समाजहितैषी लोकांना सोबत घेऊन समरसतेकडे वाटचाल

16 Mar 2023 15:03:58
Rashtriya Swayamsevak Sangh


मुंबई
: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा हरियाणातील पानिपतमधील समालखा येथे नुकतीच संपन्न झाली. या पार्श्वभूमीवर आणि रा. स्व. संघाची कोकण प्रांतातील सद्य:स्थितीची माहिती देण्याकरिता बुधवार, दि. १५ मार्च रोजी मुंबईत पत्रकार परिषद आयोेजित करण्यात आली होती. “रा. स्व. संघाच्या दृष्टीने मागील वर्ष कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष होते. येणार्‍या वर्षात कोकण प्रांतात अधिक जोमाने कामाचे नियोजन करण्यात येणार आहे,” अशी माहिती रा. स्व. संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठलराव कांबळे यांनी दिली. समाजहितैषी लोकांना सोबत घेऊन समरसतेसाठी निरंतर प्रयत्न करणे, हे या कार्य योजनेचे उद्दिष्ट असून अस्पृश्यता समाजासाठी कलंक असून तो मिटविण्यासाठी संघ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ आणि प्रांत प्रचार प्रमुख अजय मुडपे उपस्थित होते.

रा. स्व. संघाचे येत्या काळात सामाजिक परिवर्तनाच्या पाच आयामांमधील आपल्या कार्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन असल्याचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ’सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी जीवनपद्धती आणि नागरिक कर्तव्य’ हे ते पाच आयाम आहेत. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रतिनिधी सभेमध्ये देशभरातून ३४ संघटनांचे १ हजार, ४७४ प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी संघाच्या कार्यस्थितीवर विस्तृत चर्चा करण्यात आली. सद्य:स्थितीत देशभरात ४२ हजार, ६१३ स्थानी ६८ हजार, ६५१ संघ शाखा सुरू आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत संघ शाखांमध्ये सुमारे आठ हजारांनी वाढ झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत देशभरात एकूण ३ हजार, ६८५ एवढे संघ शिक्षा वर्ग पार पडले.

विठ्ठलराव कांबळे यांनी यावेळी सांगितले की, ‘’कोकण प्रांतात प्रथम वर्ष वर्ग- द्वितीय वर्ष वर्ग, तसेच विशेष द्वितीय वर्ग आणि देशभरातील स्वयंसेवकांचा एकत्रित तृतीय वर्ष झाले. कोकण प्रांतात २०२२ साली २४५ स्थानांवर ५७२ शाखा, ३८६ साप्ताहिक मिलन आणि १,०३३ सेवाकार्य सुरु होते. सध्या २०२३ या वर्षात २८८ स्थानांवर ७८२ शाखा सुरु आहेत. साप्ताहिक मिलन ५७१ आणि ५ संघ मंडळी तसेच १०८९ सेवाकार्य सुरु आहेत.
 
१) शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यंदा हिंदवी स्वराज्य स्थापनेचे ३५०वे वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त रा.स्व.संघाच्यावतीने महाराष्ट्रासह देशभरात यानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

२) भगवान महावीरांच्या शिकवणुकीचे आचरण आवश्यक

उपभोगवादी जीवनशैलीत पर्यावरणाचा र्‍हास वाचविण्यासाठी अधिक अपरिग्रह संकल्पना आचरणात आणली पाहिजे. अहिंसेचे पालन करायला हवे. म्हणून रा.स्व.संघाचा असा विश्वास आहे की, या प्रवासात समकालीन युगाला या मार्गावर पुढे जाण्यासाठी वर्धमान महावीर यांच्या शिकवणुकीची गरज आहे. हे वर्ष भगवान महावीर यांच्या २ हजार, ५५०व्या (२५५०) वे निर्वाण वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर देशभर त्यांच्या विचार प्रसाराच्या कार्यक्रमात स्वयंसेवक योगदान देणार आहेत.

३)महर्षि दयानंद सरस्वती यांची २००वे जयंती वर्ष

आर्य समाजाचे संस्थापक महर्षि दयानंद सरस्वती यांचे २००वी जयंती (फेब्रुवारी २०२४ पासून) वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. ’वेदांकडे परत चला’ ही त्यांची प्रमुख घोषणा होती. स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणा, जाती निर्मूलन, स्त्रीशिक्षण व पुनरुत्थान क्षेत्रात त्यांनी मौलिक व पथदर्शी कार्य केले. त्यानिमित्तानेदेखील त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. वरील अभिवादनाचे कार्यक्रम सर्व समाजानेही आयोजित करावेत आणि स्वयंसेवकांनी सर्व शक्तिनिशी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

रा. स्व. संघाची अखिल भारतीय प्रतिनिधींची बैठक वर्षातून एकदा होत असते. देशभरात संघाच्या विस्ताराच्या दृष्टीने स्वयंसेवकांनी काय करायला हवे, सर्व समाजाला एकत्र घेऊन पुढे कसे चालता येईल, याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच २०२५ मध्ये संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून त्यासंदर्भातील काही बाबींवर प्रामुख्याने चर्चा झाली. सामाजिक परिवर्तनाच्या पाच आयामांवर संघ काम करणार असून समाजातील युवाशक्तीला आवाहन करण्यात आले आहे. त्यांना कसे जोडले जाईल, यावर बैठकीत विचार केला गेला. (डॉ. सतीश मोढ, कोकण प्रांत संघचालक)
Powered By Sangraha 9.0