उद्धव ठाकरेंची खेळी अंगलट येणार?

14 Mar 2023 15:24:52
 
Uddhav Thackeray
 
मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज आणि उद्या या सत्तासंघर्षावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आज शिंदे गटाचे वकील हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला. हरीश साळवे यांनी तब्बल दीड ते दोन तास युक्तिवाद करत विविध मुद्द्यांकडे सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष वेधलं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे तो स्वीकारावा लागला. त्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं, असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला. राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली तर त्यात गैर काय? असा युक्तिवादही साळवे यांनी केला.
 
राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना परत येण्याचे निर्देश घटनापीठ देऊ शकत नाही. गरज असेल तेव्हा राज्यपाल बहुमत चाचणीचा निर्देश देऊ शकतात. सुप्रीम कोर्टात येऊन या सर्व प्रक्रिया रद्द करता येऊ शकत नाही.असा युक्तिवाद करत हरिश साळवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ही सर्वात मोठी चूक असल्याचे कोर्टात निदर्शनास आणून दिले.
 
विधानसभा अध्यक्षांना घटनात्मक अधिकार असतात. त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहे. खरी शिवसेना कोणती? हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. शिवसेनेत पक्षांतर्गत फूट पडली आहे. सत्तासंघर्ष प्रकरणात बहुमत नसल्याने विधानसभा अध्यक्षांनी आपले पद गमावले. खरा पक्ष कोणता? हे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. बहुमत चाचणी ही राजभवनात नव्हे तर विधिमंडळात झाली आहे. त्यामुळे बहुमत चाचणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करता येत नाही. अविश्वास निर्माण झाल्यास बहुमत चाचणी गैर नाही. विधानसभा अध्यक्षांना कोर्ट निर्देश देऊ शकते का? असा सवाल अ‌ॅड. हरिश साळवे यांनी घटनापीठाला केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0