राहुल गांधी ‘तुकडे – तुकडे गँग’चे समर्थक – स्मृती इराणींचा घणाघात

15 Mar 2023 18:21:19
 
Smriti Irani
 
 
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा मोदी द्वेष आता भारत द्वेषात रुपांतरीत झाला आहे. त्यामुळेच राजकीय नैराश्यातून ते ‘तुकडे – तुकडे गँग’चेही समर्थन करतात, असा सणसणीत टोला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांना लगाविला आहे.
 
परदेश दौऱ्यात भारतविरोधी वक्तव्ये करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपने तीव्र हल्ले सुरूच ठेवले आहे. परदेशा दौऱ्यावरून बुधवारी भारतात परतलेल्या राहुल गांधी यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकारपरिषदेत जोरदार टोले लगाविले आहेत. त्या म्हणाल्या, भारतास गुलाम बनविण्याचा इतिहास असलेल्या देशात जाऊन राहुल गांधी यांनी भारताच्या लोकशाहीस तडा देण्याचे काम केले आहे. परदेशी शक्ती भारतात येऊन भारतीय लोकशाहीमध्ये हस्तक्षेप का करत नाहीत, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या मोदीद्वेषाचे रुपांतर आता भारतद्वेषात झाले असल्याची टिका त्यांनी केली.
 
भारतीय विद्यापीठांमध्ये जाऊन बोलण्याचा अधिकार नसल्याचा राहुल गांधी यांच्या दाव्याचाही इराणी यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, २०१६ साली दिल्लीतील एता विद्यापीठात भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्याचे समर्थन करण्यासाठी राहुल गांधी तेथे पोहोचले होते, याची आठवण इराणी यांनी करून दिली. परदेशी शक्तींनी आमंत्रण देऊन भारताच्या संसदीय परंपरांचा आणि देशासाठी बलिदान करणाऱ्या राष्ट्रभक्तांचा अपमान केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी संसदेपासून पळ न काढता संसदेत येऊन देशाची माफी मागावी, असे इराणी यांनी यावेळी नमूद केले.
 
राहुल गांधींच्या माफीची मागणी कायम
 
राहुल गांधींच्या लंडनमधील वक्तव्याविषयी त्यांनी माफी मागावी, यावर भाजप आक्रमक असतानाच, काँग्रेसनेही पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांदरम्यान दिलेल्या विधानांची आठवण करून देत आघाडी उघडली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन दिवसांचे कामकाज गदारोळाचे ठरले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या तिसऱ्या दिवशीही कामकाज होऊ शकले नाही आणि गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले.
 
अदानी प्रकरणाबाबतचे निवेदन देण्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांनी ईडीच्या कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी विजय चौकातच बॅरिकेड्स लावून विरोधी खासदारांना रोखले. दिल्ली पोलिसांनी विरोधी खासदारांना विजय चौकाच्या पलीकडे जाऊ दिले नाही. यानंतर विरोधी पक्षाचे खासदार विजय चौकातूनच संसदेत परतले.
 
 
Powered By Sangraha 9.0