राज्यावर अवकाळीचे संकट

15 Mar 2023 18:10:42
unseasonal-rain
 
 
मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे जिवाची काहिली होत असतानाच आता राज्यावर अवकाळीचे संकट भेडसावू लागले आहे. राज्यातील काही भागांत गारपिटीसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिला आहे.मराठवाड्यात गेल्या चोवीस अनेक ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली. असून, राज्यात विविध भागात १८ मार्चपर्यंत अवकाळी संकट असणार आहे. यात मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकणात वीजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यात अधूनमधून हलक्या सरीही कोसळल्या. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने कांदा व द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड तसेच मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात अधिक पावसाची शक्यता आहे.

चार जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट
 
गुरुवार, १६ मार्च रोजी राज्यात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Powered By Sangraha 9.0