स्त्रीजीवना खुलवी सत्य आभूषणे! उत्तरार्ध

    16-Mar-2023
Total Views |
woman power

मागील लेखात स्त्रीमहात्म्यावर प्रकाश टाकत तिच्या आभूषणांविषयी चर्चा केली होती. वेदमंत्रात उद्धृत केलेल्या सहा आभूषणांपैकी तीन आभूषणांवर प्रकाश टाकण्यात आला होता. आता प्रस्तुत लेखात उर्वरित तीन आभूषणे व तिला वेदमंत्रात देण्यात आलेल्या दोन आदेशांविषयीची चर्चा करूया.

 
इमा नारीरविधवा: सुपत्नी:
आञ्जनेन सर्पिषा सं विशन्तु।
अनश्रवोन् अमीवा: सुरत्ना,
आ रोहन्तु जनयो योनिमग्ने॥
(ऋग्वेद-१०.१८.७), अथर्ववेद-१२.२.३१,१८.३.५७)


अन्वयार्थ

(इमा: नारी:) या नारी, स्त्रिया (अविधवा:) विधवा नसाव्यात. तसेच त्या (सुपत्नी:) उत्तम, चांगल्या पत्नी, (अनश्रव:) अश्रूविहीन, (अनमिवा:) निरोगी, (सुरत्ना:) उत्तम रत्ने धारण करणार्‍या, (जनय:) सुसंततींना जन्माला घालणार्‍या असाव्यात.(आ अंजनेन ) डोळ्यात अंजन आणि (सर्पिषा) स्नेहशीलता धारण करीत (अग्रे) सर्वात अगोदर, पहिल्यांदा (सं विशन्तु) प्रवेश करोत. आणि (योनिम्) प्रत्येक मार्गावर (आ रोहन्तु) आरुढ,स्वार होवोत.

इमा: नारी: अमीवा:

अमीवा: म्हणजेच निरोगिता. स्त्री ही कुटुंबातील प्रमुख घटक. मुलाबाळांना जन्माला घालण्यापासून ते त्यांच्या संगोपनापर्यंतची मूलभूत जबाबदारी तिच्यावरच असणार. यासाठी स्त्री ही स्वतः स्वस्थ, तंदुरुस्त आणि आरोग्यसंपन्न असली पाहिजे. घरची आधारशीलाच जर काय रोगग्रस्त झाली, कुटुंबाची इमारत ढासळणार. वात्सल्यमूर्ती जर रुग्णशयेवर असेल, तर मग इतरांची काळजी कोण वाहणार? रोगाने पीडित झालेल्या स्त्रियांमुळे कुटुंबीयांची चिंता वाढू लागते. अशा महिला आपल्या कुटुंबीयांना निरोगी कशी काय ठेवणार? यासाठी शरीर, मन व आत्मिकदृष्ट्या ती सशक्त बलवान व धष्टपुष्ट असली पाहिजे. अशी बलशाली स्त्रीच सर्वांना निरोगी, सुखी व आनंदी ठेवण्यास समर्थ ठरते. यासाठी स्त्रियांनी अन्नपदार्थांचे गुणधर्म, वात-पित्त व कफ या त्रिदोषांप्रमाणे यथायोग्य आहार, उत्तम दिनचर्या व विविध आजारांविषयीचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. कोणत्या रोगांवर कोणते घरगुती औषध कामी येते? याची तिला माहिती हवीच. स्वतः निरामय बनवून इतरांना निरोगी कसे ठेवता येईल? याबाबत स्त्री ही दक्ष असावयास हवी. एकेकाळी ’आजीबाईचा बटवा’ यासाठीच तर प्रसिद्ध होता. आधुनिक पाश्चात्य चिकित्सा पद्धतीच्या वाढत्या घाईगर्दीत तो बटवा आज हरवला आहे. म्हणून घराच्या लक्ष्मीचे ‘अमीवा’ म्हणजेच निरोगी जीवन हे तिचे तितकेच मौल्यवान आभूषण. याचे जतन करणे हे सर्व माता-भगिनींचे आद्यकर्तव्य.

इमा नारी: सुरत्ना:


रत्ने ही दोन प्रकारची असतात. पहिली म्हणजे धातूंपासून बनवलेली भौतिक रत्ने, तर दुसरी म्हणजे सद्गुणरुपी रत्ने. जे जे उत्तम, सुयोग्य व चांगले गुण असतात, ते ते सर्व सुरत्नच आहेत. स्त्रियांना या उत्तमोत्तम गुणांनी परिपूर्ण व्हावयास हवे. ममता, वात्सल्य, सुसंस्कार, सच्चारित्र्य, माधुर्य, सद्व्यवहार, सद्विद्या, उत्तम शिक्षण, सुसेवा, दातृत्व, आदरातिथ्य, पातिव्रत्य धर्म, पाककौशल्य हे सर्व आदर्श गुण म्हणजेच स्त्रियांची खरी रत्ने. ही रत्ने धारण करून खर्‍या अर्थाने स्त्री शोभून दिसते. अन्य बाह्यरत्नांपेक्षा या आंतरिक रत्नांमुळे स्त्री ही आंतरबाह्य शोभिवंत ठरते. ती सुंदररूपात अलंकृत होते. स्वतः सोबतच तिचे घरसुद्धा उत्तम संस्कारांनी चमकून दिसते.

इमा: नारी: जनय:


स्त्रियांचे शेवटचे सहावे आभूषण म्हणजे आईपण. मंत्रात तिला ‘जनय:’ या दागिन्याने मढविले आहे. जनय: म्हणजेच जननी, आई किंवा निर्मात्री. खर्‍या अर्थाने ती राष्ट्राची जननी आहे. कारण, आदर्श व कुलीन सुपुत्रांमुळेच समाज व राष्ट्राची सर्वदृष्ट्या प्रगती साधण्यास मदत होते. म्हणूनच म्हटले आहे- माता निर्माता भवति। आपल्या इच्छेप्रमाणे आई ही मुलांना चांगले किंवा वाईट यांपैकी काहीही घडवू शकते. मुलांच्या नवनिर्मितीची चावी आईच्याच हाती आहे. एका हिंदी कवीने म्हटले आहे-

माता के बनाये पुत्र कायर कपूत होत।
माता के बनाये पुत्र वीर बन जाते हैं।


जगन्नियंत्या परमेश्वराकडून स्त्रीला मिळालेले वरदान म्हणजे मातृत्व. परमेश्वर ज्याप्रमाणे समग्र ब्रह्मांडाची निर्मिती करतो, त्याचप्रमाणे स्त्रीदेखील या धरतीवरील मानवरुपी पिंडांची निर्मिती करणारी शिल्पकार आहे. ती पुत्र-कन्यांना जन्माला घालून एक प्रकारे भगवंताच्या सृजनकार्याला हातभार लावते. आपल्या संततीच्या माध्यमाने जननी ही अमर ठरते. पण, ती संतती ही सुसंस्कारित असली पाहिजे. उत्तम सुसंततीमुळे आईचे महात्म्य वाढीस लागते, तर कुसंततीची सर्वत्र निंदानालस्ती होते. यासाठीच आद्य शंकराचार्य म्हणतात-

कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति। म्हणजेच वाईट मुलगा निपजू शकेल, पण वाईट माता (कुमाता) कुठेही नाही. कारण, आई ही आईच असते, मग ती कोणती का असेना? म्हणूनच मातृत्व हा स्त्रियांचा सर्वात मोठा अलंकार मानला जातो. या अलंकाराचे महत्त्व ओळखून तिने स्वतःला मातृत्वपदी नेहमीच विराजमान ठेवले पाहिजे. म्हणूनच स्वतःचे मोठेपण ओळखून तिला फार मोठा पुरुषार्थ करणे, तर प्रसंगी कष्ट सहन करणे इष्ट.मंत्रात वर्णिलेली ही सहा आभूषणे धारण केल्यानेच स्त्रिया खर्‍या अर्थाने सर्वत्र सुशोभित होतात. स्त्रीशक्तीचे महात्म्य आणि तिचा उत्कर्ष नेहमी वाढीला लागतो आणि इतिहासदेखील घडतो, तो याच आभूषणांमुळे! यासोबतच मंत्रात स्त्रियांना दोन आदेश दिले आहेत. त्यातील पहिला म्हणजे- आ+अञ्जनेन सर्पिषा अग्रे सं विशन्तु!

धार्मिक पर्व अथवा उत्सव असो की, सामाजिक समारंभ पुरुषांपेक्षा स्त्रियांना सर्वात अगोदरचे स्थान. तिचा प्रवेश अगदी सुरुवातीलाच मानला जातो. स्त्रियांना पुढे करून पुरुष हा तिच्यानंतरच मागोमाग चालतो. अग्रभागी असलेली स्त्री ही कशी असावी? तर शोभिवंत. ‘अंजनेन’ व ’सर्पिषा’ या दोन गोष्टींसह तिला पुढे जायचे आहे. अंजन हे प्रतीक आहे सौंदर्याचे! नेत्रात अंजन धारण केलेली स्त्री ही प्रकर्षणाने सुंदर दिसते. अंजन हे स्त्रियांचे सौंदर्य खुलविण्याचे प्रातिनिधिक प्रसाधन! यासोबतच इतर प्रसाधनांचादेखील समावेश होतो. सार्वजनिक सभा-समारंभात प्रवेश करताना स्त्रियांची वेशभूषा ही अतिशय सुंदर असावी. स्त्रियांनी डोळ्यात अंजन, काजळ किंवा इतर सौंदर्य प्रसाधने धारण करावीत. त्याचबरोबर कपाळावर कुंकू, हातावर मेहंदी किंवा इतर विलेपनांद्वारे आपले शरीर सुंदर बनवावे. त्याचबरोबर ‘सर्पिष’ म्हणजेच स्निग्ध पदार्थांनी शरीराला मुलायम बनवणे. तेल, तूप किंवा अन्य पदार्थांच्या सेवनाने किंवा मर्दनाने शरीर अंतर्बाह्य सुंदर व आकर्षक बनले जाते. यासाठीच हा प्रयोग करावा.

तसेच स्त्रियांसाठी आणखी एक आदेश आहे. तो म्हणजे- ‘योनिम् आरोहन्तु!’ ‘योनी’ शब्दाचे अनेक अर्थ होतात. जसे की, जागा, स्थान, केंद्र, स्वारी, मोहीम इत्यादी. महिलांनी सर्व स्थानांवर पोहोचावे. सर्व क्षेत्रांत स्त्रीने आरोहन्तु म्हणजे आरुढ किंवा स्वार व्हावे. यावरून स्पष्ट होते की, अगदी अनादी काळापासून स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात प्रविष्ट होण्याचा अधिकार आहे. प्रत्यक्ष वेदांनीच स्त्रियांना सर्व प्रकारच्या मोहिमांवर जाण्याचा आदेश दिला आहे. आधुनिक युगात स्त्री विविध क्षेत्रात पुढे सरसावत आहे. शिक्षण, राजकारण, संरक्षण, उद्योग, व्यापार तसेच वैज्ञानिक संशोधनाच्या दिशेनेदेखील तिची यशस्वी घोडदौड सुरू आहे. यात विशेष आश्चर्य करण्याचे काहीच कारण नाही. कारण, स्त्रियांचे सर्वक्षेत्रात आरुढ होणे किंवा प्रविष्ट होणे, हे वेदांनी यापूर्वीच प्रमाणभूत करून ठेवले आहे.

अशा या महान स्त्रीशक्तीची थोरवी वेदांनी किती उच्च पातळीवरून गायिली आहे, याचा प्रत्यय वरील मंत्रातून येतो. पण, दुर्दैवाने स्त्रीमहात्म्याचे गोडवे गाणार्‍या आधुनिक पुरोगामी विचारवंतांना किंवा स्त्रियांना विविध क्षेत्रात तिचा अधिकार नाकारणार्‍या प्रतिगामी शक्तींना मात्र वेदांच्या या यथार्थज्ञानाचा पूर्णपणे विसर पडला आहे.


-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.