‘संस्कृतीच्या संवर्धनानेच भारत विश्वगुरू होणार’

16 Mar 2023 15:09:24
Mangalprabhat Lodha


मुंबई
: “जगातील अनेक देश अशांतता, हिंसा, युद्धाच्या भोवर्‍यात सापडले आहेत, अशा स्थितीत विश्वातील मानवतेला शांतीचा संदेश देण्याची क्षमता केवळ भारतीय संस्कृतीतच आहे. त्यातूनच भारत विश्वगुरू होणार,” असे प्रतिपादन बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
 
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने विलेपार्ले येथील केशवराव घैसास सभागृहात ‘नैतिक शिक्षण योजने’च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मंत्री लोढा पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात संबोधित करताना विकसित भारत, गुलामीची चिन्हे समाप्त करणे, आपला राष्ट्रीय वारसा जपणे, राष्ट्रीय एकता आणि नागरिकांच्या कर्तव्याबद्दल जाणीव जागृती असे पाच संकल्प जाहीर केले होते. रामायण, महाभारत आपला सांस्कृतिक वारसा आहे तो आपण जपला पाहिजे. यातील चिरंतन जीवनमूल्ये एका पिढीतून दुसर्‍या पिढीत संक्रमित करण्याचे महान कार्य ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’ शेकडो शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये करीत आहे, त्या प्रयत्नांना शासन सर्व प्रकारे सहकार्य करेल, अशी ग्वाहीदेखील लोढा यांनी या वेळी दिली.

दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, संस्कार आणि क्रांतिवीरांचा परिचय व्हावा या हेतूने प्रतिष्ठानची नैतिक शिक्षण योजना महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि राजस्थानमधील ९१७ शाळांमध्ये सुरू आहे. त्या उपक्रमात सहभागी होऊन विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी रा. स्व. संघाचे विमल केडिया, विश्व हिंदू परिषदेचे रामचंद्र रामूका, प्रतिष्ठानच्या संयोजिका अस्मिता आपटे आदींची उपस्थिती लाभली.प्रकाश वाड यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, केले तर वर्षा सोमण यांनी आभार मानले.



Powered By Sangraha 9.0