शिवाजी पार्कवर आजपासून ‘जाणता राजा’ महानाट्य

    14-Mar-2023
Total Views |
janta-raja-chhatrapati-shivaji-maharaj-mahanatya-organized-at-shivajipark-by-ashish-shelar


मुंबई
: महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या सहा प्रयोगांची मालिका मंगळवार, दि. १४ मार्चपासून रविवार, दि. १९ मार्च या कालावधीत रोज सायंकाळी ६:४५ वा. दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे.

‘जाणता राजा’च्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचे प्रेरणादायी महापर्व अनुभवायला शिवतीर्थावर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दादरसारख्या मध्यवर्ती भागात असलेल्या मैदानावरच छत्रपतींची गौरव गाथा ’जाणता राजा’च्या माध्यमातून मांडणार असून ’जाणता राजा’चा नाद घुमणार आहे.

भव्य आणि आकर्षक फिरता रंगमंच

 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ महानाट्याचे प्रयोग शिवाजी पार्कवर भव्य आणि आकर्षक मंचावर होणार आहेत. यासाठी फिरता पाच मजली रंगमंच असणार आहे. तसेच आकर्षक प्रकाश योजना, घोडे, बैलगाड्यांचा समावेश असणार आहे. महानाट्यामध्ये २५०हून अधिक कलाकार, नेत्रदीपक आतषबाजी आदींचा समावेश असणार आहे.

शिवतीर्थावर आयोजित करण्यात आलेल्या या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगांसोबत महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र ते छत्रपतींचा राज्याभिषेक या महत्त्वाच्या घटनाही रंगमंचावर मांडण्यात येणार आहेत. ८० फूट लांब आणि ४० फूट रुंदीच्या या भव्यदिव्य रंगमंचावर हत्ती घोडे आणि २०० कलाकारांच्या माध्यमातून मराठेशाहीचा काळ या नाट्यातून शिवप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.
 
 
छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन भाजप सदैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर वाटचाल करते आहे. नव्या पिढीपर्यंत महाराजांचे महान कार्य पोहोचविण्याचा हा आमचा प्रयत्न असून हा प्रयोग म्हणजे मुंबईकरांना प्रेरणा देणाराच ठरेल.
- आ. आशिष शेलार,
अध्यक्ष, मुंबई भाजप