बीएमसीची उद्याने अधिक वेळ राहणार खुली!

    16-Mar-2023
Total Views |
bmc-parks-will-remain-open-for-more-hours


मुंबई
: मुंबई महानगरपालिकेची सर्व उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने ही नागरिकांसाठी खुली ठेवण्याची वेळ वाढवण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. आता दर सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत (एकूण १५ तास) नागरिकांना उद्याने व मैदाने खुली राहतील. तर आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवार व रविवारी त्याचप्रमाणे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत (एकूण सलग १७ तास) उद्याने व मैदानांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.

खेळाची मैदाने आणि मनोरंजन मैदाने यांचा सुयोग्य वापर व्हावा तसेच सदर उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने यांचा अधिकाधिक नागरिकांना व जास्तीत-जास्त वापर करता यावा, यासाठी उद्याने व मैदानांच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेची उद्याने व मैदाने ही सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत वापरासाठी खुली असतात. तथापि, उद्याने व मैदानांमध्ये येणाऱया अबालवृद्धांची संख्या लक्षात घेता, विशेषतः कोविड संसर्ग कालावधीनंतर सुदृढ आरोग्यासाठी जागरुक नागरिकांची वाढलेली संख्या लक्षात घेता दिवसातील जास्तीत-जास्त वेळ उद्याने व मैदाने नागरिकांना वापरासाठी खुली असावीत, असा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाने व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार उद्यान विभागाने घेतला आहे, अशी माहिती उपआयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.
 
उद्याने - २२९

मनोरंजन मैदाने - ४३२

खेळाची मैदाने - ३१८

पार्क - २६

१) उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने ही सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत खुली

 
२) शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत खुली


३) विशिष्ट उद्यान/ मैदान/ मनोरंजन मैदान खुली ठेवण्याच्या वेळेत काही बदल करावयाचा असल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त न्याय्य कारणास्तव संबंधित अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीने बदल करु शकतील.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.