यंदा मान्सूनवर अल निनोचे सावट

15 Mar 2023 17:50:55
El Nino and Maharashtra Drought

मुंबई : अमेरिकी संस्था ’नॅशनल ओशियानिक अँड टमॉस्फेरिक डमिनिस्ट्रेशन’ने अंदाज वर्तवला आहे की अल निनोची परिस्थिती २०२३च्या मध्यात सुरू होईल. याचा थेट परिणाम भारतीय नैऋत्य मान्सूनवर पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भारताच्या शेतीसाठी अत्यंत धोकादायक ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.
 
यापूर्वी अल निनो २००९, २०१४, २०१५ आणि २०१८च्या वर्षांमध्ये सक्रीय होते आणि त्याचा थेट परिणाम भारतातील नैऋत्य मोसमी पावसावर झाला होता. ला नीना आणि एल निनो मिळून एक हवामान चक्र तयार करतात ज्याचा जगभरातील हवामान आणि महासागर परिस्थितीवर प्रचंड प्रभाव पडतो. एल निनो दरम्यान, पूर्व आणि मध्य विषुवृत्तीय प्रशांत महासागरातील पाणी असामान्य तापमानवाढीने ग्रासले जाते. या उलट ला निनाच्या पूर्व आणि मध्य विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील पाणी थंड होते. या दोन घटनांचा एकत्रितपणे सागरी प्रवाह, माशांची संख्या आणि वार्‍याच्या प्रवाहावर परिणाम होतो. त्यांच्यामुळे जगाच्या काही भागांमध्ये जास्त पाऊस पडतो तर काही भागात दुष्काळ पडतो.

अमेरिकी हवामान संस्थेने नमूद केले आहे की, विषुववृत्तीय प्रशांत महासागर हळूहळू गरम होत आहे.त्यामुळे या वर्षी तीन वर्षांच्या ला निना नंतर एल निनो लवकर येण्याची अपेक्षा आहे. एल निनोची सुरुवात ही भारताच्या शेतीसाठी अत्यंत धोकादायक आहे. एल निनोमुळे भारताच्या खरीप पीक उत्पादनावर आणि कृषी क्षेत्रावरही परिणाम होईल. परंतु, भारतीय हवामान विभगाने अद्याप या विषयी कोणतेही अंदाज व्यक्त केलेले नाहीत.


Powered By Sangraha 9.0