‘केडीएमटी’च्या नादुरूस्त बसेसमुळे खोळंबा

नादुरूस्त बसेस रस्त्यावर आणल्यास आंदोलनाचा इशारा

    17-Mar-2023
Total Views |
KDMT bus


कल्याण
: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमांतर्गत चालविल्या जाणार्‍या बसेस नादुरूस्त असल्याने प्रवाशांसह बस चालक आणि वाहक त्रस्त झाले आहेत. या नादुरूस्त बसेस रस्त्यावर आणू नका अन्यथा आंदोलन करु, असा इशारा परिवहनच्या वाहक व चालकांनी परिवहन प्रशासनाला दिला आहे. कडोंमपाच्या परिवहन उपक्रमातील बहुसंख्य बसेस खिळखिळ्या झाल्या असून त्यांची देखभाल-दुरूस्ती केली जात नाही. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. या प्रकरणी चालक व वाहकांनी परिवहन व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांची भेट घेऊन नादुरूस्त बस रस्त्यावर न आणण्याची मागणी केली.
 
त्यावर, सध्या परिवहन सेवेत ९० बसेस रस्त्यावर धावत आहेत. बस चालक आणि वाहकाची तक्रार आल्यावर तिचे निवारण करूनच ती बस धावते. ‘आरटीओ’ने दिलेल्या सूचनेनुसार ‘आरटीओ’कडून बसेसची तपासणी केली जाणार असल्याचे परिवहन व्यवस्थापकांनी सांगितले. यावेळी कडोंमपा परिवहन मजदूर युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रेयांच्यासह संघटक बाबाजी शिंदे, सरचिटणीस अरविंद तांबे, सचिव किरण सपकाळे, कार्याध्यक्ष विष्णू आव्हाड, संघटक संजय पांडे, शांताराम परदेशी, संदीप क्षोत्री उपस्थित होते. बसेस नादुरूस्त असल्यामुळे त्या रस्त्यावर बंद पडतात. परिवहन सेवेतील अनेक बसेसच्या खिडक्या आणि दरवाजे तुटलेले आहेत. दरवाजे दोरीने बांधलेले आहेत. बसमधील सीट नादुरूस्त आहेत.आतील दिवे बंद आहेत. यामुळे प्रवाशांसह बसचालक आणि वाहक त्रस्त झाले असून त्यांनी गुरुवारी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.