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाचे नियोजनही करायचे.

देशातील प्रत्येक राज्याची स्वतःची अशी वेगळी परंपरा आणि या प्रत्येक राज्याचा सांस्कृतिक केंद्रे म्हणून धार्मिक-सामाजिक जबाबदारी निभावणार्‍या अनेक मंदिरांचा समृद्ध असा इतिहास आहे. ‘रिलिजन’ नाही, तर ‘धर्मा’ने राष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जागतिक दृष्टिकोनाला आकार दिला आहे आणि त्यांना आध्यात्मिकरित्या प्रगतदेखील होऊ दिले. भारतातही अनेक श्रीमंत मंदिरे आहेत, जी दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटकांना आकर्षित करतात.मंदिरे ही भारतातील अशी आध्यात्मिक स्थळे आहेत, जिथे लोक शांती, समृद्धी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात. यापैकी बरीच मंदिरे तर स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्ट नमुना मानली जातात आणि त्यापैकी अनेक मंदिरे प्राचीन काळात बांधली गेली होती आणि सांगण्यासाठी अशा या मंदिरांबद्दल भरपूर आकर्षक कथा, रंजक कहाण्या आहेत. यातील काही मंदिरे तर खूपच श्रीमंत आहेत. कारण, त्यांच्याकडे मोठ्या किमतीचे जमीन किंवा सोने आहे. अनेक मंदिरांमध्ये मौल्यवान वस्तू आणि पुरातन वस्तूंचा संग्रह आहे, जो पिढ्यान्पिढ्या तसाच आहे.

मजबूत अर्थव्यवस्था आणि रोजगारनिर्मितीसाठी मंदिरांचे योगदान


काही मार्गांनी, तीर्थक्षेत्र-समृद्ध तसेच पर्यटन-समृद्ध आर्थिक क्षेत्रांची वाढ व्यापक संशोधनातून सिद्ध झाली आहे. कारण, संपूर्ण भारतीय इतिहासात मंदिरे ही महत्त्वपूर्ण आर्थिक केंद्रे होती. ‘मिनेसोटा युनिव्हर्सिटी’च्या बर्टन स्टीन यांनी १९६० मध्ये यावर ‘द इकोनॉमिक फंक्शन ऑफ ए मीडिव्हल साऊथ इंडियन टेंपल’ नावाचा एक महत्त्वपूर्ण शोधनिबंधही लिहिला, जो ‘द जर्नल ऑफ एशियन स्टडीज’मध्ये प्रकाशित झाला.‘एनएसएसओ’च्या आकडेवारीनुसार, धार्मिक यात्रेला जाणारे ५५ टक्के हिंदू मध्यम आणि लहान आकाराच्या हॉटेलमध्ये राहतात. धार्मिक प्रवासाचा खर्च प्रतिदिवस/व्यक्ती रु. २ हजार, ७१७, सामाजिक प्रवासाचा खर्च प्रतिदिवस/व्यक्ती रु. १,०६८ आणि शैक्षणिक प्रवासाचा खर्च प्रतिदिवस/व्यक्ती रु. २ हजार, २८६ आहे. हे दैनंदिन खर्च १ हजार, ३१६ कोटी रुपये आणि धार्मिक तीर्थयात्रेवर वार्षिक ४.७४ लाख कोटी रुपये खर्चाच्या समतुल्य आहे.
 
‘एनएसएसओ’च्या सर्वेक्षणानुसार, मंदिराची अर्थव्यवस्था ३.०२ लाख कोटी रुपये किंवा सुमारे ४० अब्ज इतकी आहे आणि ‘जीडीपी’च्या ती २.३२ टक्के आहे. प्रत्यक्षात ती खूप मोठी असू शकते. फुले, तेल, दिवा, अत्तर, बांगड्या, सिंदूर, मूर्ती, चित्र आणि पूजेचे कपडे यांचा समावेशही त्यात होतो. ही कामे बहुतांशी असुरक्षित-अनौपचारिक कामगारांच्या माध्यमातून चालतात. असाही एक अंदाज आहे की, एकट्या प्रवास आणि पर्यटन उद्योगाने भारतात ८० दशलक्ष लोकांना रोजगार दिला आहे, ज्याचा वार्षिक वृद्धी दर १९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि फक्त गेल्या वर्षात २३४ अब्जांपेक्षा जास्त महसूल यातून प्राप्त झाला आहे. सरकारी अंदाजानुसार, भारतातील सुमारे ८७ टक्के पर्यटक हे देशांतर्गत आहेत, तर उर्वरित १३ टक्के विदेशी पर्यटक आहेत. तसेच, हिंदू आणि बौद्ध धर्मीयांसाठीही वाराणसीचे धार्मिक महत्त्व कायम आहे. याचा अर्थ असा की, या प्राचीन शहराला एकूण देशांतर्गत पर्यटक आणि यात्रेकरूंची संख्या मोठी आहे.
 
२०२२-२३ साठी केंद्र सरकारचा महसूल १९ लाख ३४ हजार ७०६ कोटी रुपये आहे आणि केवळ सहा मंदिरांनी २४ हजार कोटी रुपये रोख जमा केले आहेत. देशांतर्गत धार्मिक पर्यटन परदेशी पाहुण्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. १०० कोटींहून अधिक देशांतर्गत नवीन स्थळांच्या पर्यटनावरून असे दिसून येते की, दिल्ली-आग्रा-जयपूर या सुवर्ण त्रिकोणाच्या पलीकडे मंथन सुरू आहे. नऊ कोटी परदेशी पर्यटकांपैकी २० टक्के पर्यटक तामिळनाडूतील मदुराई आणि महाबलीपुरम आणि आंध्र प्रदेशातील तिरुपतीला भेट देतात. गेल्या काही वर्षांमध्ये, जागतिक प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल (डब्ल्यूईएफ) आणि ‘युएनडब्ल्युटीओ’ पर्यटन निर्देशांक यांसारख्या प्रमुख जागतिक निर्देशांकांवर भारताच्या क्रमवारीत सातत्याने सुधारणा होत आहे. पर्यटन क्रियाकलापांमध्ये वाढ होण्यामुळे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्ससारख्या बहु-वापराच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यात मदत होते. परिणामी, भारत सरकारचा पुढील काही वर्षांत १०० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त किमतीचा ‘एफडीआय’ आकर्षित करण्याचा मानस आहे. ज्यामुळे अंदाजे १०० दशलक्ष नोकर्‍या निर्माण होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिर आणि पर्यटन उद्योगाकडे कसे पाहतात?

 
नुकतेच पंतप्रधान पर्यटनविषयक अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये बोलत होते, तेव्हा त्यांनी ‘रामायण सर्किट’, ‘बुद्ध सर्किट’, ’कृष्णा सर्किट’, ‘ईशान्य सर्किट’, ‘गांधी सर्किट’ आणि सर्व संतांच्या तीर्थक्षेत्रांचा आवर्जून उल्लेख करून त्यावर एकत्रितपणे काम करण्याचे महत्त्व सांगितले. काही लोकांना असे वाटते की, ‘पर्यटन’ हा उच्च उत्पन्न गटांसाठी एक भन्नाट शब्द आहे. परंतु, तो शतकानुशतके भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक भाग राहिला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. शतकानुशतके जनतेने केलेल्या विविध प्रवासांचा दाखला देत पंतप्रधानांनी चारधाम यात्रा, द्वादश ज्योतिर्लिंग यात्रा आणि ५१ शक्तिपीठ यात्रा यांची उदाहरणे राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी तसेच आपली श्रद्धास्थाने जोडण्यासाठी कशी वापरली जातात, हे दाखवून दिले. देशातील अनेक प्रमुख शहरांची संपूर्ण अर्थव्यवस्था या यात्रांवर अवलंबून असल्याचे नमूद करून पंतप्रधानांनी यात्रेची जुनी परंपरा असूनही सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अगोदरच्या सरकारांकडून विकास होत नसल्याबद्दल खेदही व्यक्त केला.
ते म्हणाले की, “देशाच्या नुकसानाचे मूळ कारण स्वातंत्र्यानंतरच्या दशकांतील शेकडो वर्षांची गुलामगिरी आणि या मंदिरांची राजकीय उपेक्षा हे आहे.

आजचा भारत ही परिस्थिती बदलत आहे. तसेच सुविधा वाढल्याने पर्यटकांचे आकर्षण वाढते,” असे ते म्हणाले. त्यांनी उपस्थितांना असेही सांगितले की, “नूतनीकरणापूर्वी वाराणसीतील काशिविश्वनाथ धामला एका वर्षात सुमारे आठ दशलक्ष लोकांनी भेट दिली होती. परंतु, गेल्या वर्षी पर्यटकांची संख्या ७० दशलक्षांपेक्षा जास्त झाली आहे. केदारघाटीच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण होण्यापूर्वी केवळ चार-पाच लाख भाविकांनी बाबा केदाराचे दर्शन घेतले होते. त्याचप्रमाणे गुजरातमधील माँ कालिकेच्या दर्शनासाठी ८० हजार यात्रेकरू पावागढला येतात. नूतनीकरणापूर्वी केवळ चार हजार ते पाच हजार यात्रेकरू भेट द्यायचे. याचाच अर्थ सुविधांच्या विस्ताराचा थेट परिणाम होतो. पर्यटकांची संख्या आणि अधिक पर्यटक म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अधिक संधी,” असे पंतप्रधान म्हणाले.हिंदू मंदिरांना बहुआयामी महत्त्व आहे, ज्यात बौद्ध, जैन आणि शीख मंदिरांचा देखील समावेश आहे. कम्युनिस्ट आणि धर्मांतर माफियांकडून हिंदू मंदिरे आणि धार्मिक प्रथा यांचा सतत निषेध आणि थट्टा केली जाते. जेव्हा समाज आणि देशाला सर्वात जास्त गरज होती, तेव्हा मंदिरांनी लोकांना एकत्र आणले.


तसेच आजही मंदिरांतर्फे नियमितपणे आणि आपत्कालीन परिस्थितीत राबविले जाणारे विविध सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत. अलीकडेच कोरोनाची मोठी आपत्ती आणि मंदिरांनी दिलेल्या मदतीमुळे गरजूंना मोठा दिलासा मिळाला, ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. शाळा, रुग्णालये, ग्रामविकास उपक्रमांसाठी मोठ्या मंदिरांचे काम कौतुकास्पद आहे.सध्याच्या सरकारने मंदिर स्थळांचे तसेच संबंधित पायाभूत सुविधांचे पद्धतशीर नियोजन आणि विकास करून, गुलामगिरीची मानसिकता तोडणे, सांस्कृतिक बंधने जोडणे, सामाजिक-आर्थिक आणि आध्यात्मिक विकासावर लक्ष केंद्रित करणे, अधिक सामाजिक एकता, शांतता शोधण्यासाठी जीवन साजरे करणे आणि समाज आणि देशाविरुद्ध रचलेल्या षड्यंत्राविरुद्ध एकसंघ म्हणून लढणे या सर्वांचा पाया घातला आहे, जो सर्वार्थाने कौतुकास्पद म्हणावा लागेल.

मंदिरांचे वैज्ञानिक महत्त्व

 
चुंबकीय आणि विद्युत लहरी पृथ्वीच्या आत सतत फिरत असतात. जेव्हा वास्तुविशारद आणि अभियंते मंदिराची रचना करतात, तेव्हा ते जमिनीचा एक तुकडा निवडतात, जिथे या लाटा भरपूर असतात. मुख्य मूर्ती मंदिराच्या मध्यभागी असते, ज्याला ‘गर्भगृह’ किंवा ‘मूलस्थान’ असेही म्हणतात. मंदिर बांधले जाते, आणि ‘प्राणप्रतिष्ठा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पूजेने मूर्तीला अभिषेक केला जातो. चुंबकीय लहरी अत्यंत सक्रिय असलेल्या ठिकाणी मूर्ती ठेवली जाते. मूर्ती ठेवताना त्याखाली काही ताम्रपट पुरतात. पाट्यांवर वैदिक लिपी कोरलेल्या असतात. या तांब्याच्या प्लेट्स पृथ्वीवरील चुंबकीय लहरी शोषून घेतात आणि त्या आजूबाजूच्या भागात पसरतात. परिणामी, जर एखादी व्यक्ती नियमितपणे मंदिराला भेट देत असेल आणि मूर्तीभोवती घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा घालत असेल, तर त्याचे शरीर या चुंबकीय लहरी शोषून घेते आणि त्याला सकारात्मक ऊर्जा मिळते, ज्यामुळे निरोगी जीवन जगते.

जवळजवळ सर्व हिंदू मंदिरांमध्ये मोठ्या घंटा असतात, ज्या प्रवेश करण्यापूर्वी वाजवल्या पाहिजेत. त्यामागील विज्ञानही आश्चर्यकारक आहे. मंदिरातील घंटा वेगवेगळ्या धातूंनी अगदी विशिष्ट प्रमाणात बनवल्या जातात. यामध्ये कॅडमियम, शिसे, तांबे, जस्त, निकेल, क्रोमियम आणि मँगनीज यांचा समावेश होतो. विज्ञानामागचे खरे कारण म्हणजे उत्पादनात वापरल्या जाणार्‍या धातूंचे मिश्रण आणि प्रमाण ज्यामुळे घंटा वाजवली की, वेगळा नाद निर्माण होतो आणि कंपन इतके वेगळे आणि विशिष्ट असतात की, ते मेंदूच्या दोन्ही बाजूंना (डावी आणि उजवी) जोडतात. याव्यतिरिक्त, मोठा आवाज आणि कंपन अनुनाद मोडमध्ये सात सेकंद टिकते, जे शरीराच्या सात उपचार केंद्रांना स्पर्श करण्यासाठी पुरेसे आहे. आवाजाने मन सर्व विचारांपासून रिकामे होते. ते खूप ग्रहणक्षम बनते, नवीन कल्पना स्वीकारण्यास तयार होते आणि मनाला चालू असलेल्या सर्व गोंधळापासून मुक्त करते. इतर अनेक फायद्यांमध्ये नकारात्मक विचारांचे उच्चाटन, एकाग्रता सुधारणे, मानसिक संतुलन आणि आजारपणात मदत यांचा समावेश होतो.

मंदिराच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची गरज


मंदिर आणि त्याच्याशी संबंधित अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावेल, विविध क्षेत्रांमध्ये लाखो रोजगार निर्माण करेल. यातील एक महत्त्वपूर्ण भाग पद्धतशीर व्यवस्थापनाद्वारे मजबूत केला पाहिजे. उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मंदिर, त्याचे व्यवस्थापन आणि त्याची अर्थव्यवस्था यांचा समावेश करणे, हा सुज्ञ दृष्टिकोन असेल. तरुण त्यांचे प्रयत्न आणि संसाधने मंदिराच्या अर्थव्यवस्थेच्या आणि संबंधित पर्यटन क्षेत्रांच्या विस्तार आणि विकासासाठी निर्देशित करू शकतात. दुसरा वादग्रस्त मुद्दा म्हणजे, सर्व प्रमुख हिंदू मंदिरांवरील सरकारी नियंत्रण काढून टाकणे. कोणताही राजकीय नेता नवीन मंदिर व्यवस्थापन समितीचा भाग नसावा, असा नवा कायदा सरकारने करावा. देणगीचा वापर त्या विशिष्ट धर्माच्या कल्याणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी केला पाहिजे व दुसर्‍या धर्माच्या चुकीच्या चालीरिती व कार्य यासाठी वापरता कामा नये. चला मंदिर संस्कृती आणि क्रियाकलापांना योग्य नजरेतून पाहू आणि मंदिराची अर्थव्यवस्था उभारण्यासाठी एकत्र काम करूया.




-पंकज जयस्वाल




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.