प्रवासी भारतीय मतदारांसाठी ई-पोस्टलचा प्रस्ताव चर्चेत : केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू

    17-Mar-2023
Total Views |
Kiren Rijiju
 
नवी दिल्ली :परदेशात वास्तव्यास असलेल्या प्रवासी भारतीय मतदारांसाठी ई – पोस्टल मतदानाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत दिली आहे.

प्रवासी भारतीयांना मतदान करता यावे, यासाठी केंद्र सरकार विविध मार्गांची चाचपणी करत आहे. त्याविषयी केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी राज्यसभेत त्याविषयी लेखी उत्तर दिले. ते म्हणाले, या वर्षी १ जानेवारी रोजी एकूण विदेशी मतदारांची संख्या १.१५ लाखांहून अधिक होती. निवडणूक आयोगाने परदेशातील मतदारांसाठी इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट प्रणाली सुलभ करण्यासाठी निवडणूक नियम, १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या प्रस्तावावर परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत अन्य एका प्रश्नास उत्तर देताना सांगितले की, उच्च न्यायालय कॉलेजियमने विविध उच्च न्यायालयांमधील ३३४ रिक्त पदांसाठी केलेल्या ११८ शिफारशी विविध टप्प्यांवर आहेत, तर सरकारला न्यायाधीशांच्या २१६ रिक्त पदांसाठी अद्याप शिफारसी प्राप्त झालेल्या नाहीत.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.