अपघातग्रस्तांचा जीवनदाता

    17-Mar-2023
Total Views |
Gurunath Sathelkar

 
गेल्या ३५ वर्षांपासून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुनाथ साठेलकर यांचे अविरतपणे कार्य सुरू आहे. त्यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...


महाविद्यालयीन जीवनात ‘एनएसएस’चा स्वयंसेवक आणि ‘एनसीसी’ कॅडेट म्हणून समाजकार्यात व्यापक सहभाग घेत गुरुनाथ साठेलकर यांना सामाजिक कामाची आवड निर्माण झाली. ‘युनायटेड फोर्ट ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या माध्यमातून पुढे या समाजकार्याची त्यांची गोडी आणखीनच वृद्धिंगत होत गेली. देशासाठी काहीतरी करावे, या इच्छेने सैन्यदलात प्रवेशासाठीही गुरुनाथ यांनी प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरले. पण, तरीही देशसेवेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मग काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेने ते अपघातग्रस्तांना मदतीचा हात देण्याच्या कामाशी कायमचे जोडले गेले, ते आजतागायतच!

नोकरीनिमित्त गुरुनाथ यांचे खोपोलीत येणे-जाणे सुरु झाले. परिणामी, मुंबई-पुणे जुन्या महामार्गाशी त्यांचा संबंध आला. तेथे अपघात आणि वाहतूककोंडीमुळे तासन्तास ते अडकून पडायचे. एके दिवशी मुंबई-पुणे प्रवासादरम्यान खंडाळा घाटाजवळ एक अपघात झाला. बघ्यांची अपघातस्थळी गर्दी जमली. गुरुनाथही त्या गर्दीत सामील झाले. पण, त्यावेळी त्यांच्यातला सामाजिक कार्यकर्ता जागा झाला अन् ते अपघातग्रस्तांच्या मदतीला पुढे सरसावले. त्यावेळी अपघातग्रस्तांना केलेली मदत गुरुनाथ यांना खूपच मानसिक समाधान देऊन गेली. मग, हळूहळू कोणताही अपघात झाला की, अपघातग्रस्तांना त्वरित मदत करण्याची जणू त्यांना सवयच लागली. त्यांच्या कामाची तत्परता आणि जोखीम पाहून पोलिसांनीही त्यांच्या कामाची स्तुती केली. पुढे या कामात धर्मेंद्र रावळ, विजय भोसले, दिलीप पोरवाल, डॉ. अशोक वाघ, संतोष मोरे असे सहकारीही जोडले गेले.

 
सहसा रस्त्यावर अपघात झाल्यास तेथे मदत करण्याऐवजी नुसती बघ्यांची गर्दी जमते, तर काही जण याकडे दुर्लक्ष करुन मार्गस्थ होतात. परिणामी, वेळेवर मदत न मिळाल्याने अनेक अपघातग्रस्तांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे गुरुनाथ व त्यांची टीम अशा अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाते. आपण जे काम करतो, त्याला एक ओळख निर्माण व्हावी आणि लोकांनाही सहज मदत मिळेल यासाठी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुनाथ यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना केली. रायगडसोबत मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमध्ये अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुनाथ व त्यांची टीम आजही अगदी तत्परतेने पोहोचते. मग ते अपघात असो, वन्यप्राण्यांचे बचावकार्य अथवा वाहतूककोंडी, महामार्ग पोलीस, वैद्यकीय अधिकारी यांचेही याकामी सहकार्य लाभत असल्याचे साठेलकर आवर्जून नमूद करतात.

 
अपघातांच्या घटना घडत होत्याच, पण पुढे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग खुला झाल्याने गुरुनाथ आणि त्यांच्या टीमच्या कामाचा ताण आणखीन वाढला. यापूर्वी या रस्त्यांच्या विकासकामांमध्ये गुरुनाथ यांचा सहभाग असल्याने त्यांना संपूर्ण महामार्गाची खडान्खडा माहिती होती. म्हणूनच ते अपघातस्थळी अगदी वेळेत पोहोचत. त्यांची ही कर्तव्यदक्षता लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी महामार्गाच्या सुरक्षेची जबाबदारी गुरुनाथ यांच्याकडे सोपविली. मग पुढे या कामासाठी स्वतंत्र टीमच गुरुनाथ यांनी उभी केली. कार्यकक्षा रुंदावल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या या अभियनात अनेकजण जोडले गेले.

रस्त्यावरील वाहनांचे अपघात, दरीत कोसळल्यामुळे झालेले भीषण अपघात, आग, वायुगळती, पुरात अडकलेले नागरिक, वन्यजीवांसह कोणत्याही बचावकार्यासाठी गुरुनाथ यांचे संपूर्ण पथकच कायम तैनात असते. ट्रेकिंग, वैद्यकीय क्षेत्र, सर्पमित्र, रुग्णवाहिका, रसायनतज्ज्ञ याकामी तत्पर असल्याचेही साठेलकर सांगतात. या सदस्यांच्या कुटुंबातील सदस्यदेखील त्यांच्या या अभियानाचे सक्रिय सदस्य आहेत.मुंबई-पुणे एक्सप्रेसवर असाच एक सर्वात मोठा मनुष्यहानीचा अपघात गुरुनाथ आणि त्यांच्या टीमने हाताळला होता. त्यांच्या या अभियानाविषयी गुरुनाथ सांगतात की, “आमचे अभियान व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून नियंत्रित केले जाते. त्यामध्ये समाजातील विविध स्तरांवरील सदस्य असल्याने ते अपघाताची माहिती कळवतात. परिणामी, जिथे आमचा सदस्य जवळ असेल, तिथे तो तत्काळ मदतीला धावून जातो. अपघाताच्या ठिकाणी पोहोचून या ठिकाणी मदत करताना तो ’अपडेट’देखील देत असल्याने आणखी मदत अथवा मनुष्यबळही प्रसंगी पाठवता येते. त्यामुळे मदतकार्यात बाधा येत नाही.”

कोरोना काळात गुरुनाथ यांच्या टीमने आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांच्यासोबत पडेल ते काम करून प्राणी आणि पक्ष्यांना तसेच भुकेलेल्यांना अन्न-पाणी देऊन सर्वोपरी मदत केली. यासोबतच रहदारीच्या मार्गावरील गस्त व अन्य जबाबदार्‍याही पार पाडत असल्याचे साठेलकर सांगतात. विशेष म्हणजे, ही संपूर्ण टीम कोणाताही स्वार्थ न बाळगता हे काम करते. आजवर आणि यापुढेही या कामासाठी कोणताही मोबदला न घेता आपले कार्य सुरू ठेवण्याचे गुरुनाथ यांचे उद्दिष्ट असून, त्यांच्या कामाची व्याप्ती आणखी वाढवणार असल्याने ते सांगतात. त्यांच्या या उपक्रमाला एक-दोन नव्हे, तर आजपर्यंत १०० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, राज्यस्तरावर या कार्याची दखल घेऊन, राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनाकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. गुरुनाथ आणि त्यांच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
-पंकज खोले
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.