संप काळातही ४२ अत्यावश्यक शस्त्रक्रिया

    17-Mar-2023
Total Views |
42 urgent surgeries in Nashik district hospital even during the strike
 
  • जिल्हा रुग्णालयात ‘ओपीडी’ सुरु मात्र लागल्या लांब रांगा


  • संप लांबल्यास आरोग्य विभागातील गुंतागुंत वाढणार


  • अत्यावश्यक ४२ आणि पूर्वनियोजित ७ शस्त्रक्रिया विनासायास यशस्वी

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेची जबाबदारी सांभाळणार्‍या परिचारिका, आरोग्य सेवक, फार्मासिस्ट तसेच वर्ग तीन-चारचे कर्मचारी संपावर असल्याने जवळपास ७० टक्के कर्मचार्‍यांची संख्या कमी झाली आहे. आरोग्य सेवेवर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरीही जिल्हा रुग्णालयात गेल्या दोन दिवसांत ‘इमर्जन्सी प्रसूती’ आणि ‘सिझेरियन’च्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

माता आणि बालकांच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी अशा शस्त्रक्रियांसाठी डॉक्टर्स सर्व जबाबदार्‍या पार पाडत आहेत. जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने सध्या रुग्णालयांची आरोग्य व्यवस्था कंत्राटी कर्मचार्‍यांच्या भरवशावर आहे.परिचारिका आरोग्य सेवक आरोग्य, फार्मासिस्ट, वर्ग तीन-चार कर्मचारी या संपात सहभागी असले तरी डॉक्टर्स या संपात सहभागी नसल्याने रुग्णालयातील सामान्य तसेच ‘इर्मजन्सी ओपीडी’ सुरू असून तातडीच्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर्स अतिरिकत कामकाज करत आहेत.

‘इर्मजन्सी ओपीडी’ नियमित सुरू असून अत्यावश्यक तातडीच्या तसेच पूर्वनियोजित शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, अशा प्रकारच्या अत्यावश्यक ४२ आणि पूर्वनियोजित सात शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सुमारे १०० कंत्राटी कर्मचारी, नियमित डॉक्टर्स, ५२ पीजी डॉक्टर्स आणि इंटर्नस् डॉक्टरांनी आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळली आहे.दरम्यान, १२ मोतीबिंदू शस्त्रक्रिया सध्या स्थगित केल्या असून संबंधित रुग्णांना पुढील तारीख देण्यात आली आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.