प्रदर्शनातातून साकारला चित्र, शिल्प, प्रात्यक्षिकांचा त्रिवेणी संगम

17 Mar 2023 16:08:24
Painting, Sculpture

नाशिक : सर्जनशील शिल्पांची बोलकी अभिव्यक्ती, विविध शैली आणि माध्यमांतील सुरेख चित्राकृती आणि साथीला दिग्गज चित्र, शिल्पकारांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन असा त्रिवेणी संगम असलेल्या ‘के. के. वाघ संस्थे’च्या लालित कला महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनाचा समारोप गुरुवारी झाला.
 

Painting, Sculpture

गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात ’छंदोमयी’ कलादालनात के. के. वाघ ललित कला महाविद्यालयाच्या वार्षिक कलाकृतींच्या प्रदर्शनात नावीन्याचे रंग उमटले. ‘बीव्हीए’ चित्र आणि शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या कलाकृतींनी प्रदर्शनात वेगळेच रंग भरले. ‘छंदोयमी’ कला दालनाच्या प्रवेशद्वाराजवळच सोनू काश्मिरे या विद्यार्थ्यांचे शिल्प आणि चित्रकला या दोन्ही कला परस्परपूरक आहे, असे भाष्य करणारे सप्तरंगी पॅलटे, शिल्पकलेतील टूल्स यांची रचनाकृती उपस्थिताचे स्वागत करते. ‘बीव्हीए’ प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी निर्मिलेल्या कलाकृती भारतीय स्थापत्यकलाची मानके, इंडिया गेट, दिल्लीतील लाल किल्ला, व्यक्तीशिल्पे, उत्थित कलेची शिल्पे, ओतकामातील कलाकृती, पोट्रेटस् यामधून सुरेख अभिव्यक्ती साकारली आहे.

चित्रकलेतही विविध माध्यमातून साकारलेली अर्थपूर्ण रचनाचित्रे, व्यक्तीचित्रे अन् निसर्गचित्रांनी प्रदर्शनात रंग भरले आहे. दोन दिवस चालणार्‍या चित्रप्रदर्शनात मुंबई येथील शिल्पकार आतिष पानवलकर, अहमदनगर येथील प्रसिद्ध चित्रकर्मी अभिजित पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना शिल्प आणि चित्रकृतीचे ’प्रात्यक्षिक’ देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता बाळ नगरकर, समन्वयक डॉ. व्ही. एम सेवलीकर, प्राचार्य सचिन जाधव, प्रा. भूषण कोंबडे, प्रा. द्वीप आहेर यांच्यासह राजा पाटेकर एकूणच कलाकृती सादरीकरणासह विद्यार्थ्यांना दोन दिवस अनुभवी कलावंतांचे मार्गदर्शन मिळाले.


Painting, Sculpture

कला व्यासपीठ अन् व्यावसायिकतेचे धडे

‘बीव्हीए’च्या विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या कलाकृतींना कुसुमाग्रस स्मारकासारखे मोठे कलादालन उपलब्ध करून दिले. यातून त्यांच्या कलेला व्यापक व्यासपीठ मिळण्यासह व्यावसायिक कलाप्रदर्शन कसे भरवावे याचे प्रत्यक्ष धडेही देण्यात आले. दिग्गज चित्र, शिल्पकारांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन मिळाले.(बाळ नगरकर,अधिष्ठाता, के. के. वाघ ललित कला महाविद्यालय)
प्रात्यक्षिकाचा अनुभव मोठा
‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रजाच्या नगरीत ’लाईव्ह’ प्रात्यक्षिक देण्याचा अनुभव अत्यंत चांगला होता. नाशिकमधील हे पहिलेच प्रात्यक्षिक अविस्मरणीय होते. विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधून काही गोष्टीच्या टिप्स दिल्या त्यातून समाधान मिळाले.(अभिजित पाटोळे. चित्रकर्मी)
Powered By Sangraha 9.0