एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी... सर्व विश्रांती...

एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व विश्रांती गृहांची तपासणी करून सुधारण्याच्या सूचना देणार : प्रविण दरेकर

    15-Mar-2023
Total Views |
Inspect all rest houses of ST employees and give suggestions for improvement
 
मुंबई-: विधानपरिषदेत आज आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी एसटी संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली. या चर्चेत भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सहभाग घेत एसटीतील विश्रांती गृहांची अवस्था दयनीय असून याबाबत शासन काय निर्णय घेणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंत्री दादा भुसे यांनी आजच ही संपूर्ण विश्रांती गृहे ताबडतोब तपासणी करून तेथील स्वच्छता गृहांसह व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे सकारात्मक उत्तर दिले.यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, मी सरकारचे आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांचे अभिनंदन करतो. आता एसटीचा कारभार सुधारताना दिसत आहे.

मात्र जी विश्रांतीगृहे आहेत त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. बोरिवलीतील अशोकवन येथील एसटीच्या विश्रांती गृहावर मी स्वतः गेलो होतो. तेथे पंखे नव्हते, टॉयलेटही खराब, तुटलेल्या अवस्थेत होते. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्थाही नव्हती. त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर आहे. एसटी कंडक्टर, ड्रायव्हर दिवसभर राबतात. माझेही वडील एसटी कंडक्टर होते. ड्युटी करताना काय हालत व्हायची याची मला माहिती आहे. एसटी मुक्कामी गेली तर कंडक्टर, ड्रायव्हर एसटीच्या टपावर झोपतात. गाडीत जरी झोपले तरी त्यांना पाय लांब करता येत नाहीत, अशी अवस्था आहे. ती पण माणसेच आहेत ना? महाराष्ट्रात एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आहेत. एसटीला पुनर्जिवीत करण्यासाठी शासनाकडूनही चांगले प्रयोग सुरु आहेत. मंत्री महोदयांना मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांचे या प्रश्नावर पाठबळ मिळेल. त्यामुळे विश्रांती गृहांबाबत शासन काय निर्णय घेणार हे जाहीर करावे, अशी मागणी दरेकर यांनी केली.
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.