योगेश्वरांचा विश्राम, राम

    16-Mar-2023   
Total Views |
Namasmaran

नामस्मरणाचा मनापासून अभ्यास करणार्‍याचे मन अंत:काळी इच्छा, आकांक्षा, विकार, वासना यांनी अस्वस्थ होत नाही. नामस्मरणात रममाण होणार्‍या जीवाला राम अंत:काळी सर्व व्यापातून, विकार, विचारांतून मोकळे करतो. (जीवा सोडवी राम हा अंत:काळी) हा विचार स्वामींनी मागील श्लोक क्रमांक ८४ मध्ये अखेरच्या ओळीत सांगितला आहे. त्यावर मागील लेखात चर्चा झाली. आता पुढील श्लोकाच्या शेवटच्या ओळीत समर्थांनी पुन्हा तो विचार मांडला आहे, असे दिसून येते. 


भजा राम विश्राम योगेश्वरांचा।
जपू नेमिला नेम गौरीहराचा।
स्वयें नीववी तापसी चंद्रमौळी।
तुम्हा सोडूवी राम हा अंत:काळी॥८५॥

 
राम तुम्हाला अंत:काळी सोडवणारा आहे, हा विचार पुन्हा सांगावा लागत आहे. याचे कारण श्रोत्यांच्या मनात याविषयी संशय निर्माण झाल्याने श्रोते तो विचार गांभीर्याने घेत नाहीत, याची समर्थांना कल्पना आहे. दासबोध ग्रंथ लिहितानाही काही विचार स्वामींना पुन्हा पुन्हा सांगावे लागले. तेथे द्विरुक्तीचा दोष नव्हता. कारण, स्वामींनी त्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
 
तैैसें आम्हांस घडलें। बोलिलेची बोलणें पडिलें।
कां ते विघडलेचि घडलें। पाहिजे समाधान॥ (दा. ११.५.२)


समर्थ म्हणतात, ‘’माझ्या बाबतीत असे घडून येते की, सांगितलेलेच पुन्हा सांगावे लागते. कारण, मी सांगितलेले ऐकल्यावरही ऐकणार्‍यांचे समाधान काही कारणाने बिघडते. ते त्यांचे बिघडलेले समाधान पूर्ववत आणण्यासाठी मला पुन्हा पूर्वी सांगितले होते तेच मला सांगावे लागते.” त्यामुळे ’तुम्हा सोडवी राम हा अंत:काळी’ हे स्वामींनी पुन्हा सांगितले. माणसाला अंत:काळ समोर दिसत असला तरी त्याच्या मनातील अतृप्त इच्छा, आकांक्षा, वासना त्याला या देहापासून सुटू देत नाहीत. जेव्हा अंत:काळ येतो, तेव्हा देह सोडणे क्रमप्राप्त असते. तरीही विकार माणसाला मागे खेचत असतात, हे चिवट विकार आणि वासना क्षीण करण्याचे सामर्थ्य रामनामात रामाच्या चिंतनात आहे. तोच तुम्हालाअंत:काळी मदत करू शकतो. रामावर विश्वास असेल आणि रामनामाचा अभ्यास असेल, तर अशा व्यक्ती शांतपणे इहलोकाचा प्रवास संपवतात. देह सोडताना त्यांच्या जिवाची घालमेल होत नाही, असे स्वामींना सांगायचे आहे.

या श्लोकाची शेवटची ओळ ज्याप्रमाणे मागील विचार पुन्हा सांगते, तसेच रामनाम घेणार्‍या भगवान शंकरांचे उदाहरणही स्वामी पुन्हा पुन्हा देत आहेत, असे दिसते. एखादा विचार समजला, तरी ऐकणारे तो विचार विसरतात, त्याची त्यांना पुन्हा आठवण करून द्यावी लागते. समर्थ रामाचे चिंतन करायला सांगतात. (भजा राम) कारण, योग्यांचाही योगी भगवान शंकराचे विश्रांतिस्थान ’रामनाम’ हे आहे, त्यासाठी महेश्वर आणि त्यांची पत्नी उमा दोघेही नित्यनेमाने रामनाम घेत असतात. रामनामाचा जप करण्याचा दोघांनी नियम (नेम) केला आहे. नेम करणे, याचा अर्थ त्यात नियमितता सातत्य असले पाहिजे, त्यात खंड पडता कामा नये, असा आहे.

प्रपंचात माणूस अनेक इच्छा-आकांक्षा, आशा-अपेक्षा घेऊन जगत असतो. विकार, वासना त्यांना वाढवण्याचे काम करतात. त्यापैकी काही अल्पकालीन समाधान मिळवून देतात. पण, वासना, इच्छा या कधी तृप्त होत नाहीत, त्यांचा अंत नसतो. त्या पुन्हा-पुन्हा मनात येऊन अंतर्मनात साठवल्या जातात. त्या काही निमित्ताने पुढे येऊन जीवाला अस्वस्थ करीत असतात. त्यांना विसरता येत नाही. मग यावर उपाय काय? भगवान शंकरांच्या सर्वांगात विष भिनल्यावर त्याचा दाह त्यांना असह्य झाला. पण, रामनाम घेतल्याने या तपस्व्याचा दाह शमला. आपल्या इच्छा-आकांक्षा, वासना, कामना यांचेही असेच आहे. हे विकार माणसाच्या मनाला अंतर्बाह्य व्यापून टाकतात. त्याने माणूस अस्वस्थ अवस्थेत जगत असतो. समर्थ सांगतात, रामनामाने भगवान महादेवाच्या विषाचे शमन झाले, तसे रामनामाच्या अभ्यासाने माणसाच्या मनावरील वासना विकारांचा पगडा हळूहळू कमी होऊन तो त्यांच्या त्रासापासून मुक्त होतो.

रामनामाचा अभ्यास मृत्यूसमयी वासना क्षीण करून माणसाला समाधानाने या जगाचा निरोप घ्यायला मदत करतो. तो अंत:काळ साधण्यासाठी आयुष्यात लवकरात लवकर रामनामाच्या रामचिंतनाच्या अभ्यासाला लागावे. समर्थ हे वारंवार सांगतात. कारण, स्वामींना आमच्या उद्धाराची काळजी आहे. हा राम योगेश्वरांचे विश्रांतिस्थळ आहे. योगमार्गाचा खटाटोप करणारेही या रामरूपी विश्रांतिस्थळाच्या शोधात असतात. ते विश्रांतिस्थान सामान्य माणसाला नामस्मरणाने रामनामाने, रामाच्या चिंतनाने मिळणारे आहे. अर्थात यासाठी ’नेम’ आणि अभ्यास हवा, हे उघड आहे. गेल्या चार-पाच श्लोकापासून स्वामी नामस्मरणाचे, रामनामाचे महत्त्व सांगत आहेत, अध्यात्मातील ज्या काही क्रिया आत्मोद्धारासाठी सांगितलेल्या आहेत, त्या सर्वांचे सार भगवंताचे नाम हेच आहे, हे पुढील १५-१६ श्लोकांतून सांगितले आहे. त्यामुळे या एकंदर २० श्लोकांतून हा संदेश ते आपल्या मनाकडून वदवून घेत आहेत. आता हे विश्रांतिस्थळ कसे गाठायचे, ते पुढील श्लोकात सांगताहेत-

मुखीं राम विश्राम तेथेचि आहे।
सदानंद आनंद सेऊनि राहें।
तयावीण तो सीण संदेहकारी।
निजधाम हें नाम शोकापहारी ॥ ८६ ॥


स्वामींच्या श्लोकांतील शब्दांचा अर्थ जसाच्या तसा न घेता, त्यातील भावार्थ समजून घ्यावा लागतो. वरील श्लोकातील पहिली ओळ पाहिली, तर असा अर्थ निघतो की, जो तोंडाने नुसते ‘राम राम’ म्हणत आहे, त्याचे विश्रांतिस्थान तेथेच आहे. परंतु, नीट विचार केल्यावर लक्षात येते की, स्वामींना काहीतरी वेगळे सांगायचे आहे. कारण, लोकांना दाखण्यासाठी कोणी मुखाने ‘राम राम’ म्हणत असेल आणि त्याच्या मनात पापी विचार चालू असतील, तर त्याला तेथे कसला विश्राम मिळेल? हिंदी भाषेत, ‘मुखमें राम, बगलमें छुरी’ अशी एक म्हण आहे. त्यातलाच हा प्रकार. या संदर्भात गोंदवलेकर महाराजांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, “नुसते सतत तुमचे तोंड हलले की, तुम्हाला नाम साधले असे होत नाही. नामस्मरण हा एक अभ्यास आहे. बेडकाचे तोंड तर सतत हलत असते. मग त्याला केव्हाच मुक्ती मिळायला हवी होती.

बाह्योपचारावरून कोणाचीही आंतरस्थिती आजमावता येत नाही.” तेव्हा ’मुखी राम’ याचा अर्थ अत्यंत मनापासून घेतलेले नाम असाच घ्यायला हवा. या संदर्भात प्रा. के. वि. बेलसरे यांनी दिलेले स्पष्टीकरण महत्त्वाचे आहे. प्रा. बेलसरे म्हणतात, ’परा-पश्यन्ती-मध्यमा आणि वैखरी या वाणी दिसायला चार असल्या तरी (त्यांना स्वतंत्र न मानता) एकाच वाक्शक्तीच्या त्या चार अवस्था आहेत. प्रत्येकीमध्ये बाकीच्या तीन असतातच, म्हणून ’मुखी राम’ याचा अर्थ मनापासून भगवंताचे नाम घेणे असाच समजावा.’मनापासून रामनाम घेत राहिले की, वृत्ती शांत होऊ लागतात. मन नामात एकाग्र होऊ लागते. मनाची कल्पनेबरोबर बाहेर धावण्याची सवय कमी होऊ लागते. मनापासून घेतलेल्या नामाने (मुखी राम) त्याला आपले विश्रांतिस्थान तेथेच आहे, याची जाणीव होऊन अंतःकरण आनंदाने भरून जाते. त्यावर समर्थांनी या श्लोकात केलेले आनंदाचे विश्लेषण पुढील लेखात पाहाता येईल.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..