ठाकरेंचे आमदार राजन साळवींची एसीबी चौकशी का होतेयं? 'हे' आहे कारण!

16 Mar 2023 11:09:45

Rajan Salavi


 (Image Credit - Rajan Salavi - Facebook Page) 


रत्नागिरी :
उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन  (Rajan Salavi) साळवी तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. त्यांच्या पत्नीसह कुटूंबियांना एसीबीची नोटीस बजावण्यात आली आहे. साळवींची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला ही नोटीस बजावली आहे. २० मार्चला या सर्वांना चौकशीसाठी हजर रहाण्याचे निर्देश नोटीशीद्वारे देण्यात आले आहेत. साळवींची यापूर्वी तीनदा तर स्वीय सहायकांचीही चौकशी झाली होती. नोटीस आल्याची माहिती स्वतः साळवींनी अधिवेशनात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

ते म्हणाले, "माजी पत्नी अनुजा साळवी (Anuja Salavi), मोठे बंधु दीपक साळवी (Dipak Salavi) आणि वहिनी अनुराधा साळवी (Anuradha Salavi) यांना ही नोटीस आली आहे. २० मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता अलिबागच्या एसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. कुटूंबियांना नोटीस पाठविणे ही दुर्दैवी बाब आहे. मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आमदार झालो. राजन साळवी काय आहे ते माझ्या मतदारांना माहिती आहे. कुठल्याही चौकशीला मी भीत नाही. पहिल्या दिवशीच जाहीर केले होते. चौकशीला हजर रहाणार आहे आणि त्यानुसार रहातोय. पुढेही चौकशीला उपस्थित रहाणार आहे."

राजन साळवींच्या अडचणी वाढणार

ठाकरे गटातील कुडाळ मतदार संघातील आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. राजापूरचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थक आमदार राजन साळवी (Rajan Salavi) यांच्या एसीबी चौकशीमुळे ठाकरे गटाचे टेन्शन आणखी वाढणार आहे. लाचलुचपत विभागाने साळवींच्या कुटुंबीयांना नोटीस धाडत चौकशीत सहकार्य करण्यास सांगितले आहे.
 
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आले होते.साळवींच्या मालमत्तेबाबत सध्या एसीबी (ACB )चौकशी करत आहे. यासाठी साळवींनी आतापर्यंत तीनवेळा चौकशीला हजेरी लावली होती. राजन साळवी यांचा बंगला आणि रत्नागिरीतील हॉटेल यांचे मुल्यांकन करण्यात आले अूसन घर आणि हॉटेले क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंग यांचेही मुल्यांकन करण्यात आले आहे. या अंतर्गत अधिक माहितीसाठी आता साळवी कुटूंबियांची चौकशी केली जाणार आहे.


Powered By Sangraha 9.0