महिला उद्योजकता : ‘जी २०’ मधील भारताचा एक मुख्य आधारस्तंभ

    16-Mar-2023
Total Views |
Women Entrepreneurship One of India's Pillars in G20
 

महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली, महिलांचा विकास आणि आर्थिक क्षेत्रातील प्रतिनिधित्वासाठीच्या ‘जी २०’ समूहाच्या ‘जी २० एम्पॉवर’च्या माध्यमातून ‘महिलांचा विकास ते महिलांच्या नेतृत्वाअंतर्गत विकास’ असा संकल्पनात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्नही सुरू केला गेला आहे. स्वाभाविकपणे एका नव्या बदलाच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहेत, त्या महिला उद्योजकच आणि त्यांच्याच नेतृत्वात ‘जी २० एम्पॉवर’ची वाटचाल सुरू राहणार आहे.

महिलांच्या उद्योजकतेला चालना देणे, हे भारताच्या विकासाच्या आणि देशात समानता स्थापन करण्याच्या प्रक्रियेतील सर्वांत प्राधान्यक्रमाचे तत्व. महत्त्वाचे म्हणजे महिला उद्योजकता हे भारताच्या पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या वाटचालीला गती देऊ शकणारे अत्यंत सामर्थ्यशील माध्यम असणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी की, कौटुंबिक उत्पन्नातील वाढ, दारिद्य्र निर्मूलन आणि २०३० साठी संयुक्त राष्ट्रांनी समोर ठेवलेली शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यात, विशेषतः या ध्येयांमधील लिंगभाव समानतेशी संबंधित पाचवे उद्दिष्ट अर्थात ‘एसडीजी-५’ गाठण्यामध्ये महिला उद्योजकता मोठा साहाय्यक घटक ठरणार आहे.

भारतात स्त्रीशक्तीला मोठी चालना दिली जात असल्याची उदाहरणे आपण विविध सरकारी उपक्रमांमध्ये निश्चितच पाहू शकतो. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत ग्रामीण महिला उद्योजकतेला पाठिंबा दिला जात आहे. या योजनेअंतर्गत ७.५ दशलक्ष स्वयं साहाय्यता गटांच्या माध्यमातून ८० दशलक्षाहून अधिक स्त्रियांना योजनेचा लाभ मिळतो आहे. ‘मुद्रा योजने’मुळे महिला उद्योजकांसाठी अगदी सुलभ अर्थसाहाय्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे, तर ‘जेम पोर्टल’वर होणार्‍या शासकीय खरेदीमध्येही तीन टक्के खरेदी ही केवळ महिला उद्योजकांकडूनच केली जाईल, याची सुनिश्चिती केली गेली आहे.नीती आयोगाने केलेल्या एका संशोधनानुसार, महिला उद्योजकतेला शाश्वत आणि स्वायत्त बनवायचे असेल, तर त्यासाठी त्यांना औपचारिक उद्योगक्षेत्रात आणले गेले पाहिजे आणि याकरिता आवश्यक ते पाठबळही दिले पाहिजे. खरे तर महिलांद्वारे चालवल्या जाणार्‍या उद्योगांच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते, याची नोंद वेळोवेळी घेतली गेली आहे आणि दुसरी बाब म्हणजे, या उद्योगांच्या माध्यमातून समांतरपणे समाज आणि अर्थव्यवस्थेलाही अतिरिक्त लाभ होत असतात.

आपल्या ‘जी २०’ अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताने आठ प्राधान्यक्रमावरची क्षेत्रे निश्चित केली आहेत. यात महिलांच्या नेतृत्वाअंतर्गत विकास आणि सार्वजनिक ‘डिजिटल’ पायाभूत सुविधा या क्षेत्रांचाही समावेश आहे. यासोबतच महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली, महिलांचा विकास आणि आर्थिक क्षेत्रातील प्रतिनिधित्वासाठीच्या ‘जी २०’ समूहाच्या ‘जी २० एम्पॉवर’ म्हणजेच ‘अलायन्स फॉर द एम्पॉवरमेंट अ‍ॅण्ड प्रोग्रेशन ऑफ वुमन्स इकॉनॉमिक रिप्रेझेंटेशन’ (जी-२० एम्पॉवर) या आघाडीच्या माध्यमातून, ‘अलायन्स फॉर द एम्पॉवरमेंट अ‍ॅण्ड प्रोग्रेशन ऑफ वुमन्स इकॉनॉमिक रिप्रेझेंटेशन’ (जी २० एम्पॉवर) ’महिलांचा विकास ते महिलांच्या नेतृत्वाअंतर्गत विकास’ असा संकल्पनात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्नही सुरू केला गेला आहे. स्वाभाविकपणे एका नव्या बदलाच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहेत, त्या महिला उद्योजकच आणि त्यांच्याच नेतृत्वात ‘जी २० एम्पॉवर’ची वाटचाल सुरू राहणार आहे.

खरंतर आपण नेहमीच आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर केले पाहिजे. त्यासोबतच आपल्या कार्यरत मनुष्यबळात महिलांना अधिकाधिक प्रमाणात सामावून घेण्याच्या तसेच उद्योगक्षेत्रात महिला नेतृत्वाचे प्रमाण वाढवण्याच्या प्रयत्नांना गती दिली पाहिजे. शाश्वत विकासाच्या ध्येय-उद्दिष्टांमध्ये म्हटल्याप्रमाणे, लिंगभाव समानतेचा दृष्टिकोन बाळगून महिलांना अधिक संधी प्रदान करणारी उद्योग संस्कृती तयार करण्यासाठी आपल्याला देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर एकत्रितपणे आणि सहकार्याच्या वृत्तीने कृती करण्याची गरज आहे.आर्थिक निर्णयात आणि व्यवहारात महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढवण्याच्यादृष्टीने ‘डिजिटलायझेशन’ हे एक सामर्थशाली साधन असणार आहे. यासोबतच उद्योगजगतातील अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रे आहेत, ज्यात त्या क्षेत्राअंतर्गतचे काम किंवा उत्पादन हे दूरच्या ठिकाणावरूनही घेतले जाऊ शकते, अशा क्षेत्रांच्या माध्यमातून महिलांना कार्यकारी मनुष्यबळात सहभागी करून घेत, रोजगार मिळवून देण्याच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात.

‘जी २० एम्पॉवर’ या व्यासपीठाअंतर्गत प्राधान्यक्रमावरची तीन क्षेत्र ठरवली गेली आहेत आणि विशिष्ट दृष्टिकोनातून काम करत, आता आपण ज्या ध्येय-उद्दिष्टांची चर्चा केली, ती साध्य केली जाऊ शकतात, तर पहिला प्राधान्यक्रम म्हणजे महिला उद्योजकतेवर लक्ष केंद्रित करणे: महिलांच्या नेतृत्वातील आणि त्यांच्या मालकीअंतर्गच्या उद्योगजगताचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी, आपल्याला कौशल्य विकासाच्या प्रक्रियेत अधिकाधिक महिलांना सामावून घ्यावे लागेल. त्यासोबतच त्यांची क्षमता वृद्धी होईल, आवश्यक पायाभूत सुविधांचे पाठबळ आणि अर्थसाहाय्य मिळेल, याची सुनिश्चिती करावी लागेल. दुसरा प्राधान्यक्रम म्हणजे, महिलांचे सार्वजनिक प्रतिनिधित्व वाढेल, त्यांना सार्वजनिक सोईसुविधा सुलभपणे उपलब्ध होतील आणि सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील कार्यरत मनुष्यबळात त्यांचा सहभाग वाढेल, ही उद्दिष्ट समोर ठेवून आपण महिला नेतृत्वाला चालना मिळेल, या दृष्टिकोनातून परस्पर भागीदार्‍याही निर्माण केल्या पाहिजेत. तिसरा प्राधान्यक्रम म्हणजे निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी, महिला शिक्षणासाठी प्रयत्न करणे.

महिला उद्योजकता व्यासपीठ - ‘वूमन आंत्रप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्म’ (डब्ल्यूईपी AWEP) ज्ञानाची दरी दूर करण्यासाठीचे महत्त्वाचे माध्यम आहे. भारतीय महिला आणि मुली वेगाने प्रगतीचे पाऊल टाकत आहेत, त्या शिक्षण व्यवस्थेतून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणापर्यंतचे संक्रमणही यशस्वीरित्या पार पाडत आहेत, अशावेळी भारत सरकारही, आपल्या कार्यरत मनुष्यबळात समाविष्ट होऊ पाहात असलेल्या अतिरिक्त ५५ दशलक्ष महिलांसाठी महिला उद्योजकतेचा मार्ग प्रशस्त करत आहे.२०१७ सालच्या जागतिक उद्योजगता ‘शिखर परिषदेत’ ((Global Entrepreneurship Summit २०१७) जाहीर केल्याप्रमाणे नीती आयोगाने महिला उद्योजकता व्यासपीठाची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात साकारली. आज हे व्यासपीठ म्हणजे महिला उद्योजकांना बहुक्षेत्रीय पाठबळ मिळवून देणारे मजबूत सार्वजनिक-खासगी भागीदारीचं ज्वलंत उदाहरण ठरलं आहे. हे व्यासपीठ जनजागृती, प्रशिक्षण, कौशल्य विकास, वित्तपुरवठा आणि विपणन गरजांची पूर्तता करत, महिला उद्योजकांसाठी सहकार्याची नवी मार्गिका तयार करत आहे.

हे व्यासपीठ नेतृत्व आणि मानसिक आरोग्याला केंद्रस्थानी ठेवून, महिला उद्योजकतेच्या गरजा उत्तमरित्या समजून घेण्यात साहाय्यकारी करू शकेल, असा माहितीसाठा तयार करून देणारं एक वैचारिक व्यासपीठ म्हणूनही उपयुक्त ठरलं आहे. यासोबतच या व्यासपीठासाठीच्या नियोजनानुसार तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे. जेणेकरून समोर असलेले अडथळे दूर करत महिला उद्योजकतेच्या वाढीला अनुकूल क्षमताविकास साधता यावा आणि त्यासोबतच त्यांच्या उद्योगवाढीची प्रक्रिया अधिक परिणामकारक व्हावी यासाठी, ग्राहकांच्या सेवा देण्याच्या पारंपरिक पद्धतींचे दडपण न घेता नव्या पद्धतींचा अवलंब करण्यात सहकार्य मिळावे.भारताच्या ‘जी २०’ समूहाच्या अध्यक्षपदाच्या या वर्षात जगाला संस्था, देश, उपक्रम आणि नागरिकांमधील सर्वोत्तम परस्पर सहकार्य अनुभवायला मिळेल. महत्त्वाचे म्हणजे, या सगळ्यात समृद्ध समाज आणि अर्थव्यवस्थेच्या पाया असलेल्या भारताच्या नारीशक्तीचेही दर्शन घडवले जाईल.
डॉ. संगीता रेड्डी
अ‍ॅना रॉय


लेखिकांविषयी
(संगीता रेड्डी या ‘अपोलो’ रुग्णालयाच्या सह व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्या ‘फिक्की’च्या (FICCI) माजी अध्यक्ष राहिल्या आहेत. ‘एम्पॉवर २०’ (EMPOWER२०) चे अध्यक्षपद आणि महिला उद्योजकता व्यासपीठाच्या ‘सुकाणू समिती’च्या सहअध्यक्षपदाची जबाबदारीही त्या सांभाळत आहेत.अ‍ॅना रॉय या नीती आयोगाच्या वरिष्ठ सल्लागार आणि महिला उद्योजकता व्यासपीठ अभियानाच्या संचालक आहेत.)

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.