मोठी बातमी! आशा सेविकांना मिळणार दिवाळीचा बोनस!

    17-Mar-2023
Total Views |
ASHA Workers will get Diwali bonus

मुंबई : राज्यातील आशा सेविकांना दर महिना ६ हजार ५०० मानधन देण्यात येते. यावर्षीच्या अर्थसंकल्पात यामध्ये १ हजार ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील आशा सेविकांना दिवाळीचा बोनस देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
 
सदस्य नाना पटोले, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, प्रा. वर्षा गायकवाड, राहुल कुल, बळवंत वानखेडे यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता. मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, आशा सेविकांना केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत ६०:४० या प्रमाणात मानधन देण्यात येते. याशिवाय ५६ वर्गवारीत कामावर आधारित मोबदला देण्यात येतो. तो साधारणपणे २०० ते ३००० रुपयांपर्यंतचा असतो. याशिवाय विमा कवच आणि इतर अनुषंगिक लाभ देण्यात येतात. सध्या गट प्रवर्तकाला १५०० रुपये आणि आशा सेविकांना १०० रुपये मोबाईल रिचार्जसाठी देण्यात येत आहेत. आशा सेविकांना १०० रुपये देण्यात येणाऱ्या मोबाईल रिचार्जच्या मोबदल्यात वाढ करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले