वनवासी विकासाचा सेवा संकल्प

    17-Mar-2023
Total Views |
Service Resolution of Forestry Development

वनवासी दुर्गम भागात आरोग्य सुविधांची उणीव भरून काढण्यासाठी सेवा संकल्प समितीची स्थापना झाली. आरोग्य सेवेसोबत जलसंधारण, कृषी विकास, महिला सक्षमीकरण, शिक्षण क्षेत्रात संस्था कार्यरत असून या पाड्यांवर सेवाकार्य अविरतपणे सुरू आहे.

 
शिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित श्रीगुरूजी रुग्णालय नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात आरोग्य सेवा देत आहे. दरम्यान, डॉ. राजेंद्र खैरे यांनी वनवासी पाड्यांवर अभ्यास सुरू केला. येथे आरोग्यविषयक मुद्दे समोर आल्यानंतर १ ऑक्टोबर, २०१६ साली ‘सेवा संकल्प समिती’ची स्थापना झाली. सुरुवातीला नाशिक शहरापासून अतिदुर्गम भागातील पाड्यांची निवड करण्यात आली. येथे आठवड्यातून एकदा, ठरावीक वारी, ठरावीक वेळी रुग्णवाहिका जात असे. रुग्ण तपासणी आणि औषधे अगदी नाममात्र शुल्कात दिली जात. पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाऊ लागले.
 
साप्ताहिक दवाखाना या उपक्रमात ५० पाड्यांवर रुग्णवाहिका व डॉक्टर नियमित वेळेत प्रत्येक पाड्यावर जातात. प्रामुख्याने साप्ताहिक फिरता दवाखाना, आरोग्य शिबिरे, अनेमिया प्रकल्प, मोतीबिंदू व अनेक प्रकारच्या आरोग्य कार्यशाळा उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून आजपर्यंत ७९,०६९ रुग्णांना आरोग्य सेवा मिळाली आहे.

जल उपक्रम

त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यात पर्जन्यमान चांगले असले, तरी दिवाळीनंतर पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाड्यांवर पाच हजार आणि दहा हजार लीटर क्षमतेच्या पाणी टाक्या बसविण्यात आल्या. त्यामुळे वनवासी महिलांची दोन ते तीन किलोमीटर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली. यासह नवीन कूपनलिका उभारणी, विहीर निर्मिती, जुनी विहीर दुरूस्ती, गाळमुक्त बंधारे, वनराई बंधारे, दगडी बांधसारखे अनेक उपक्रम राबविले जातात.

सेंद्रिय शेतीला चालना

 
पाड्यांवरील जमिनी छोट्या छोट्या तुकड्यात विखुरलेल्या आहेत. भात, नागली, उडीद या पिकांची लागवड असते. स्वतःच्या आहारासह उत्पादित शेतीमालाची थोड्याफार प्रमाणात विक्री होते. त्यातून मिळणारे उत्पन्न हे पाच ते दहा हजारांच्या दरम्यान असते. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी शहरात स्थलांतर वाढत आहे. पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून संकरित बियाणे व निविष्ठांचा वापर होऊ लागल्यानंतर त्यांचे उत्पन्न वाढू लागले आहे. तसेच, गोमय गोवरी विक्री उपक्रमातून वनवासी पाड्यावरील महिलांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.-डॉ. राजेंद्र खैरे

(लेखक सेवा संकल्प समितीचे कार्यवाह आहेत.)


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.