शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत प्रोत्साहनपर लाभ!

14 Mar 2023 16:13:31
one-thousand-five-hundred-farmers-will-be-debt-free-free-till-march-31


मुंबई
: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांकडून सर्व बँकांना देण्यात आल्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य दिलीप मोहिते पाटील, बाळासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, डॉ.देवराव होळी, वैभव नाईक यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना आणि प्रोत्साहन अनुदान देण्याबाबतची सद्यस्थिती याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

सावे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या १२ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत ४६८३.२ कोटी रुपये १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने थेट वितरित करण्यात आले आहेत. तर उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरु असून २ लाख ८२ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी १,०१४ कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात आली आहे. तसेच ही कार्यवाही ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त स्तरावरुन सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण ३२ लाख ३ हजार शेतकऱ्यांना २०,४२५.१२ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0