आक्षेपार्ह व्हिडीओची एसआयटी चौकशी होणार

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नेतृत्वात होणार सखोल तपास : शंभूराज देसाई

    14-Mar-2023
Total Views |
sit-for-sheetal-mhatre-morphing-viral-video-says-shambhuraj-desai-in-vidhansabha


मुंबई
: शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा आक्षेपार्ह मार्फ केलेला व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणाच्या तपासासाठी ’एसआयटी’ची स्थापना केल्याची घोषणा सोमवारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली.

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सोशल मीडियाचा राज्य समन्वयक विनायक डावरे याने हा व्हिडिओ मातोश्री या फेसबुक पेजवर अपलोड केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच इतर आरोपींनी जाणीवपूर्व काही व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर सदह व्हिडीओ व्हायरल करून फेसबुक पेजवर शेअर केल्याचे समोर आल्याचे देसाई यांनी या वेळी सांगितले. आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी ठाकरे गटाचा सोशल मिडीया समन्वयकच सूत्रधार निघाल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत भर पडली आहे.

विधिमंडळाच्या सभागृहात आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी जोरदार खडाजंगी झाली. यावेळी भाजप आणि सत्ताधारी पक्षाच्या महिला आमदारांनी आक्रमक भूमिका घेत महिलेची बदनामी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. त्याला अनुसरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला निर्देश देत योग्य ती पाउले उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्याला प्रतिसाद देत मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत याबाबत निवेदन करत वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करून सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत चौघांना ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी 4 मोबाइल आणि 6 सिमकार्ड जप्त केले आहेत. तसेच, या प्रकरणाचा 6 सायबर टीम अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी सखोल पोलिस तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

युवासेनेच्या साईनाथ दुर्गेला अटक

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी साईनाथ दुर्गेला अटक करण्यात आली आहे. साईनाथ दुर्गे हा आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. तसेच तो सध्या युवासेना कार्यकारिणीचा सदस्य आहे. मुंबई पोलिसांनी विमानतळावरुन साईनाथ दुर्गेला ताब्यात घेतले आहे. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.