..तर पंचामृताचे काही थेंब कर्मचाऱ्यांवर उडवायला हरकत काय? ठाकरेंचा सवाल

    15-Mar-2023
Total Views |
 
Uddhav Thackeray
 
 
मुंबई : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. यावरूनच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. "अर्थसंकल्पाला गोड नाव दिलं पंचामृत. पंचामृताचे काही थेंब सरकारी कर्मचाऱ्यावर उडवण्यास काहीच हरकत नव्हती." अशी टीका त्यांनी यावेळी केली.
 
उद्धव ठाकरे , "मोर्चा यापूर्वी ही आला होता, यासाठी शिवसेना सामोरे गेली होती. त्यांची विचारपूस केली होती. एक माणुसकी असायला पाहिजे. अन्नदाता हा आक्रोश करतोय. सरकारकडे यांच्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही. मोर्चेकरांशी बोलून त्यांचं समाधान करायला पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्याच्या मागण्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे. सरकारकडे महाशक्ती असल्यानंतर जुन्या पेंशनचं वजन पेलायला हरकत नसावी. संपकऱ्यांचे काही नेते मला भेटले. त्यांचं म्हणणं एकायचं कोणी? त्यांच्यासमोर तुम्ही प्रश्नांचे डोंगर उभे करणार असाल तर मग प्रशासन काय करतंय?" असा सवाल त्यांनी केला.
 
ठाकरे पुढे म्हणाले, "अर्थसंकल्पाला गोड नाव दिलं पंचामृत. आता ‘पंचांमृत’ म्हटल्यानंतर हातावर पळीभर पाणी दिलं जातं. त्याने कोणाचंही पोट भरत नाही. ‘पंचांमृत’ या शब्दाचा अर्थ लोकांनी समजून घेतला पाहिजे. कोणालाही आम्ही पोटभर देणार नाही. तुमच्या हातावर जेवढं पडेल तेवढं प्या आणि उर्वरित डोक्यावरून फिरवा, असा त्याचा अर्थ होतो. हा विचित्र अर्थसंकल्प त्यांनी आणलेला आहे."
 
"पंचामृताचे काही थेंब सरकारी कर्मचाऱ्यावर उडवण्यास काहीच हरकत नव्हती. त्यांना तुम्ही झिडकारून टाकत असाल तर ते योग्य नाही. राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने येत आहेत. त्यांच्याशी बोलून, त्यांचं समाधान करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. मात्र, राज्य सरकारला त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यांच्याशी चर्चा करायलाही राज्य सरकारकडे वेळ नाही. अशी वेळी त्यांचे म्हणणं ऐकूण घेणं गरजेचं आहे." अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.