वेध विस्ताराचे..!

    17-Mar-2023
Total Views |
Shriguruji Hospital


संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाप्रमाणेच श्रीगुरूजी रुग्णालयाने आपली स्वतःची सुस्पष्ट अशी मुद्रा आज केवळ नाशिकमध्येच नाही, तर उत्तर महाराष्ट्रात निर्माण केली आहे. हे श्रेय जेवढे रुग्णालय उभे करण्याचा विचार करणार्‍या डॉक्टरांचे, तेवढेच त्यांच्या या अभिनव प्रयत्नांना साथ देणार्‍या त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणार्‍या स्थानिक समितीचे आणि आर्थिक बळ देणार्‍या दातृत्वाचेसुद्धाही. समाजाचा बदलणारा पोत लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंडेकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित श्रीगुरूजी रुग्णालयाने एक नवा आयाम उभा केला आहे. त्यातच आपल्या सेवाभावी कामाला नव्या वळणावर नेणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला नाही, तर कहाणीत काहीतरी अधुरे, अपूर्ण असे राहून जाईल.

एक ‘राष्ट्रप्रेमी वर्धिष्णू संघटना’ म्हणून संघाने चांगले पेरत जा, चांगले उगवेल या तत्त्वावर सामाजिकतेचे संस्कार घडवून ही संस्था उभी केली.केवळ स्वातंत्र्य मिळाल्याने राष्ट्र मोठे होणार नाही, हे ओळखून आता प्रत्येक नागरिकाने देशासाठी अर्थपूर्ण व शिस्तबद्ध जगणे महत्त्वाचे आहे. हा संदेश सर्वदूर पोहोचावा म्हणून आटापिटा करणारी, स्वतःचे काम निष्ठेने आणि चोख करणे हे राष्ट्रकार्यच आहे, असे मानणारी प्राचीन ऋषींच्या चिंतनातून प्रकट झालेली एकत्वाची आणि समरसतेची भावना प्राणपणाने जपणारी ही संस्था होय. माझे शिक्षण, माझी प्रतिभा, शक्ती, बुद्धी, माझा क्षण-क्षण हे सारे माझे एकट्याचे नाहीच. यावर हक्क आहे माझे व्यक्तिमत्त्व घडवणार्‍या समाजाचा. संघ माध्यमातून सुरू झालेल्या सगळ्या सेवाकार्‍यांच्या मुळाशी असलेले हे सरळ साधे तत्त्वज्ञान.

 
मात्र, काही मूठभर डॉक्टर, उच्च शिक्षणाच्या आधारे मिळू शकणार्‍या समृद्धीची मळलेली वाट चोखाळतात आणि त्यात काही गैर अजिबात नाही. पण आपण जाऊ थोडे आडवाटेने. येथील अडचणी करू सामना. असतील काटेकुटे, सारू बाजूला. म्हणतील लोक वेडा. करू दुर्लक्ष. सोसू थोडा त्रास थोडे दिवस. सांभाळणारे आश्वासक हात आहेत. देतील साथ करूच या हा प्रयोग. छ.संभाजीनगरच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाला नाही का यश मिळाले? इथेही मिळेल आणि यातून जो समाधानाचा ठेवा मिळेल, तो नक्कीच दुर्मीळ असेल आणि कदाचित अनमोल सुद्धा...!
 
नैतिक अधिष्ठान असलेली वैद्यकीय सेवा इथे मिळते, असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा तो सर्वाधिक आनंदाचा क्षण असतो. आरोग्य व्यवस्थेचे आजचे एकूण चित्र कोणत्याही सुजाण माणसाला अस्वस्थ करणारे आहे. हा ढासळलेला तोल सांभाळायचा, तर वैद्यकीय व्यवसाय आणि समाज अशा दोन्ही घटकांनी स्वतःकडे निखळ नजरेने बघायला हवेच. परखडपणे आत्मपरीक्षण करायला हवे. ते घडण्यासाठी तरी श्रीगुरूजीसारखे प्रयोग उभे राहायला हवेत. त्यातून आत्मपरीक्षणाची प्रक्रिया सुरू झाल्यास ते या प्रयोगांचे सर्वात मोठे यश ठरेल..! 
-डॉ. गिरीश चाकुरकर

 
(लेखक श्रीगुरुजी रुग्णलायाचे सहकार्यवाह आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.